Fire Paan: पूर्वीच्या काळी आपल्या देशामध्ये जेवणानंतर नियमितपणे पान खाण्याची परंपरा होती. आजही बऱ्याच ठिकाणी वयस्कर मंडळी जेवण करुन शतपावली करण्याआधी पान तयार करुन ठेवतात आणि चालताना पानाचा आनंद घेतात. उत्तर भारतामध्ये पान खाण्याची मोठी प्रथा आहे. तेथे निरनिराळ्या प्रकारचे खायचे पान पाहायला मिळतात. त्यामध्ये फायर पानचा देखील समावेश असतो. हे पान तयार करणारी व्यक्ती पानाला आग लावून ग्राहकाच्या तोंडामध्ये कोंबत असते.
सोशल मीडियामुळे फायर पान या गोष्टीची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी फायर पान खाल्ले असेल हे नक्की. जर ते खाल्ले नसेल, तर ते एकदा तरी खाऊन पाहावे असा विचार त्या व्यक्तीच्या मनात आला असेलच. मुंबई, पुणे, दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये विविध ठिकाणी फायर पानचे स्टॉल्स आढळतात. काही ठिकाणी जत्रेमध्ये फायर पान हे खास आकर्षण असते. पण कधीतरी फायर पान खाल्यावर तोंड आतून भाजत का नाही असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? या प्रश्नाचे उत्तर आम्ही देणार आहोत.
फायर पानाची किंमत
फायर पान आज ट्रेंडमध्ये आहे. अनेक लोक फायर पान खाणे पसंत करतात. त्यातील बहुंताशजण हे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी फायर पान खात असतात. देशातील बऱ्याच शहरांमध्ये फायर पान असणारे स्टॉल्स पाहायला मिळतात. सर्वसाधारण छोट्या स्टॉल्सवर या पानाची किंमत २० ते ३० रुपये इतकी असते. तर काही ठिकाणी हे फायर पान २०० ते ६०० रुपयांना मिळते. शौकीन मंडळी पान खाण्यासाठी पैसे खर्च करत असल्याने या फायर पानाची किंमत वाढत आहे.
फायर पान खाल्यावर आग का लागत नाही?
वाटलेली लवंग, सुका मेवा आणि साखर यांचे मिश्रण असते. या मिश्रणाला आग लावली जाते. ही आग २-३ सेकंदांमध्ये आपोआप विझते. त्यामुळे पान खाल्यावर तोंड भाजत नाही. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास आग लावल्यावर पान बनवणारी व्यक्ती आग विझण्यापूर्वी पान ग्राहकाच्या तोंडात टाकत असते. ती आग तोंडात जाईपर्यंत आपोआप विझत असते.