आपण अनेकदा रेल्वेने प्रवास करतो. या प्रवासादरम्यान आपल्याला रेल्वेशी निगडीत अनेक प्रश्न पडतात, ज्याची उत्तर आपल्याला माहित नसतात. असाच एक सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे रेल्वेचे डब्बे वेगवेगळ्या रंगांचे का असतात? ट्रेनचे डब्बे वेगवेगळ्या रंगांचे असणे हा डिझाईनचा भाग नसुन, त्यामागे त्या त्या रंगाचे एक कारण असते, ज्यामुळे त्या रंगांच्या डब्याचा काय अर्थ आहे हे स्पष्ट होते. रंगांनुसार काय असतो रेल्वेच्या डब्यांचा अर्थ जाणून घ्या.
रेल्वेच्या डब्यांचा रंगानुसार अर्थ
निळा रंग
रेल्वेचे डब्बे बहुतांश वेळा निळ्या रंगांचे असतात. बहुतेक रेल्वेच्या डब्ब्यांना निळा रंग दिला जातो. इंटीग्रल कोच फॅक्टरी तमिळनाडूमध्ये चेन्नई येथे आहे. भारतीय रेल्वेमध्ये जनरल, एसी, स्लीपर, डेमु, मेमू या प्रकारचे कोच असतात. यासाठी बहुतांश वेळा निळ्या रंगांचा वापर केला जातो. मेल एक्सप्रेस आणि सुपरफास्ट ट्रेनमध्ये या निळ्या रंगांच्या डब्ब्यांचा वापर केला जातो.
लाल रंग
विशेष प्रकारच्या डब्ब्यांसाठी लाल रंगाचा वापर केला जातो. लाल रंगांचे हे डब्बे २००० साली जर्मनीतून भारतात आणण्यात आले. या प्रकारच्या डब्ब्यांना ‘लिंक हॉफमेन बुश’ (LHB) म्हटले जाते. हे डबे ॲल्युमिनियमचे बनलेले असून इतर डब्यांच्या तुलनेत याचे वजन कमी असते. त्यामुळे यांचा वेग जास्त असतो. या प्रकारचे डबे असणाऱ्या गाड्यांचा वेग १६० किमी ते २०० किमी प्रतितास असतो. तसेच यामध्ये डिस्क ब्रेकही उपलब्ध असतात. राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेसमध्ये या डब्यांचा वापर केला जातो. सध्या हे डबे पंजाबमधील कपूरथला येथे बनवण्यात येत आहेत.
हिरवे, तपकीरी रंगाचे कोच
हिरव्या रंगाचे डबे गरीबरथमध्ये वापरण्यात येतात. तर तपकिरी रंगांचे डबे मीटरगेज गाडयांमध्ये वापरण्यात येतात. काही रेल्वे झोनकडुन त्यांच्या झोनमधील ट्रेनसाठी रंगांची निवड केली आहे. त्यानुसार वेगळे रंग पाहायला मिळतात.