सिंगल्स डे याला ‘बेअर स्टिक्स हॉलिडे’ असंही म्हणतात. दरवर्षी ११ नोव्हेंबरला हा दिवस साजरा केला जातो. विशेषतः चीनमध्ये या दिवसाला विशेष महत्त्व आहे. चीनमध्ये या दिवशी अनौपचारिक सुट्टी असते. हा सिंगल्ससाठी खरेदीचा हंगाम असतो. हा दिवस आता जगातील सर्वात मोठा शॉपिंग इव्हेंट ठरताना दिसत आहे. चीनमध्ये या दिवसाची सुरुवात झाली, मात्र जगाच्या अनेक भागांत सिंगल्स डे साजरा केला जातो. चीनसारख्या परंपरागत देशात या दिवसाद्वारे सिंगल राहणे साजरे केले जाते. चीनमध्ये या दिवशी खरेदीदारांना विशेष सवलत दिली जाते. सिंगल्स डे आला कुठून? हा दिवस ११/११ लाच का साजरा केला जातो? याची सुरुवात कधी आणि का करण्यात आली? त्याविषयी जाणून घेऊ.
सिंगल्स डे म्हणजे काय?
सिंगल्स डेची सुरुवात १९९० च्या दशकात चीनमध्ये झाली. नानजिंग विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अविवाहित राहण्याचा आनंद साजरा करण्यासाठी ११/११ ही तारीख निवडली. ही तारीख निवडण्यामागेही विशेष कारण आहे. ११/११ तारखेत चार एक आहेत, जे एकटा व्यक्ती एकत्र असल्याचे प्रतीक आहे. वर्षानुवर्षे, एकटे राहणार्या लोकांचा सन्मान करण्यासाठी आणि सिंगल राहण्याचा आनंद जाहीर करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे. २००९ पर्यंत चिनी ई-कॉमर्स कंपनी अलीबाबाने या दिवसाला एका खरेदी कार्यक्रमात रूपांतरित केले आणि ग्राहकांना काहीतरी खास करण्यासाठी प्रोत्साहित केले, त्यामुळे अलीबाबाने वर्षानुवर्षे विक्रमी विक्री केली आणि ही संकल्पना सर्वदूर पोहोचली.
‘सिंगल्स डे’चा फायदा काय?
प्रामुख्याने अलीबाबा, जेडी.कॉमसारख्या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि अलीकडे ‘ॲमेझॉन’सारख्या आंतरराष्ट्रीय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या सहभागामुळे सिंगल्स डेच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली आहे. अलीबाबाच्या वार्षिक ‘सिंगल्स डे सेल’ एक्स्ट्राव्हॅगांझामध्ये डिस्काउंट, फ्लॅश सेल्स आणि प्री-ऑर्डर यांचा समावेश होतो; ज्यामुळे ग्राहक या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात आणि किरकोळ विक्रेत्यांचाही या दिवशी मोठ्या प्रमाणात फायदा होतो. आज भारत, अमेरिका आणि युरोप, तसेच आशियातील इतर भागांमधील किरकोळ विक्रेते सिंगल्स डेचे प्रमोशन करतात. इलेक्ट्रॉनिक्स आणि कपड्यांपासून ते सौंदर्य उत्पादनांपर्यंत जवळजवळ प्रत्येक किरकोळ विक्रेत्याला याचा फायदा होतो.
हेही वाचा : ‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?
सिंगल्स डे भारतात साजरा होतो का?
भारतात सिंगल्स डे अद्याप ब्लॅक फ्रायडे किंवा सायबर मंडे इतका मुख्य प्रवाहात नाही. परंतु, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने तरुण, शहरी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या सवलती देत सिंगल्स डे प्रमोशन सुरू केले आहेत. भारतीय ब्रँड्स सिंगल्स डेला अधिकाधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी म्हणून पाहत आहेत. २०२४ मध्ये, भारतीय किरकोळ विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि घरगुती वस्तूंवर सवलत देत आहेत.