विमानप्रवास हे अनेकांचं स्वप्न असतं. अलीकडच्या काळात भारतात विमानप्रवाशांची संख्या वाढली आहे. विमानप्रवास केलेल्या लोकांनी एका गोष्टीचं निरीक्षण केलं असेल की, विमान जेव्हा विमानतळावर उतरवलं जातं तेव्हा विमानाचा पायलट बाहेरचं तापमान आणि हवामानासंबंधीची माहिती देतो. ज्यांनी विमानप्रवास केला नसेल त्यांनीदेखील चित्रपटांमध्ये हे दृष्य पाहिलंच असेल. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की, पायलट विमान लँड करताना बाहेरच्या हवामानाची माहिती का देतो? अलीकडेच समाजमाध्यमांवर यावर चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. एका व्यक्तीने कोरा या प्लॅटफॉर्मवर याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर काही लोकांनी आपापली मतं मांडली आहेत. आम्ही तुम्हाला यातली काही उत्तरं सांगणार आहोत.
पॉल इंग्लंड नावाच्या एका व्यक्तीने उत्तर देताना म्हटलं आहे की, पायलट जेव्हा विमानतळावर विमान उतरवत असतो तेव्हा त्याच्याकडे एक हवामान अहवाल (Meteorology Report) आलेला असतो. यात बाहेरची हवा, हवेचा वेग, आर्द्रता, तापमान या गोष्टींची माहिती असते, जी वैमानिकाने जाणून घेणं गरजेचं असतं. यापैकी बाहेरच्या तापमानाची माहिती पायलट प्रवाशांबरोबर शेअर करतो. जेणेकरून प्रवासी बाहेरच्या परिस्थितीनुसार विमानातून उतरताना सज्ज होतील. म्हणजेच बाहेर पाऊस पडत असेल तर रेनकोट घालू शकतील, थंडी असेल तर गरम कपडे घालू शकतील.
माल्कम गुडसन या व्यक्तीने म्हटलं आहे की, बऱ्याचदा लोक ज्या ठिकाणाहून प्रवास सुरू करतात तिथलं आणि जिथे उतरतात तिथलं वातावरण वेगवेगळं असतं. म्हणजेच एखादी व्यक्ती थंड हवेच्या प्रदेशातून कडक उन्हाळा असलेल्या प्रदेशात प्रवास करत असेल तर त्या व्यक्तीला बाहेरच्या वातावरणाची कल्पना असणं आवश्यक आहे.
हे ही वाचा >> Congress Grass : शेतात सर्वत्र आढळणाऱ्या काँग्रेस गवताचा ‘काँग्रेस’ पक्षाशी संबंध काय?
विमान वाहतूक (एव्हिएशन) आणि विमान प्रशिक्षणाशी संबंधित काही वेबसाईट्सनुसार, विमान उतरवण्यापूर्वी वैमानिकाला विमानतळ परिसरातील हवामानाची माहिती दिली जाते, जेणेकरून तो विमान योग्य पद्धतीने कोणत्याही अडथळ्याशिवाय धावपट्टीवर उतरवू शकेल.