How do ants follow each other: मुंग्या नेहमी सरळ रेषेत का चालतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जर तुम्ही कधी मुंग्यांच्या समूहाला चालताना पाहिले असेल, तर अनेकदा त्या अतिशय शिस्तबद्ध, पद्धतशीरपणे एका सरळ रेषेत चालताना दिसतात. परंतु, यामागे नेमकं काय कारण आहे? मुंग्या एका रेषेत चालण्यामागे फक्त योगायोग आहे की त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का? ते आपण जाणून घेऊ…
मुंग्यांच्या सरळ रेषेत चालण्याच्या सवयीमागे एक विशेष कारण आहे ते म्हणजे ‘फेरोमोन ट्रेल’. हा एक प्रकारचा रासायनिक सिग्नल आहे, जो मुंग्या एकमेकांना मार्ग दाखवण्यासाठी सोडतात. मुंग्या ही युक्ती कशी वापरतात आणि त्यांच्या शिस्तबद्ध वर्तनामागील मनोरंजक वैज्ञानिक कारण काय आहे?
‘फेरोमोन ट्रेल’ म्हणजे काय?
मुंगी अन्नाच्या शोधात बाहेर पडल्यानंतर जेव्हा तिला एखाद्या ठिकाणी अन्न असल्याची माहिती मिळते, तेव्हा ती तिच्या घरी म्हणजेच मुंग्यांच्या वसाहतीत (वारुळात) परतताना जमिनीवर ‘फेरोमोन’ सोडते. या ‘फेरोमोन ट्रेल’ तंत्राचा म्हणजेच त्यांच्या गुप्त भाषेचा नंतर इतर मुंग्यांसाठी सिग्नल म्हणून उपयोग होतो, ज्यामुळे त्यांना त्याच मार्गाने अन्नापर्यंत पोहोचता येते.
मुंग्या सरळ रेषेत का चालतात?
मुंग्या सरळ रेषेत चालतात. कारण- त्या त्यांच्या पुढे असलेल्या मुंगीने सोडलेल्या ‘फेरोमोन’च्या मागून चालतात. वाट जितकी मजबूत असेल, तितक्या जास्त मुंग्या त्या मार्गावरून वाटचाल करू शकतात. अशा रीतीने चालल्याने त्यांना मार्ग ठरवणे सोपे जाते आणि त्या अन्नस्रोतापर्यंत लवकर पोहोचू शकतात.
मुंग्या त्यांचा मार्ग बदलू शकतात का?
जर काही कारणास्तव मार्गात अडथळा आला किंवा त्यांना दुसरा सोपा मार्ग सापडला, तर मुंग्या त्यांचा मार्ग बदलू शकतात. नवीन मुंग्या नवीन मार्गावर ‘फेरोमोन’ सोडतात आणि मग इतर मुंग्या त्यांच्यामागे जाऊ लागतात.
जर ‘फेरोमोन ट्रेल’ निघून गेला तर?
जर काही कारणास्तव जसे की पावसामुळे ‘फेरोमोन ट्रेल’ पुसला गेला, तर मुंग्यांना मार्ग शोधण्यात अडचण येते. कधी कधी इतर मुंग्या नवीन मुंगी एक नवीन ‘फेरोमोन ट्रेल’ तयार करेपर्यंत भटकत राहतात. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की, त्या कधी कधी समूहापासून वेगळ्या झालेल्याही दिसतात.
मुंग्यांच्या या वर्तनातून माणूस काय शिकला?
मुंग्यांचे हे नेव्हिगेशन तंत्र इतके प्रभावी आहे की, शास्त्रज्ञांनी त्यातून प्रेरणा घेऊन ‘अल्गोरिदम’ तयार केले आहेत, जे वाहतूक नियंत्रण, रोबोटिक्स व इंटरनेट नेटवर्कमध्ये वापरले जातात.