Why Don’t Students Go to School on Weekends? : सहा-सात तासांची तासिका संपून घरी कधी जातोय, असं प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्याला वाटत असतं. याहीपुढे जाऊन सोमवार ते शुक्रवारचे/शनिवारचे दिवस संपून कधी एकदा शनिवार-रविवार येतो याची अनेक विद्यार्थी वाट पाहत असतात. कर्मचाऱ्यांप्रमाणेच विद्यार्थ्यांसाठीही रविवार हा हक्काचा दिवस असतो. पण सुटीसाठी रविवारचाच दिवस का निवडला असेल? जगभरातील सर्व विद्यार्थ्यांना रविवारीच का सुट्टी असते हे तुम्हाला माहितेय का? याचविषयी आपण जाणून घेऊयात.

खरंतर औद्योगिक क्रांतीनंतर कर्मचारी वर्गाला विश्रांती मिळावी याकरता रविवार सुटीची संकल्पना अस्तित्वात आली. अनेक कर्मचाऱ्यांना शनिवार-रविवार असे दोन दिवस सुट्टी असते. पण शनिवार रविवारच का? असाही प्रश्न उपस्थित होतो. यहुदी आणि ख्रिश्चन या दोन प्रमुख जागतिक धर्मांमध्ये या दिवसांचे महत्त्व असल्याने हे दिवस विकेंड म्हणून निवडले गेले. इस्लाममध्ये शुक्रवार हा उपासनेचा दिवस असल्याने बहुसंख्य मुस्लिम राष्ट्रे गुरुवार आणि शुक्रवारी विकेंड पाळतात. विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन दिवस सुटी का मिळते, यामागेही हेच कारण आहे. प्रत्येकाला विश्रांतीची आणि आरामाची गरज असते. म्हणूनच त्या त्या राष्ट्रांतील नियमांनुसार विकेंडला विद्यार्थ्यांना सुटी दिली जाते.

भारतात रविवारची सुटी केव्हा लागू झाली?

भारतीयांना रविवारची पहिली साप्ताहिक सुट्टी मिळाली होती ती १० जून १८९० रोजी. देश त्यावेळी पारतंत्र्यात होता, त्यामुळे ही सुटी कोण्या इंग्रज साहेबाने दिली असे आपल्याला वाटेल. मात्र तसे नसून नारायण मेघाजी लोखंडे या मराठी माणसाच्या प्रयत्नाने भारतीयांना ही सुटी मिळू लागली. यासाठी नारायण लोखंडे यांना तब्बल सहा वर्षाचा संघर्ष करावा लागला. १८८१ मध्ये भारतात फॅक्टरी अॅक्ट लागू झाला. या कायद्याने बालकामगारांचे किमान वय, आठवड्याच्या सुटीची तरतूद केली. मात्र महिला व प्रौढ कामगारांसाठी अशी तरतूद नव्हती. याविरोधात पहिला आवाज उठवला तो नारायण मेघाजी लोखंडे यांनी. १८८४ मध्ये नेमलेल्या फॅक्टरी कमिशनला लोखंडे यांनी ५३०० कामगारांच्या सह्यांचे निवेदन दिले. त्यात आठवड्यात एक दिवस सुटी, सूर्योदय ते सूर्यास्त ही कामाची वेळ, दुपारी अर्धा तास विश्रांती अशा मागण्यांचा समावेश होता. पण, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. लोखंडे यांनी आंदोलन सुरूच ठेवले. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आले आणि १० जून १८९० रोजी ‘रविवार’ हा साप्ताहिक सुटीचा दिवस म्हणून जाहीर झाला.

हाच नियम पुढे शालेय विद्यार्थ्यांसाठीही लागू झाला. भारतात काही शाळांमध्ये फक्त रविवारची सुटी आहे. तर, काही शाळांमध्ये शनिवार-रविवार असे दोन दिवस सुटी दिली जाते. शहरी आणि ग्रामीण भागातील शाळांमध्ये ही तफावत आढळते. तसंच, प्रादेशिक भाषांमधील शाळा आणि इंग्रजी माध्यमातील शाळांमध्येही ही सुटीची तफावत आढळते. तर अमेरिकेसारख्या अनेक देशांमध्ये सध्या शनिवार-रविवार असे दोन दिवस सुट्टीचे वार असून विद्यार्थ्यांना तीन दिवस सुट्टी मिळावी, अशी मागणी जोर धरतेय. सध्याच्या घडीला अमेरिकेतील अनेक शाळांनी चार दिवसांचा शालेय आठवडा सुरू केलाय. म्हणजेच, फक्त चारच दिवस शाळा भरते. शुक्रवार ते रविवार विद्यार्थ्यांना सुटी असते.