रस्त्यावरून चालताना किंवा ट्रेनने प्रवास करताना आपल्या आजूबाजूला नेत्रहीन प्रवासी दिसतात. डोळे नसूनही ते त्यांच्या इतर इंद्रियांच्या बळावर काम करत असतात. कधीकधी त्यांना इतरांच्या मदतीची गरज भासते. अशा लोकांना मदत करायची असे आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते. त्यानुसार आपणही नेत्रहीन, अंध लोकांना मदत करत असतो. ज्या लोकांची पाहण्याची शक्ती नाहीशी होते किंवा ज्यांच्या दृष्टीमध्ये दोष असतो, असे लोक एका विशिष्ट प्रकारचे काळे चष्मे वापरत असतात. नेत्रहीन व्यक्ती हे काळे चष्मे का वापरतात या प्रश्नाचे उत्तर आम्ही आज देणार आहोत.
नेत्रहीन व्यक्तींना काळा चष्मा घालायचा सल्ला डॉक्टर देत असतात. यांच्या व्यतिरिक्त डोळ्यांमध्ये इन्फेक्शन झाल्यावरही हा काळा चष्मा वापरा, असे तज्ज्ञ सांगत असतात. मोतीबिंदू झाल्यास डोळ्यांवर शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना काळा चष्मा लावायला दिला जातो. काही जण स्टाइल म्हणून डोळ्यांवर काळा चष्मा चढवतात. उन्हापासून संरक्षण व्हावे हेदेखील यामागील कारण असू शकते. आजकाल बाजारामध्ये असंख्य क्लासी चष्मे/ सनग्लासेस पाहायला मिळतात.
नेत्रहीन व्यक्तींना काळा चष्मा लावायचा सल्ला डॉक्टर का देतात?
अनेकदा रुग्णांच्या डोळ्यांमधील ठरावीक भाग काम करणे सोडून देतात. परिणामी त्यांचे डोळे पूर्णपणे खराब झालेले नसतात. बहुतांश रुग्णांची दृष्टी पूर्णपणे गेलेली नसते. काही जण डोळ्यांसमोर चित्र बनवण्यात असमर्थ असतात. तर काही जणांना रंग ओळखणे शक्य होत नसते. काही वेळेस डोळ्यांशी संबंधित आजार झाल्याने रुग्णाची पाहण्याची शक्ती कमी-कमी होत जाते. नेत्रहीन व्यक्तीच्या डोळ्यावर सूर्यप्रकाश पडल्यावर त्यांना सर्वसामान्यांपेक्षा जास्त त्रास होतो. ज्यांना डोळ्यांचे आजार आहेत, अशा लोकांनाही हा अनुभव येतो.
आणखी वाचा – रडणे शरीरासाठी फायदेशीर असते का? जाणून घ्या याबाबत तज्ज्ञ काय सांगतात…
प्रखर सूर्यप्रकाशामुळे त्यांच्या डोळ्यासमोर गडद नारंगी रंग पसरतो. तसेच डोळ्यांची जळजळ व्हायला सुरुवात होते. अनेकदा हा त्रास असह्य होतो. परिणामी घराबाहेर पडणे अशक्य होते. अशा वेळी काळा चष्मा लावल्याने प्रकाश डोळ्यांपर्यंत पोहचण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. काळ्या रंगामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. या कारणांमुळे नेत्रहीन व्यक्ती नेहमी काळा चष्मा घालून घराबाहेर पडत असतात.