नेट बँकिंग, यूपीआय आणि इतर अनेक डिजिटल सुविधा ग्राहकांना आज बँकांकडून दिल्या जातात. असे असले तरी आज मोठ्या व्यवहारांसाठी चेकचा वापर केला जातो. म्हणजेच जर तुम्हाला एखाद्याला मोठी रक्कम द्यायची असेल किंवा तुम्ही एखाद्याकडून मोठी रक्कम घेतली असेल तर त्यापैकी बहुतेक जण चेकचा वापर करतात. पण तुम्ही चेक लिहिताना काही गोष्टी कधी लक्षात घेता का, जसे की, चेकमध्ये शब्दात रक्कम लिहून झाल्यानंतर शेवटी फक्त किंवा Only असे का लिहितात. याचे उत्तर अनेकांना माहीत नसेल त्यामुळे ते आज जाणून घेऊ…
चेकवर शब्दात रक्कम लिहून झाल्यानंतर Only असे का लिहितात?
तुमच्याकडे कोणत्याही बँकेचा चेक असो तो भरल्यावर त्यात तारीख, सही, अंकात रक्कम भरल्यानंतर शब्दात रक्कम लिहिताना शेवटी Only असे लिहिले जाते. तुमचे पैसे सुरक्षित राहावेत म्हणून हे केले जाते. मात्र तुम्ही चेकवर Only लिहिले नाही तर तुमचा चेक बँक मान्य करणार नाही, असे काही नाही. बँक कोणावरही शब्दात रक्कम लिहून झाल्यानंतर Only शब्द लिहिण्यासाठी जबरदस्ती करीत नाही. प्रत्येक ग्राहकाने स्वतःच्या पैशांच्या सुरक्षिततेसाठी हे लिहायचे असते.
Only लिहिले नाही तर काय होईल?
फक्त किंवा Only चेकवर लिहिणे म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित ठेवणे. म्हणजे जेव्हा तुम्ही चेकवर रक्कम शब्दात लिहिताना त्याच्या शेवटी फक्त किंवा Only लिहिता, तेव्हा कोणीही तुम्ही लिहिलेल्या रकमेत वाढ करू शकत नाही. यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतात.
चेकवर लाइन काढण्याचा काय अर्थ असतो?
जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले असेल तर तुम्हाला चेकच्या कोपऱ्यावर लाइन काढलेल्या दिसतील. याचा अर्थ चेकमध्ये काही बदल झाला आहे. चेकवर या लाइन ओढून चेकवर एक अट घातली जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, ज्या व्यक्तीच्या नावाने चेक जारी केला गेला आहे त्यांच्यासाठी या लाइन काढल्या आहेत. म्हणजेच, या लाइन ज्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायचे असतात त्यासाठी असतात. त्याच वेळी, दोन लाइन काढल्यानंतर बरेच लोक त्यामध्ये Account Payee किंवा A/C Payee देखील लिहितात. यावरून चेकचे पैसे खात्यातच ट्रान्सफर करायचे असल्याचे दिसून येते. चेकवर कोपऱ्यात दोन आडव्या लाइन मारतात पण त्यात काहीही लिहिले जात नाही त्यामुळे तो ज्याच्या नावाने दिला जातो तो बेअरर असतो.