Why do Indians prefer a government job: अनेकदा तुम्ही आजूबाजूच्या लोकांना किंवा ओळखीतील एखाद्या व्यक्तीला ‘एकदा सरकारी नोकरी मिळाली की आयुष्य सेट होऊन जाईल,’ असं म्हणता ऐकलं असेल. भारतामधील अनेक तरुण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. आपल्याला सरकारी नोकरी मिळाली तर बरं होईल असं अनेकांचं म्हणणं असतं. केवळ तरुणच नाही तर त्यांच्या पालकांनाही आपल्या मुलाला किंवा मुलीला सरकारी नोकरी मिळाली तर त्याचं फार भलं होईल असं वाटतं. दर वर्षी कोट्यवधी उमेदवार सरकारी नोकऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा देतात. अनेक तरुण तर आयुष्यातील उमेदीची ५ ते १० वर्ष सरकारी नोकरी मिळवण्यासाठीची तयारी, अभ्यास आणि नोकरी शोधण्यातच घालवतात. त्यामुळेच आपल्या देशात सरकारी नोकरीला एवढं महत्त्व काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. सरकारी नोकरीला खासगी नोकरीपेक्षा अधिक प्राधान्य का दिलं जातं? सरकारी नोकरीचे वेगळे असे काय फायदे असतात जे खासगी नोकरदारांना मिळत नाहीत? सरकारी नोकरीसाठी लोक एवढे प्रयत्न का करतात?
या साऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याआधी सरकारी नोकरी म्हणजे काय हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सरकारी नोकरी अशा नोकरीला म्हणतात ज्यामध्ये नोकरदार हा केंद्र किंवा राज्य सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या खात्यात कार्यरत असतो. सरकारी नोकरीअंतर्गत केंद्रीय प्रशासकीय सेवा, बँका, रेल्वे, संरक्षण खाते, एसएससी, राज्य सेवा, पीएसयू, शिक्षणक यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांचा समावेश होता. आता या सरकारी नोकऱ्यांचे फायदे काय असतात ते जाणून घेऊयात…
नोकरीची सुरक्षा
सरकारी नोकरी ही सर्वात सुरक्षित रोजगारापैकी एक माध्यम मानलं जातं. सरकारी नोकरीमध्ये जॉब सिक्युरिटी अधिक असते असं म्हटलं जातं. सरकारी कर्मचाऱ्यांना अगदी सहजपणे त्यांच्या नोकरीवरुन काढून टाकलं जात नसल्यानेच ही नोकरी अधिक सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं. अगदीच दुर्मीळ प्रकरणांमध्येच सरकारी नोकरदारांना कामावरुन काढून टाकण्यासारखा टोकाचा निर्णय घेतला जातो. कोणत्याही खासगी नोकरीच्या तुलनेत सरकारी नोकरी ही अधिक अधिक स्थीर आणि सुरक्षित मानली जाते.
नक्की वाचा >> विश्लेषण: वर्ल्ड कपमधील प्रत्येक सामन्याआधी मोबाईलप्रमाणे चार्ज करतात फुटबॉल; यामागील कारण आहे फारच खास
वर्क लाइफ बॅलेन्स
सरकारी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास ठरलेले असतात. तसेच खासगी क्षेत्राच्या तुलनेत सरकारी नोकरीमध्ये कामाचा फार जास्त ताण नसतो कारण या ठिकाणी इतर संस्था किंवा कंपन्यांशी स्पर्धा नसते. तसेच सर्व सार्वजनिक, सरकारी सुट्ट्या मिळतात. राष्ट्रीय सण, मोठे उत्सवांदरम्यानही सुट्ट्या मिळतात. तसेच अतिरिक्त सुट्ट्यांही मिळतात. यामुळेच सरकारी कर्मचारी हे आपलं खासगी आणि कामासंदर्भातील आयुष्यातील समतोल अधिक चांगल्या प्रकारे साधू शकतात असं म्हटलं जातं.
निवृत्तीनंतरचे लाभ
सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळतं. तसेच त्यांनी पीएफबरोबरच अन्य निवृत्ती योजनांचा फायदा सरकारच्या माध्यमातून मिळतो. त्यामुळेच सरकारी नोकरदार निवृत्तीनंतरही आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि स्थिर आयुष्य जगू शकतो असं म्हटलं जातं.
चांगला पगार
सरकारी कर्मचाऱ्यांना खासगी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत चांगले वेतन मिळते. इतकेच नाही वेळोवेळी सरकार भत्त्यांमध्ये वाढ करतं. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो. त्याशिवाय सरकारी नोकरीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सरकारी नोकरीमध्ये पगार कायमच वेळेत मिळतो. पगाराची तारीख ही ठरलेली असते. त्यामुळे घरातील आर्थिक योजन करणं अधिक सोयीस्कर होतं.
आरोग्यविषयक फायदे
सरकारी कर्मचाऱ्यांचा आरोग्य वीमाही सरकारकडूनच केला जातो. त्याशिवाय अनेक ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते. काही ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनाही ही सवलत मिळते.
नक्की वाचा >> विश्लेषण: FIFA वर्ल्ड कपवर करोनापेक्षाही घातक अशा ‘कॅमल फ्लू’चं संकट, WHO चा इशारा; मात्र या आजाराची लक्षणं काय?
भत्ते
सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे भत्तेही मिळतात. यामध्ये राहण्यासाठी, प्रवासाच्या भत्त्यांचाही समावेश असतो. मासिक खर्च आणि इतर दैनंदिन खर्चासंदर्भातील भत्तेही अनेकांना मिळतात. खास करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सरकारकडून सरकारी निवासस्थानाबरोबरच वाहनांचीही सुविधा पुरवली जाते.
सामाजिक स्तर
सरकारी नोकरी असलेल्या व्यक्तीकडे सामाजात आदराने पाहिलं जातं. सरकारी नोकरीसंदर्भात असलेलं वलय पाहता समाजामध्ये सरकारी नोकरी असणाऱ्यांना मानाचं स्थान असतं, असं मानलं जातं.