बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तो ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी कानावर पडल्यापासून एकच प्रश्न सतत सतावतोय, तो म्हणजे का? याचबरोबर अनेकांना आत्महत्येसंदर्भातील अनेक प्रश्न पडणं सहाजिक आहे. म्हणजे आत्महत्याप्रवृत्त लोकांमधली धोक्याची लक्षणे कोणती?, आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसणारे बदल कोणते?, आत्महत्या थांबवू शकतो का? अशा अनेक प्रश्नांवर सोशल मिडियावर चर्चा सुरु झाली आहे. याच प्रश्नांची उत्तरे देणारा मृणालिनी ओक यांचा हा लेख…
आत्महत्या या घटनेमागे निराशा, अपयश या नकारात्मक भावना आणि मृत्यूचे भय असल्यामुळे आजही आत्महत्या हा विषय मोकळेपणाने चर्चिला जात नाही. परंतु याविषयी योग्य संवाद साधला गेला तर आत्महत्येच्या कल्पनेमागे (सुसाइड आयडिएशन) जे ‘रिस्क फॅक्टर्स’ आहेत त्यांची ओळख सर्वाना होऊ शकेल आणि अनेक जण आत्महत्येपासून परावृत्त होऊ शकतील. काय आहेत त्यामागच्या दंतकथा आणि वास्तव. आपल्याच स्नेह्य़ांना आत्महत्येपासून कसं वाचवता येईल? जगण्याकडे कसे नेता येईल हे सांगणारा खास लेख…
जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन) आत्महत्येला सर्वाधिक सार्वजनिक प्राधान्य असलेली सामाजिक समस्या मानते. प्रत्येक आत्महत्या हा एक असा अपघात आहे जो फक्त माणसाचा जीव घेत नाही, तर संपूर्ण कुटुंबव्यवस्थेवर आघात करतो. यात मृत्यूचा मार्ग एकच व्यक्ती निवडते, बळी मात्र संपूर्ण कुटुंबाचा जातो. म्हणूनच आत्महत्या रोखण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न होणे गरजेचे आहे.
‘विश्व मानसिक स्वास्थ्य संघ’ (वर्ल्ड मेंटल हेल्थ फेडरेशन म्हणजे डब्ल्यूएमएचएफ) या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना १९४८ मध्ये झाली, जिचं उद्दिष्ट आहे, मानसिक आजाराचा प्रतिबंध, त्याचे योग्य निदान आणि उपचार तसेच समाजामध्ये मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य वाढण्यासाठी प्रयत्न करणे. या संघानं १९९२ मध्ये, १० ऑक्टोबर हा दिवस ‘मानसिक स्वास्थ्य दिवस’ म्हणून घोषित केला. प्रत्येक वर्षी १० ऑक्टोबर हा दिवस एक विशिष्ट विषय निवडून साजरा केला जातो. त्यामुळे जे राष्ट्र या संघटनेचे सदस्य आहेत, त्यांना त्या विषयाचा आधार घेऊन मानसिक स्वास्थ्याच्या विषयावर प्रचार करण्याची संधी मिळते. त्याचप्रमाणे १० सप्टेंबर हा ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस’ म्हणून पाळला जातो. या वर्षी त्यांचं ब्रीदवाक्य होतं, ‘एकत्र येऊन आत्महत्या थांबवू या’.
यंदाच्या १० ऑक्टोबरची थीम ‘आत्महत्या प्रतिबंध’ अशी आहे. ‘जागतिक स्वास्थ्य संघटने’चं म्हणणं आहे, की जगभरात अंदाजे आठ लाख लोक दरवर्षी आत्महत्येचा मार्ग निवडतात. त्यातही अत्यंत चिंताजनक बाब ही की, हताश आणि निराश झाल्यानंतर फक्त प्रौढच आत्महत्येचा मार्ग निवडत नाहीत तर अधिकाधिक मुलं आणि तरुणसुद्धा हा मार्ग निवडतात. असं आढळून आलं आहे, की आत्महत्या आज १५ ते २९ वर्षांच्या वयोगटात मृत्यूचं मोठं कारण आहे. त्यामागची कारणं हिंसा, परीक्षेतील अपयश, प्रेमभंग, लैंगिक शोषण, सायबर शोषण (सायबर बुलिंग) आणि खऱ्या किंवा आभासी अपयशामुळे आलेली निराशा ही आहेत. आत्महत्या थांबवणे हे एक सार्वत्रिक आव्हान आहे. आत्महत्या ही वैयक्तिक शोकांतिका तर आहेच, कारण हे कृत्य त्या व्यक्तीच्या अकाली मृत्यूस कारणीभूत ठरतं; पण तिच्या स्नेही, कुटुंबीय यांच्यावर न पुसणारा कायमसाठीचा आघात करून जातं. म्हणून या वर्षी ‘डब्ल्यूएमएचएफ’चं ब्रीदवाक्य फार महत्त्वाचं ठरतं. त्यामागचा हेतू हा आहे, की सर्व देशांच्या सरकारनी आपल्या ‘राष्ट्रीय स्वास्थ्य धोरणा’मध्ये आत्महत्या व आत्महत्या प्रतिबंध या सामाजिक समस्येला योग्य महत्त्व द्यावं आणि मानसिक स्वास्थ्याच्या क्षेत्रात त्याला प्राधान्य द्यावं. मुख्य म्हणजे आत्महत्येकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तो कलंक मानला गेल्यामुळे त्यावर मोकळेपणाने बोललं जात नाही. मात्र मोकळेपणाने या़विषयी संवाद साधला गेला तर आत्महत्येच्या कल्पनेमागे (सुसाइड आयडिएशन) जे ‘रिस्क फॅक्टर्स’ आहेत त्यांची ओळख सर्वाना होऊ शकेल.
‘सुसाइड आयडिएशन’ हा क्लिष्ट विषय आहे. संशोधन सांगतं, की स्वेच्छेने जीव देणाऱ्याच्या मनात कधीही केवळ एकच कारण नसतं आणि आत्महत्या करण्यापूर्वीची शेवटची घटना ही बहुतेक करून त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक घटनांच्या शृंखलेतील शेवटची घटना असू शकते. हे समजणं महत्त्वाचं आहे, की त्या क्षणाला त्या व्यक्तीला हा मार्ग म्हणजे केवळ त्याच्या वेदनांचा अंत करण्यासाठी एक मार्ग असा दिसून येतो. याप्रमाणे प्रयत्न करून वाचलेल्यांना जेव्हा विचारलं जातं तेव्हा हेच ऐकण्यात येतं, की त्यांना जगायचं नव्हतं असं नाही, परंतु प्राप्य परिस्थितीमध्ये त्यांच्या समस्येच्या समाधानासाठी काहीही दुसरा मार्ग दिसत नसताना, हा मार्ग पत्करणे म्हणजे त्यांच्या समस्येचा अंत, असं त्यांना तीव्रतेने वाटल्याने त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला होता
‘आत्महत्या’ या शब्दामागे नकार, अपयश,वेदना आदी नकारात्मक भावभावना असल्याने त्याविषयी मोकळेपणाने बोललं जात नाही. त्याबद्दल चर्चा करणं टाळलं जातं. आत्महत्या अतिशय धक्कादायक आणि मनाला अस्वस्थ करणारी असते. याशिवाय त्यात मृत्यू असतो. मृत्यूविषयी जनमानसात भय असतं. म्हणूनच त्यावर बोलणं टाळलं जातं. या सर्व कारणांमुळं ‘सुसाइड आयडिएशन’ समजण्यास लोक असमर्थ ठरतात आणि म्हणूनच आत्महत्येविषयी दंतकथा फोफावत जातात. म्हणूनच चुकीच्या किंवा अज्ञानामुळे तयार झालेल्या दंतकथा लक्षात घ्यायला हव्यात.
१)
दंतकथा : जी माणसं आत्महत्या करणार असं सांगत राहतात, ती तसं करत नाहीत.
सत्य : आत्महत्या करणाऱ्या दहा जणांपैकी कमीत कमी आठ व्यक्तींनी निश्चित स्वरूपात हा धोक्याचा इशारा वेळोवेळी दिलेला असतो .
२)
दंतकथा : आत्महत्येच्या विषयावर चर्चा केल्यामुळे एखादी निराश व्यक्ती तो मार्ग निवडण्यासाठी डिवचली जाऊ शकते.
सत्य – मोकळेपणाने चर्चा केल्यामुळे आत्महत्याप्रवृत्त व्यक्तीलाही आपल्याला समजून घेणारं कुणी आहे, याची कल्पना येईल. मदतीसाठी हाक मारल्यास ती मिळू शकेल, ही आशा तिच्या मनात फोफावू लागेल.
३)
दंतकथा : आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती स्वार्थी असतात आणि मृत्यूचा सोपा मार्ग निवडतात, कारण ते भित्रे असतात.
सत्य : आत्महत्या हा भावनिक वेदनांचा अंत करण्यासाठी पत्करलेला एक मार्ग असतो. आत्महत्याप्रवृत्त व्यक्तीची मानसिक वेदना इतकी तीव्र असते, की ते स्वत:ला अगतिकपणाच्या भोवऱ्यातून बाहेर काढण्यास असमर्थ ठरतात. आत्महत्येचा विचार करणाऱ्या हताश आणि निराश व्यक्ती सारासार विचार करण्यास अक्षम असतात आणि हा मार्ग त्यांच्यासाठी ‘चॉइस’पेक्षा ‘सक्तीची पळवाट’ असते.
४)
दंतकथा : जी व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते, तिच्यामध्ये ही प्रवृत्ती कायमस्वरूपी राहते.
सत्य : आत्महत्येचा प्रयत्न ही प्रचंड मानसिक वेदना आणि अगतिकपणामधून निर्माण झालेली मन:स्थिती असते जी चिरस्थायी असतेच असं नाही. आत्महत्या हा मानसिक स्वास्थ्याशी निगडित मुद्दा असला तरी त्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या परिस्थितीशी सामना करण्याच्या क्षमतेवर (कोपिंग स्किल्स) परिणाम झालेला आहे, त्याच्या कार्यक्षमतेवर नाही. आत्महत्येचा प्रयत्न करून वाचलेली व्यक्ती एक आनंदी आणि यशस्वी आयुष्य जगण्याचे सामर्थ्य बाळगू शकते.
५)
दंतकथा : आत्महत्या करणारी प्रत्येक व्यक्ती मनोरुग्ण असते.
सत्य : संशोधन सूचित करतं, की सर्व मनोरुग्ण आत्महत्येसाठी प्रवृत्त होणारे नसतात आणि सर्व व्यक्ती ज्या हे टोकाचं पाऊल उचलतात, ते मनोरुग्ण नसतात.
६)
दंतकथा : आत्महत्येचं प्रमाण अति श्रीमंत किंवा अत्यंत गरीब यांच्यात जास्त प्रमाणात आढळतं.
सत्य : आर्थिक स्थितीचा आणि आत्महत्याप्रवृत्त मन:स्थितीचा काही संबंध नसतो.
७)
दंतकथा : आत्महत्येचा प्रयत्न करून वाचलेली माणसे परत प्रयत्न करणार नाहीत कारण ती दिलगीर असतात.
सत्य : बहुतेकदा पहिल्या प्रयत्नानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत ती परत प्रयत्न करू शकतात.
आत्महत्याप्रवृत्त लोकांमधली धोक्याची लक्षणे
दीर्घ काळापर्यंत राहणारे दु:ख किंवा नराश्य. कायम गंभीर आणि विचारात असतात. नुकत्याच घडलेल्या संकटामुळे, उदाहरणार्थ परीक्षेतील अपयशामुळे, अगदी जवळच्या व्यक्तीच्या अकस्मात मृत्यूमुळे, मोठय़ा आर्थिक नुकसानामुळे, प्रेमभंग झाल्यामुळे, एखाद्या भयंकर रोगाचे निदान झाल्यामुळे, इत्यादी
या व्यक्तींमध्ये दिसणारे बदल
पूर्णपणे अलगाव, एकटं-एकटं राहणं, लोकांना सामोरं जाणं टाळणं, आधी आवडणाऱ्या गोष्टींपासून पूर्ण विरक्ती, स्वत:च्या दिसण्याबद्दल पूर्णपणे निष्काळजीपणा असणे, अधिक प्रमाणात मद्यपान किंवा अमली पदार्थाचे सेवन करणे, धोकादायक आणि निष्काळजीपणाने वागणे, जसं गाडी अत्यंत वेगाने चालवणे, उगाच धोका पत्करणे, स्वत:च्या सुरक्षिततेबद्दल पूर्णपणे बेफिकिरी दाखवणे. अशी व्यक्ती पुष्कळदा तिच्या आयुष्यामध्ये आवराआवर सुरू करते. जसं निरोपाची भाषा वापरणे, स्वत:च्या खासगी वस्तू देऊन टाकणे, मृत्युपत्र बनवणे, मनातले कागदावर उतरवणे, सुसाइड नोट लिहायला घेणे इत्यादी.
आत्महत्या थांबवू शकतो का?
एखादी व्यक्ती आत्महत्येबद्दल बोलत असेल किंवा वर सांगितलेल्या गोष्टी करत असेल तर तिचं म्हणणं अत्यंत गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. संशोधन सांगतं, की आत्महत्या प्रतिबंध करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं धोक्याच्या लक्षणांबद्दल जागरूक राहणे, नराश्याची चिन्हं ओळखणे आणि योग्य वेळी हस्तक्षेप करणे. आपल्या माहितीच्या एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीत असे काही बदल आढळल्यास त्यांना एक प्रश्न, अजिबात संकोच न बाळगता विचारला पाहिजे, की तुझ्या मनात आत्महत्या किंवा कशा प्रकारच्या आत्म-हानी (सेल्फ हार्म) चे विचार येत आहेत का? अनेकदा असं दिसून येतं, की त्या व्यक्तीला केवळ एका अशा व्यक्तीची गरज असते जिला तिची काळजी आहे आणि जी तिच्याशी प्रेमाच्या, हक्काच्या नात्याने वागते आहे. अशा व्यक्तीबरोबर तिला आपल्या मनातल्या भावना ‘शेअर’ करता येतील, ही भावना आत्महत्याप्रवृत्त व्यक्तीसाठी खूप आश्वासक असते.
त्यानंतर अशा व्यक्तीला समुपदेशकाकडे जाण्याबद्दल हळुवारपणे सुचवल्या जाऊ शकतं. त्यांच्या कुटुंबीयांना ‘त्या व्यक्तीला अधिक संवेदनशील वागणूक देण्याची गरज आहे’ असं सूचित केलं जाऊ शकतं. एखादी व्यक्ती भावनाविवश होऊन आत्महत्या करण्याबद्दल उघडपणे बोलत असेल तर अशा व्यक्तीला अजिबात एकटं सोडता कामा नये. त्याचे इतर कुटुंबीय आणि मित्रवर्गाला विश्वासात घेतलं पाहिजे.
आत्महत्येचा प्रयत्न करून वाचलेल्या व्यक्तींची मन:स्थिती
आत्महत्येचा प्रयत्न करून वाचलेली व्यक्ती आधी सुन्न होते आणि नंतर तिला मानसिक गोंधळ, स्वत:बद्दल राग आणि अपराधीपणाची भावना याला सामोरं जावं लागतं. तिच्या मनात एक द्वंद्व निर्माण होऊ शकतं. ‘आता पुढे काय’ हा प्रश्न भेडसावू लागतो. आयुष्याची गाडी परत रुळावर आणणं सोपं नसतं. शारीरिक आणि भावनिक जखमा भरून काढायला वेळ द्यावा लागतो. घरातल्या माणसांचा आधार आणि समजूतदारपणा अशा वेळेला अत्यंत महत्त्वाचा असतो. त्या व्यक्तीला भावनिक आधार देणे अत्यंत गरजेचे असते. त्याला त्याच्या अवस्थेबद्दल रागावणे, दोष देणे किंवा त्याच्यावर टीका करणे हे पूर्णपणे टाळले पाहिजे.
आत्महत्या झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या कुटुंब सदस्यांची आणि इतर स्नेही यांची मन:स्थिती
कुठल्याही आकस्मिक किंवा अपघाताती मृत्यूप्रमाणे आत्महत्येमुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या अगदी जवळच्यांना दु:ख, शोक, धक्का व अविश्वसनीयतेचा अनुभव अशी मन:स्थिती होते. त्याशिवाय त्यांना अत्यंत अपराधीपणाची भावना ग्रासून टाकते. त्या संबंधित व्यक्तीला आत्महत्येपासून रोखण्यात आपण अपयशी राहिलोत, ही भावना (सेन्स ऑफ फेल्युअर) भेडसावत असते. त्यांना हे वाटतं, की आपण आपल्या प्रियजनाला आपलं प्रेम आणि आधार देण्यात कमी पडलोय. अशा प्रकारे गेलेल्या व्यक्तीबद्दल रागाची भावनासुद्धा त्यांच्या मनात घर करून बसते. खूप गोंधळल्यासारखं वाटतं आणि मागे राहिलेले पुष्कळ मुद्दे अनुत्तरित राहतात. ही बाब त्यांच्या मनाला सतत सलते. अशा कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांच्या स्नेहींना भावनिक आधाराची प्रचंड गरज असते. मनातल्या सर्व भावनांना मोकळेपणाने सामोरं जात एका प्रकारच्या परिसमाप्तीची- क्लोझरची गरज त्यांना असते. त्यांनीसुद्धा अशा वेळेस समुपदेशकाकडे किंवा पूर्णपणे मन मोकळं करण्याचं ठिकाण असेल, तर तिथे गेले पाहिजे. आपण ज्या समाजात राहतो त्याचा घटक असलेली अशी व्यक्ती, जी आत्महत्याप्रवृत्त आहे किंवा आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या अगदी जवळची आहे, तिच्यासाठी आपण काही गोष्टी नक्की करू शकतो. तिला योग्य प्रकारे भावनिक आधार देणे आणि योग्य वेळ देत तिचे आधारस्थान होण्याचे प्रयत्न करणे मोलाचे ठरते.
मदत हवी असल्यास
हेल्पलाइन क्रमांक – ८४२२९८४५२८, ८४२२९८४५३०, ८४२२९८४५२९
लॉकडाउन असल्याने हेल्पलाइनच्या वेळांमध्ये झालेला बदल
(रोज संध्याकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत)
samaritans.helpline@gmail.com
talk2samaritans@gmail.com
(टीप: हा मूळ ५ ऑक्टोबर २०१९ रोजी ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ पुरवणीमध्ये ‘जगण्याकडे..’ या मथळ्याखाली छापून आला होता. १० ऑक्टोबरच्या जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवसानिमित्ताने मृणालिनी ओक यांचा हा विशेष लेख प्रकाशित करण्यात आला होता. हा मूळ लेख तुम्ही येथे क्लिक करुन वाचू शकता. )