प्रत्येकजण आपल्या आवडत्या व्यक्तीवरील प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतो. शिवाय आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, त्याला ते सांगण्याची अर्थात प्रपोज करण्याचीही प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. कोणी थेट हातात गुलाबाचं फूल घेऊन आपल्या प्रिय व्यक्तीसमोर जाऊन मनातील भावना व्यक्त करतो, तर कोणी सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपलं प्रेम व्यक्त करतो. जगभरात प्रेम व्यक्त करण्याच्या विविध पद्धती आहेत. अशीच एक अनोखी पद्धत जपानमध्ये आहे. येथील लोक आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करतात. जपानी लोक प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना गुलाब किंवा गिफ्ट न देता आपल्या प्रिय व्यक्तीच्या शर्टचं दुसरं बटण मागतात. तर प्रेम व्यक्त करण्यासाठी शर्टचं बटण मागण्याची प्रथा नेमकी काय आहे, त्याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मुली अशा गोष्टी का करतात?
खरं तर जपानमध्येही प्रेम व्यक्त करण्याच्या अनेक पद्धती आहेत, ज्या जगापेक्षा वेगळ्या आहेत. याच अनेक पद्धतीपैकी एक आहे ती म्हणजे शर्टचं दुसऱ्या नंबरचं बटण मागण्याची. japanupmagazine च्या वृत्तानुसार, जपानमध्येही कॉलेजचे शिक्षण संपल्यानंतर निरोप समारंभाच्या दिवशी मुली आपल्या आवडत्या मुलाच्या शर्टचे दुसरे बटण मागतात. परंतु, जर एखाद्या मुलाच्या शर्टचे बटण आधीपासून गेलेले असेल, तर तो मुलगा अनेक मुलींच्या आवडीचा किंवा तो कॉलेजमध्ये लोकप्रिय असल्याचं समजलं जातं. तसेच मुलालाही समोरची मुलगी पसंत असेल तर तो आपल्या शर्टचे बटण काढून देतो, ज्यामुळे ते एकमेकांचे जोडीदार बनतात.
हेही वाचा- कार्यवाही आणि कारवाई हे शब्द कधी वापरले जातात? दोन्ही शब्दांमधला नेमका फरक काय?
कशी सुरू झाली ही अनोखी प्रथा ?
जपानमध्ये ही प्रथा सुरू होण्यामागे दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, युद्धावर जाणारे सैनिक आपल्या गणवेशाचे दुसरे बटण, आठवण म्हणून आपल्या पत्नीला किंवा प्रेयसीला (प्रिय व्यक्तीला) द्यायचे. कारण युद्धावर जाणारे लोक पुन्हा जिवंत घरी येतील का? याची शाश्वती नसे. तेव्हापासून आपल्या प्रिय व्यक्तीला शर्टचे दुसरे बटण देण्याची पद्धत सुरू झाली.
दुसरे बटणच का मागतात –
तर मुली आपल्या आवडत्या मुलाच्या शर्टचे दुसरे बटणच का मागतात, तिसरे किंवा चौथे का मागत नाहीत, याच्या मागेही एक कारण आहे. ते म्हणजे आपल्या शर्टचे दुसरे बटण हृदयाजवळ असते. याचा अर्थ आपल्या हृदयातील व्यक्तीला हृदयाजवळचे बटण दिल्याने एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलं जातं, असं मानलं जातं.