April Fools’ Day 2023: १ एप्रिल हा दिवस दरवर्षी ‘एप्रिल फूल्स डे’ म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये ब्रिटीशांमुळे ही गोष्ट प्रसिद्ध झाली असे म्हटले जाते. ऐंशी-नव्वदच्या दशकामध्ये तरुणाईवर पाश्चिमात्य विचाराचा मोठा पगडा होता. त्या काळामध्ये आपल्या देशात ‘मदर डे’, ‘फादर डे’, ‘व्हॅलेंटाईन डे’ अशा संकल्पना उदयास आल्या. यांमधील एक संकल्पना म्हणजे ‘एप्रिल फूल्स डे’ होय. या दिवशी मित्रमंडळी, परिवारातील सदस्य मिळून एकमेकांची मस्करी करत असतात. गंमतीमध्ये एकमेकांना मूर्ख बनवतात. डिजिटल युगामध्ये लोक विनोदी मीम्स, व्हिडीओ रिल्स शेअर करत हा दिवस साजरा करताना दिसतात.
युरोप खंडातील अनेक देशांमध्ये हा दिवस एका सणाप्रमाणे साजरा केला जातो. तेथे ही प्रथा फार पूर्वीपासून चालत आली आहे. पण याची सुरुवात कशी झाली याबाबतची माहिती फार कमी लोकांना ठाऊक आहे. १३८१ मध्ये पहिल्यांदा एप्रिल फूल्स डे साजरा केला असा काहींचा समज आहे. या दिवसाशी निगडीत काही मनोरंजक कथा युरोपामध्ये प्रचलित आहेत.
एप्रिल फूल्स डेचा इतिहास
सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये झालेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे एप्रिल फूल्स डेला सुरुवात झाली असे बऱ्याच लोकांचे मत आहे. असे म्हटले जाते की, तेव्हा युरोप खंडामध्ये ज्युलियन कॅलेंडरचा वापर केला जात होता. यानुसार नववर्षाची सुरुवात १ एप्रिल रोजी होत असे. पुढे पोप ग्रेगरी यांनी ग्रेगरियन कॅलेंडरची संकल्पना मांडली. या संकल्पमध्ये १ जानेवारी रोजी नवीन वर्ष सुरु होईल असा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला मान्यता मिळाली. हे नवे कॅलेंडर वापरणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला. त्यानंतर युरोपभर ग्रेगरियन कॅलेंडरबद्दल प्रसार करण्यात आला.
तेव्हा काही लोक ज्युलियन कॅलेंडरचा वापर करत १ एप्रिलला नववर्ष साजरा करत होते. युरोपमधील बहुतांश लोकांनी ग्रेगरियन कॅलेंडरचा (Gregorian calendar) अवलंबन केले होते. त्यामुळे हे लोक ज्युलियन कॅलेंडरचे पालन करणाऱ्या लोकांना मूर्खात काढत त्यांची मस्करी करत होते. अशा घटना युरोपामध्ये सुरुवातीची अनेक वर्ष घडत होत्या. पुढे कालांतराने काही लोकांनी केलेल्या चुकीमुळे युरोपामध्ये एप्रिल फूल्स डेची प्रथा कायम झाली. कालांतराने वसाहतवादाच्या प्रभावामुळे ती संकल्पना जगभरात पसरली.
आणखी वाचा – ट्रेनमधून सामान चोरीला गेले तर काय करावे? रेल्वे देते नुकसान भरपाई, करा हे काम
काही देशांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याची पद्धत आहे. फ्रान्समध्ये लहान मुले पाठीवर कागदी मासा जोडून एकमेकांच्या खोड्या काढतात. १ एप्रिलला स्कॉटलॅंडमध्ये ‘किक मी’ (Kick me) असा खेळ खेळला जातो. न्यूयॉर्कमध्ये १९८६ पासून एप्रिल फूल्स डे साजरा केला जात आहे.