हत्ती हा अनेकांचा आवडता प्राणी. मोठे कान, अवाढव्य शरीर, लांब सोंड, छोटे डोळे यांमुळे हत्ती इतर प्राण्यांपेक्षा वेगळा वाटतो. हत्तीला एक लांब सोंड असते ज्याने तो अन्न उचलतो आणि तोंडात टाकतो. पण हत्तीची ही सोंड लांबच का असते किंवा इतर प्राण्यांना अशी सोंड का नाही तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर घ्या जाणून…
हेही वाचा- दैनंदिन वापरातील गूळ नेमका कसा तयार होतो माहिती आहे का? वाचा…
इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार हत्तीच्या नाकालाच सोंड म्हणतात. या सोंडेद्वारेच ते श्वास, वास घेत असतात. अन्न उचलण्यासाठीही हत्ती याच सोंडेचा वापर करतात. हत्तीच्या या सोंडेचा विकास होण्यासाठी लाखो वर्षे लागली आहेत. सुरुवातीला हत्तीचा जबडा खूप मोठा होता; परंतु जसजशी त्यांची सोंड वाढत गेली, तसतसा त्यांच्या जबड्याचा आकार कमी होत गेला.
हत्तीच्या सोंडेचा आकार हा शास्त्रज्ञांसाठी कुतुहलाचा विषय आहे. यासाठी संशोधकांनी मध्यनूतन (मियोसिन इपोच) युगादरम्यान पृथ्वीवर जिवंत असणाऱ्या प्राचीन हत्तीसदृश प्राण्यांच्या गटाचा आभ्यास केला आहे. २३ दशलक्ष वर्षांपूर्वीपासून ५० दशलक्ष वर्षांपूर्वीपर्यंत हत्तींच्या शरीरात मोठ्या प्रमाणात बदल होत गेले आहेत. मुख्यत: त्यांच्या नाकाच्या रचनेत मोठा बदल झाल्याचे पहायला मिळाले. तसेच हत्तीच्या जबडा आणि दातांच्या रचनेतही बदल झाला आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे बदल योगायोगापेक्षा जास्त होते.
हेही वाचा- दैनंदिन वापरातील गूळ नेमका कसा तयार होतो माहिती आहे का? वाचा…
या बदलांमुळे हत्तीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवरही मोठा परिणाम झाला आहे. या बदलामुळे हत्ती विस्तीर्ण गवताळ प्रदेशात वावरताना त्यांच्या जबड्यापेक्षा त्यांच्या सोंडेचा अधिक वापर करू लागले. त्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी उत्तरी चीन भागात राहणाऱ्या हत्तींच्या जीवनशैलीवर खास संशोधनही करण्यात आले. या संशोधनातून समोर आले की, काळानुसार हत्तींच्या जेवण करण्याच्या पद्धतीतही मोठ्या प्रमाणात बदल झाला होता. एकेकाळी लांब जबडे आणि दातांचा वापर करणारे हत्ती आता त्यांच्या वाढणाऱ्या सोडेंचा वापर करू लागले होते. या संशोधनात हत्तीचा जबडा आणि सोंड यांच्या विकासाबरोबरच त्या काळी झालेल्या पर्यावरण बदलांचाही अभ्यास करण्यात आला होता.
हेही वाचा-‘गौडबंगाल’ हा शब्द मराठी भाषेला कसा मिळाला? काय आहे नेमका अर्थ?
एकूणच त्या काळी पृथ्वीवर असणाऱ्या वातावरणाचा प्राण्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. काळानुसार प्रत्येक प्राण्याच्या शरीरात बदल होत गेले. हत्तींच्या शारीरिक बदलांमागे पृथ्वीवरील वातावरणाचा मोठा वाटा आहे. पुरातन काळातल्या हत्तींचा आकार आताच्या हत्तींपेक्षाही अवाढव्य होता. त्यांच्या दातांचे वजन कित्येक पटींनी जास्त होते. पण, काळानुसार जसे मानवाच्या शरीरात बदल होत गेले, तसेच हत्तीच्या शारीरिक रचनेतही बदल झालेले बघण्यात आले आहेत.