विमान प्रवास करायला अनेकांना आवडतो, काहींना विमानाविषयी आकर्षणसुद्धा वाटत असतं. साधारणतः लोक तिकीट काढतात, विमानात बसतात आणि प्रवास करतात. पण, विमान चालवण्याआधी वैमानिकाला काय काय करावे लागते माहीत आहे का ? अगदी त्यांच्या जेवण-राहण्याच्या सोयींबाबतही विमान कंपनी जागृत असते. वैमानिकांना विमान उडवण्याच्या आधी कफ सिरपही घेता येत नाही, तर एकाच विमानातील दोन वैमानिक एकाच हॉटेलमध्ये जेवतही नाहीत. प्रवासी लोकांना देण्यात येणारे जेवण आणि वैमानिकांना देण्यात येणारे जेवण यातही फरक असतो. वैमानिकांबद्दल अधिक जाणून घेऊया…
हेही वाचा : २४ तासात रोज जगभरातील लोक काय काय करतात? काम, झोप, जेवण; कशी होते दिवसाची विभागणी, पाहा रिपोर्ट
अनेकांना वैमानिकांचं आयुष्य हे सुखासीन असतं, भरपूर पगार असतो, सोयीसुविधा असतात, असं वाटतं. या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी त्यांच्या आहार-विहारावर बंधनं असतात. अगदी सर्दी-खोकल्याची औषधं घेताना त्यांना काळजीपूर्वक घ्यावी लागतात. कामाचे तास आणि विश्रांतीची वेळ ठरलेली असते. तसेच त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी व्यायाम आणि योग्य दिनचर्या अंमलात आणावी लागते. एअर इंडिया कंपनीमधील कॅप्टन सुमित श्रीवर्धन यांच्याशी बोलले असता त्यांनी वैमानिकांच्या कामांसंदर्भात काही गोष्टी सांगितल्या.
हेही वाचा : दोन खांबांवर उभा असलेला ‘हा’ देश माहीत आहे का ? याची लोकसंख्या आहे केवळ २७
वैमानिकांना एकाच हॉटेलमध्ये जेवण का देत नाहीत ?
विमान कंपन्या प्रवाशांच्या आणि पर्यायाने विमानाच्या सुरक्षितेबाबत अत्यंत जागृत असतात. कारण, विमान अपघातात प्रवासी वाचण्याची शक्यता अत्यंत कमी असते. त्यामुळे विमानामध्ये कार्यरत असणारे कर्मचारी, वैमानिक यांच्या बाबत ते दक्ष असतात. देशांतर्गत किंवा देशाबाहेरील जरी प्रवास असला तरी वैमानिक आणि क्रू मेंबर यांच्यावर जबाबदारी असते. याचाच एक भाग म्हणजे, वैमानिकांना एकाच हॉटेलमध्ये एकाच प्रकारचे जेवण देत नाहीत.
तसेच त्यांना देण्यात येणारे पाणीही वेगळे असते. यामागील कारण प्रवाशांची सुरक्षितता हेच आहे. जर अन्नातून विषबाधा झाली तर ती दोन्ही वैमानिकांना होऊ नये, यासाठी त्यांना एकाच प्रकारचे, एकाच हॉटेलमधील जेवण देण्यात येत नाही. त्यांना ‘फूड शेअरिंग’ही करता येत नाही. विमान चालवताना अन्नामुळे एका वैमानिकाला त्रास झाला तर दुसरा वैमानिक विमान सुरक्षित चालवू शकेल, यासाठी ही खबरदारी घेण्यात येते. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव अनेकदा त्यांना स्वतः घरातून स्वतःचे अन्न आणण्यास सांगितले जाते.
वैमानिक, क्रू मेंबर यांच्यावर सर्व प्रवाशांची जबाबदारी असते. हे लक्षात घेऊनच विमान कंपन्या नियम तयार करत असतात.