सध्या धावपळीच्या आयुष्यात आपण जेवणाची वेळ पाळत नाही. अनेकदा आपण वेळ मिळेल तेव्हा आणि जसं जमेल तसं जेवण करतो. पण, पण खाल्लेले अन्न पचावे म्हणून जेवणाचे काही नियम आहेत. अंघोळ आणि जेवणाचा काही संबंध आहे का? असेही अनेकदा विचारले जाते. अंघोळ आणि जेवण याबाबत आहारतज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेऊ या..
यासंदर्भात आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत लोकसत्ताशी बोलताना सांगतात, “चयापचय क्रिया संतुलित राहण्यासाठी आणि शरीरातील पेशींना मजबूत करण्यासाठी अंघोळ ही आवश्यक आहे. अंघोळीनंतर तुम्ही एक किंवा दोन तासानंतर काही खाल्ले तर तुमच्या आतड्यांवर कमी ताण पडतो. हे अंघोळीनंतर जेवण्याचे मुख्य कारण आहे. अंघोळीनंतर लगेच जेवण करावे, असा नियम नाही पण तुम्ही एक किंवा दोन तासानंतर जेवण करू शकता.
पल्लवी सावंत पुढे सांगतात, “जेव्हा तुम्ही शरीर स्वच्छ करता तेव्हा पचनक्रिया चांगली होण्यासाठी पुन्हा संधी देता. आपण नेहमी स्वच्छ भांड्यामध्ये जेवण करतो त्याच प्रमाणे आपले शरीर स्वच्छ करुन आपण जेवण करणे सुद्धा आवश्यक आहे. म्हणजेच काही खाण्यापूर्वी दात घासण्याप्रमाणे अंघोळ करणे सुद्धा महत्त्वाचे आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्तानुसार, “तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर किमान दोन किंवा तीन तासांनी अंघोळ करणे चांगले आहे. त्याचबरोबर अंघोळ केल्यावर जेवण केले तर जास्त तेलकट पदार्थ खाऊ नये. यामुळेही पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अंघोळ करण्यापूर्वी अर्धा तास आधी एक ग्लास पाणी प्यावे, यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)