विमानातून प्रवास करताना वैमानिक, विमानातील कर्मचारी आणि प्रवासी सर्वांचीच सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. एखाद्या छोट्या चुकीमुळेही अनेकांचा जीव धोक्यात जावू शकतो. त्यामुळे विमानातून प्रवास करताना विविध नियम आणि अटी आहेत. यातील एक महत्त्वाचा नियम म्हणजे प्रवाशांना फ्लाइटमध्ये मर्क्युरी थर्मामीटर (पाऱ्याचा वापर केलेली तापमापी) घेऊन जाण्याची परवानगी नाही. त्याऐवजी प्रवासी आपल्यासोबत डिजिटल थर्मामीटर घेऊन जाऊ शकतात. पण फ्लाइटमध्ये मर्क्युरी नेण्यास बंदी आहे.
एखाद्या प्रवाशाने विमानात मर्क्युरी थर्मामीटर नेला आणि तो तुटला तर विमानाचा अपघातही होऊ शकतो? ‘आवाज टीव्ही हिंदी’ने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, मर्क्युरी अर्थात पारा हा असा एकमेव धातू आहे, जो सामान्य तापमानाला द्रव स्वरुपात आढळतो. कोणताही इतर धातू मर्क्युरीच्या संपर्कात आला तर तो धातू विरघळून त्याचा मिश्रधातू तयार होतो, हा मर्क्युरीचा गुणधर्म आहे. या रासायिनक प्रक्रियेला ‘Amalgamation’ असं म्हणतात.
विमानाचा ७० ते ८० टक्के भाग अल्युमिनियम धातूपासून बनवलेला असतो, त्यामुळे मर्क्युरीचा विमानाशी संपर्क आल्यास विमानात छिद्र पडण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मोठा विमान अपघातही होऊ शकतो. या कारणास्तव कुणालाही विमानात मर्क्युरी थर्मामीटर घेऊन जाण्याची परवानगी नसते.
विमानात बंदी असलेल्या इतर वस्तू
‘इंडिगो’ वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, विमानात ब्युटेन ऑक्सिजन, द्रव नायट्रोजन, एक्वालंग सिलिंडर आणि कॉम्प्रेस गॅस सिलेंडर सारखे ज्वलनशील आणि विषारी पदार्थ विमानात घेऊन जाण्यास परवानगी नाही. तसेच अॅसिड, अल्कली, मर्क्युरी (पारा) आणि मर्क्युरीचा वापर केलेली अन्य क्षरणकारी पदार्थ विमानात घेऊन जाण्यात बंदी आहे.