सिग्नल माहीत नसणारी व्यक्ती भेटणे दुर्मीळच आहे. सिग्नल ही यंत्रणा रेल्वे-रस्ते वाहतूक यांच्यासाठी विशेषत्वाने वापरली जाते. या सिग्नल यंत्रणेत कायम लाल, पिवळा आणि हिरवाच रंग वापरला जातो. पूर्ण जगभर सिग्नल यंत्रणेसाठी हेच तीन रंग वापरले जातात. पण, सिग्नल यंत्रणा का निर्माण झाली? पहिला सिग्नल कधी निर्माण झाला ? लाल, पिवळा आणि हिरवा हे तीन रंगच का वापरले जातात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
पहिला सिग्नल कुठे निर्माण झाला ?
आपण रस्त्यावर आणि रेल्वेमार्गावर सिग्नल बघतो. जगातील कोणत्याही शहरात रस्त्यावर किंवा रेल्वे मार्गावर सिग्नल दिसतील. या सिग्नलमध्ये लाल, पिवळा आणि हिरवा हेच तीन रंग वापरले जातात. काहींच्या मते, १८९०च्या दशकात लंडनमध्ये ब्रिटिश पार्लमेंट हाऊसजवळ सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. रेल्वे अभियंता जे. के. नाईट यांनी या सिग्नल्सची निर्मिती केली. ‘रीडर्स डायजेस्ट’नुसार १९२० च्या दशकात रस्त्यावरील प्रवासी वाढल्यामुळे युनायटेड स्टेट्समध्ये पहिला ट्रॅफिक लाईट्स बसवण्यात आले. त्यानंतर विल्यम पॉट्स या अभियांत्रिकाने पहिल्यांदा तीन रंगाचा आणि चार दिशांहून येणारी वाहतूक नियंत्रित करणारा सिग्नल तयार केला. वाहतूककोंडीमुळे पोलिसांवर येणारा ताण यामुळे कमी झाला. डेट्रॉईट, मिशिगन मधील वुडवर्ड अव्हेन्यू आणि फोर्ट स्ट्रीट येथे प्रथमच चार-दिशात्मक ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले. परंतु, तेव्हा युनायटेड स्टेट्स मध्ये विविध ट्रॅफिक नियंत्रण करणाऱ्या प्रणाली होत्या. त्यामुळे वाहनचालकांमध्ये साशंकता निर्माण होत असे. वाहनचालकांना समस्या निर्माण होऊ नये म्हणून फेडरल हायवे अॅडमिनिस्ट्रेशनने १९३५ मध्ये “युनिफॉर्म ट्रॅफिक कंट्रोल डिव्हायसेस’ तयार केले. त्याने सर्व रस्ते चिन्हे, वाहतूक खुणा आणि ट्रॅफिक सिग्नलसाठी एकसमान चिन्हे आणि मानके ‘सेट’ केली. त्यांनी लाल, पिवळा आणि हिरवा हे रंग निश्चित केले.
हेही वाचा : कायदा पुरुषांबाबत पक्षपाती आहे का ? महिलांना असणाऱ्या हक्क-अधिकारांचा गैरवापर होतोय ?
रंगांमागचा इतिहास काय आहे?
रस्त्यावर वाहतुकीसाठी सिग्नल निर्माण होण्याआधी रेल्वेमार्गावर सिग्नलची निर्मिती करण्यात आली होती. तत्कालीन रेल्वे कंपन्यांनी लाल म्हणजे थांबा, पांढरा म्हणजे जाण्यास योग्य आणि हिरवा म्हणजे सावधगिरीचा इशारा असे रंग ठरवले होते. परंतु, पांढरा रंग हा प्रकाशात दिसत नसे. हिरवा आणि लाल हे दोन्ही रंग सहज दिसत. पांढऱ्याच्या ऐवजी पिवळा रंग निवडण्यात आला. पिवळ्या रंगाचा अर्थ सावधगिरीचा इशारा असा ठरवण्यात आला. त्यामुळे रस्त्याच्या कडेला पिवळ्या रंगाच्या पट्ट्या दिसतात.
हेही वाचा : मुलींसाठी गुलाबी रंग का वापरला जातो ? ‘पिंक’ रंग मुलांसाठी होता का ?
थांबण्यासाठी लाल रंग का निवडला गेला?
लाल रंग हा सर्वात लांब तरंगलांबी असलेला रंग आहे. याचा अर्थ असा की, तो हवेच्या रेणूंमधून प्रवास करत असताना, इतर रंगांपेक्षा कमी प्रमाणात पसरतो. त्यामुळे तो लांब अंतरावरूनही दिसतो. लाल-हिरव्या-पिवळ्या रंगांना उच्च दृश्यमानता असते.
पिवळ्या रंगाची तरंगलांबी लाल रंगापेक्षा कमी असते. परंतु, हिरव्यापेक्षा जास्त तरंगलांबी असते. याचा अर्थ असा की, लाल सर्वात दूर दृश्यमान आहे. मध्यभागी पिवळा आणि कमीत कमी अंतरावर हिरवा दिसतो.
कोणत्याही धोकादायक गोष्टीमध्ये थांबणे आवश्यक आहे. त्यामुळे लाल रंग हा सर्वात वर असतो. अन्यही ठिकाणी धोका असेल, तर लाल रंगाचा वापर केला जातो. पिवळा रंग हा सावधगिरीसाठी वापरला जातो. शाळेच्या भागात, शाळेच्या बस, रुग्णालये अशा ठिकाणी पिवळ्या रंगाचा वापर करतात. सिग्नल बंद असतानाही पिवळा रंगाचा लाईट चमकत असतो. याचा अर्थ सावधगिरी बाळगा असा होतो. हे तिन्ही रंग कोणत्याही हवामानात, प्रकाशात दिसतात. त्यामुळे या तीन रंगांची निवड करण्यात आली.