आजकाल तंत्रज्ञानामध्ये मोठी प्रगती होत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. शिक्षणापासून ऑफिसचे काम करण्यापर्यंत सर्वच कामे ऑनलाइन पद्धतीने करणे शक्य झाले आहे. करोना काळामध्ये या तांत्रिक शक्तीची खरी ताकद लोकांना कळली. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे कंप्यूटर-सीपीयू-कीबोर्ड, लॅपटॉप अशा गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वपूर्ण घटक बनले आहेत. संगणकावर काम करण्यासाठी कीबोर्ड आवश्यक असतो. याच्याद्वारे टायपिंग करणे शक्य होते. याचा वापर प्रत्येकजण दररोज करत असतो. पण कीबोर्ड वापरताना त्यामधील F आणि J या शब्दाच्या खाली असलेल्या ‘-‘ या चिन्हाकडे तुमचे लक्ष कधी गेले आहे का? किंवा फक्त F आणि J या दोनच बटणांवर हे चिन्ह का आहे असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?
F आणि J बटणांवर हे चिन्ह का असते?
कीबोर्डवर F आणि J या बटणांवर ‘-‘ अशी छोटीशी आडवी रेष असते. जून ई बॉटिश यांनी २००२ मध्ये या चिन्हाचा शोध लावला असे म्हटले जाते. पुढे जगभरातील प्रत्येक कीबोर्डवर या चिन्हाचा वापर केला गेला. इंटरेस्टिंग फॅक्ट्स अॅंड इंन्फॉर्मेशन पोर्टेलच्या एका अहवालानुसार, टायपिंग करताना मदत व्हावी यासाठी या आडवी रेष असलेल्या चिन्हाचा वापर करायला सुरुवात केली गेली. या रेषेमुळे लोकांना कीबोर्डकडे न पाहता टाइप करताना बटण ओळखणे शक्य होते. एका प्रकारे कीबोर्डमध्ये कोणते बटण कोणत्या जागी आहे हे ओळखण्यासाठी या चिन्हाचा उपयोग सुरु झाला.
कामाच्या ठिकाणी वेगाने टायपिंग करता येणे आवश्यक समजले जाते. ऑफिसमध्ये एखादी गोष्ट टाइप करताना कीबोर्ड पाठ नसल्याने शब्दांमध्ये चुका होऊ शकतात. या चुका टाळण्यासाठी सतत कीबोर्डकडे बघावे लागत असे. कीबोर्डवरील अक्षर-बटणांची ओळख व्हावी आणि कीबोर्ड पाठ व्हावा यासाठी F आणि J बटणांखाली छोटी आडवी रेष जोडण्यात आली. दोन्ही हातांनी संपूर्ण कीबोर्डचा वापर केल्याने कामाची गती वाढण्यास मदत होते. जून ई बॉटिश यांनी ही संकल्पना मांडल्यानंतर फ्लोरिडामध्ये किबोर्डमध्ये बदल करण्यात आले. त्यानंतर हळूहळू जगभरातील प्रत्येक कीबोर्डमध्ये या चिन्हाचा समावेश करण्यात आला. मोठ्या कीबोर्डचा वापर करत असल्यास त्यातील 5 या आकड्याच्या बटणावरही ‘-‘ हे चिन्ह पाहायला मिळते.