लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपला वाढदिवस साजरा करायला आवडतं. प्रत्येकजण आपापल्या परीने वाढदिवस साजरा करत असतो. या दिवशी कोणी आपल्या मित्रांना महागड्या हॉटेलमध्ये पार्टी देतं, तर कोणी साध्या पद्धतीने घरात वाढदिवस साजरं करतं. वाढदिवस कुठेही आणि कसाही साजरा करायचा असो, त्यासाठी दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात; त्या म्हणजे केक आणि मेणबत्त्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणाचाही वाढदिवस केक कापल्याशिवाय पूर्ण होत नाही. संपूर्ण जगभरात सामान्यपणे असाच वाढदिवस साजरा केला जातो. वाढदिवस साजरा करताना मेणबत्त्या विझवण्याची प्रथादेखील आहे. तुम्हालाही तुमचा वाढदिवस अशाच पद्धतीने साजरा करायला आवडत असेल यात शंका नाही. पण, तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का की, आपण केक कापून आणि मेणबत्त्या लावूनच वाढदिवस का साजरा करतो? तसेच ही प्रथा कधी आणि कशी सुरू झाली? जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती नसतील, तर आज आम्ही तुम्हाला ती सांगणार आहोत.

हेही वाचा- सांताक्लॉज खरंच कुणी व्यक्ती होती का? ख्रिसमसनिमित्त भेटवस्तू देण्याची परंपरा कुठून सुरू झाली? जाणून घ्या… 

पौराणिक कथांनुसार, रोमन संस्कृतीत, लग्नासारख्या विशेष प्रसंगी पाहुण्यांना केक कापून दिला जायचा. सुरुवातीला हे केक पीठ, मध आणि काजू यांसारख्या घटकांपासून सपाट आणि गोलाकार आकारात बनवले जायचे. मात्र, १५ व्या शतकात, जर्मन बेकरींमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी सिंगल-लेअर केक बाजारात आणले गेले. तेव्हापासून केक केवळ लग्नसमारंभात कापतात हा समज मोडीत काढून तो वाढदिवसाला कापण्याचीही परंपरा निर्माण झाली.

कालांतराने केकमध्ये अनेक बदल झाले आणि आधुनिक केक १७ व्या शतकानंतर सुरू झाले. या केकवरती क्रीमचा लेप देण्यात आला, तसेच ते वेगवेगळ्या आकारातही उपलब्ध होऊ लागले. दरम्यान, १९ व्या शतकाच्या मध्यात, अगदी पश्चिम युरोपिय देशांनीही वाढदिवसानिमित्त केक कापायला सुरुवात केली आणि काही काळातच ही परंपरा जगभर पसरली.

हेही वाचा- चित्रपटगृहात मोक्याची खुर्ची कोणती, हे कसं ठरतं?

वाढदिवसाच्या मेणबत्त्यांमागची गोष्ट

वाढदिवसाला मेणबत्त्या पेटवून विझवण्याबाबतचे अनेक प्राचीन सिद्धांत आहेत. यातील पहिला ग्रीक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार, वाढदिवसाला मेणबत्त्या पेटवण्याची परंपरा देवी आर्टेमिसच्या जन्माची पूजा करण्यासाठी मेणबत्त्या पेटवल्या जायच्या प्रथेशी जोडलेली आहे.

दुसर्‍या सिद्धांतानुसार, मेणबत्त्या विझवण्याची परंपरा स्वित्झर्लंडमध्ये १८८१ मध्ये सुरू झाली. त्या काळातील लोक अनेक अंधश्रद्धा पाळायचे. ते केकवरील मेणबत्त्यांची संख्या व्यक्तीच्या वयाएवढी ठेवायचे आणि ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्याला एक एक मेणबत्ती विझवायला सांगायचे.

मेणबत्त्या पेटवण्याबाबतचा तिसरा सिद्धांत मूर्तिपूजकांकडून येतो. त्यांच्या मते, वाढदिवसाच्या मेणबत्त्यांमध्ये प्रतीकात्मक शक्ती असते. पूर्वीच्या काळात असे मानले जायचे की, वाईट आत्मे लोकांच्या वाढदिवशी येतात आणि या आत्म्यांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी मेणबत्त्या पेटवल्या जायच्या.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is cake cut on birthdays how did the practice of blowing out candles begin learn the history jap
Show comments