‘शास्त्र’ असतं ते.. : सुधा मोघे – सोमणी मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग
उत्तर : पत्रे उडून जाण्यामागे कारण आहे बर्नोलीचे सिद्धांत. भौतिकशास्त्रातला अतिशय महत्त्वपूर्ण सिद्धांत ज्याचा वापर आपण अनेक ठिकाणी करतो. हा सिद्धांत कोणत्याही द्रवाच्या प्रवाहाविषयी भाष्य करतो. सोप्या शब्दांत सांगायचे तर समांतर पातळीत प्रवाहित होणाऱ्या द्रवाचा वेग जिथे जास्त असेल तिथे दाब कमी असतो व वेग जिथे कमी असेल तिथे दाब जास्त असतो.
वादळ असताना घराच्या छतावरून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग प्रचंड (१००-२०० ताशी किमी) असतो व त्यामुळे हवेचा दाब कमी असतो. घर बंदिस्त असल्याने आतील हवेचा वेग अतिशय कमी व म्हणून दाब जास्त असतो. हवेच्या प्रवाहाची दिशा नेहमी उच्च दाबाकडून कमी दाबाकडे असते.
आतील जास्त दाबामुळे पत्र्यांवर बाहेरच्या (वरच्या) दिशेने बल प्रयुक्त होते. पत्र्यांवर गुरुत्वाकर्षण बल (म्हणजेच पत्र्यांचे वजन) खालच्या दिशेने प्रयुक्त होत असते. जेव्हा वरच्या दिशेने प्रयुक्त होणारे बदल या गुरुत्वाकर्षणापेक्षा अधिक असते तेव्हा हे पत्रे उडून जातात.