आपल्या देशातील बऱ्याचशा गावांमध्ये हापशी म्हणजेच बोअरवेलच्या हॅंडपंपद्वारे पाणी काढून त्याचा वापर केला जातो. सुरुवातीला यासाठी शारीरिक मेहनत घेत पाणी काढावे लागत असे. पुढे कालांतराने विद्युत उपकरणांमुळे बोअरवेलमधून पाणी काढणे सोपे झाले. असे असले तरी आजही काही गावांमध्ये पारंपारिक हापशीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरते. या पाण्याला भूजल (Ground water) असे म्हटले जाते. हे पाणी हॅंडपंपच्या मदतीने बाहेर काढले जाते. हापशीच्या पंपातून उन्हाळ्यामध्ये थंड आणि हिवाळ्यामध्ये गरम पाणी येते हे कधी तुमच्या लक्षात आले आहे. भूजलाचे तापमान नेहमी समान असूनही असे का घडते ते जाणून घेऊयात.
हॅंडपंपमधून येणारे पाणी थंड किंवा गरम कसे होते?
भूजलाच्या तापमानामध्ये फारसा बदल होत नाही असे म्हटले जाते. हापशीच्या पंपातून बाहेर येणाऱ्या भूजलाच्या पाण्यावर जमिनीवरच्या वातावरणाचा परिणाम होत असतो. तेव्हा वातावरणाचा प्रभाव मानवी शरीरादेखील होत असतो. हिवाळ्यामध्ये शरीराचे तापमान हे भूजलाच्या तापमानापेक्षा कमी असते. म्हणून त्यावेळी पाण्याला स्पर्श केल्यानंतर ते पाणी किंचित गरम आहे असे वाटते. अशाच प्रकारे उन्हाळ्यात शरीराच्या तापमानात प्रचंड वाढ झालेली असते. भूजलातील पाण्याच्या तापमानाच्या तुलनेमध्ये शरीर अधिक गरम असते. त्यामुळे पाण्याचा स्पर्श झाल्यावर शरीराच्या उष्णतेमुळे ते पाणी गार आहे असे आपण म्हणतो. थोडक्यात मानवी शरीराच्या तापमानामुळे आपल्याला पाणी गरम/गार आहे असे वाटते.
आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचे १५°C असते असा काही संशोधकांचा दावा आहे. यामुळे भूजलाचे तापमान नेहमी समान असते. ते बाहेर आल्यावर आपल्या शरीराच्या स्थितीनुसार त्याची स्थिती कशी आहे हे आपण ठरवत असतो. या व्यतिरिक्त भूगर्भाजवळ असलेले भूजल काही प्रमाणात गरम असते. पृथ्वीच्या गर्भातील लाव्हारसामुळे हे पाणी तापते. यामुळे काही ठिकाणी गरम पाण्याच्या विहिरी पाहायला मिळतात.