भारतात अनेक राज्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या दिवसात वर्षभर कोरडी असलेल्या जमिनीवर अचानक हिरवे गवत उगवलेले दिसते. तसेच आधीच हिरवेगार गवत होते तिथे अधिक दाट गवत उगवते. उदाहरण द्यायचे झाल्यास उद्यानात पावसाळ्यात मोठ्या गवताची रोपटी उगवतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, वर्षभर मोकळ्या दिसणाऱ्या जमिनीवर पावसाळ्यात हे गवत येते कुठून? पावसाच्या थेंबात असे काही घटक असतात का की ज्यामुळे कोरड्या जमिनीवर गवत उगवते? जाणून घ्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे…
पावसाळ्यात मोकळ्या जमिनीवर गवत कसे उगवते?
पावसाळ्यात मोकळ्या शेतात हिरवीगार गवताची रोपे उगवतात, ही एक सामान्य गोष्ट आहे. जे वनस्पतिजन्य प्रसारामुळे होते. शेतात आजूबाजूला जुन्या गवताचे सुकलेले देठ पडलेले असतात. या सुक्या देठांमध्ये कळ्या असतात, ज्या सुप्त अवस्थेत असतात. या कळ्यांना पावसाचे पाणी मिळाल्याने त्या सक्रिय होतात आणि वाढतात आणि नवीन गवताची रोपे तयार होतात. त्यामुळे वनस्पतिवृद्धीच्या पद्धतीने पावसानंतर जमिनीवर हिरवेगार गवत उगवते, तर दुसरीकडे पाऊस थांबल्यानंतरही हे गवत हिरवेगार दिसते.
पावसानंतरही गवत हिरवेगार कसे दिसते?
पाऊस पडल्यानंतर गवत खूप हिरवेगार दिसते. पावसामुळे गवत हिरवे होण्यामागे अनेक कारणे आहेत. यावर मृदा शास्त्रज्ञ जेनिफर नोएप यांनी दोन मुख्य कारणे सांगितली आहेत. या दोन्ही कारणांमध्ये नायट्रोजनचा समावेश आहे. पाऊस पडल्यानंतर वनस्पतींसाठी जमिनीत अधिक पाणी उपलब्ध असते, जेव्हा वनस्पती हे पाणी शोषून घेते तेव्हा ते जमिनीतील सेंद्रिय पदार्थांपासून नायट्रोजनदेखील घेत असते.
हा सारा नायट्रोजनचा खेळ
जसजशा वनस्पती वाढतात, तसतशी त्यांची लहान मुळे मरतात आणि नवीन मुळे वाढतात, जेव्हा असे होते, तेव्हा मातीतील सूक्ष्मजंतू मृत मुळांच्या कुजण्याचे कारण ठरतात. ही प्रक्रिया गवताला खत घालण्यासारखी असते. पण ही क्रिया तुमच्या हस्तक्षेपाशिवाय भूमिगत आणि नैसर्गिकरीत्या घडते. वनस्पतीची मुळे मोठ्या रासायनिक संयुगाने बनलेली असतात, ज्यात बहुतेक कार्बन असतात परंतु काही नायट्रोजनदेखील असतात. मृत मुळे विघटित करण्यासाठी मातीचे सूक्ष्मजीव कार्बन आणि काही नायट्रोजन वापरतात. असे होत असताना, नायट्रोजनचा एक भाग टाकाऊ पदार्थ म्हणून परत जमिनीत सोडला जातो.
माती जेव्हा पावसाचे पाणी शोषून घेते तेव्हा ती सूक्ष्मजंतूंना अधिक नायट्रोजन सोडण्यासाठी सक्रिय करते, नुकत्याच पडलेल्या पावसाचा गवताला फायदा होतो, कारण पाण्याच्या प्रवाहामुळे गवताच्या मुळांना या नवीन नायट्रोजनबरोबरच सूक्ष्मजीवांनी पूर्वी सोडलेले नायट्रोजन घेता येते. जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा गवत प्रकाशसंश्लेषणासह खूप सक्रिय होते, असेही नोएप यांनी स्पष्ट केले.
नोएप म्हणाले की, पावसात नायट्रोजनचे कण किती असतात, हे अनेक घटकांवर अवलंबून असते. तुम्ही कुठे राहता (ईशान्येत पडणाऱ्या पावसात आग्नेय भागातील पावसापेक्षा जास्त नायट्रोजनचे कण असतात), तो भाग किती कोरडा आहे आणि तुमच्या भागात पडणारा पाऊस कुठून येतो, अशा अनेक गोष्टींवर बरेच काही अवलंबून आहे.