आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये जेवण तयार करण्यासाठी गॅस शेगडीचा वापर केला जातो. गॅस वापरण्यासाठी एलपीजी गॅस सिलेंडर असणे आवश्यक असते. आता बऱ्याचजणांकडे गॅस कनेक्शनची सेवा उपलब्ध आहे. यांच्याद्वारे शेगडीसाठी वापरली जाणारी गॅस थेट पाईपच्या मदतीने वापरणे शक्य होते. असे असले तरीही अनेकांकडे ही सोय उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळते. यामुळे गॅस कनेक्शनची सोय उपलब्ध नसलेल्या लोकांच्या घरी आजही गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. आपल्या घरामध्ये असणारा हा एलपीजी सिलेंडर लाल रंगाचा का असतो असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?
एलपीजी सिलेंडर लाल रंगाचाच का असतो?
गॅस सिलेंडरचा वापर फक्त भारतातच नाही, जर जगभरातल्या अनेक देशांमध्ये केला जातो. या सिलेंडर्समध्ये ज्वलनशील गॅस भरलेली असते. परिणामी त्याला आग लागण्याची अधिक शक्यता असते. अशा वेळी धोका दर्शवण्यासाठी या गोलाकार सिलेंडर्सना लाल रंग देण्यात येते. लाल रंग धोक्याचे प्रतीक आहे असे मानले जाते. हे सिलेंडर हाताळताना लोकांनी अधिक सावधान राहावे हेदेखील यामागील कारण असू शकते. लाल रंगात असलेली गोष्ट फार लांबून पाहता येत असल्यानेही हा रंग वापरला जातो असे म्हटले जाते.
एलपीजी व्यतिरिक्त अन्य गॅस सिलेंडर्सदेखील निरनिराळ्या रंगांचे असतात. यातील हेलिअम गॅसचे सिलेंडर्स तपकिरी रंगाचे असतात. कार्बन डायऑक्साइड असलेले गॅस सिलेंडर राखाडी रंगाचे असतात. नाइट्रस ऑक्साइड नावाची गॅस ज्या सिलेंडरमध्ये ठेवली जाते, ते सिलेंडर्स निळ्या रंगाचे असतात.
आणखी वाचा – भारतीय चित्रपटातील रोमँटिक सीन्स काळानुरूप कसे बदलत गेले? जाणून घ्या
सिलेंडरचा आकार नेहमी गोल का असतो?
एलपीजी गॅस ही ज्वलनशील असते. दबाव टाकून ती गॅस सिलेंडरमध्ये साठवणे आवश्यक असते. अशा वेळी गॅसचा गोलाकार असल्यास हे काम सोपे होते. यामुळे गॅस सिलेंडर्सचा आकार नेहमी गोल असतो. याशिवाय या विशिष्ट आकारामुळे सिलेंडर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे अधिक सोईस्कर होते.