Congress Grass : केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी गुरुवारी राज्यसभेमध्ये काँग्रेसवर निशाणा साधत त्यांना काँग्रेस गवतापासून अॅलर्जी असल्याचे सांगितले. पियुष गोयल म्हणाले, “मी जेव्हा डॉक्टरकडे गेलो तेव्हा मला सांगितले की मला काँग्रेस गवतापासून अॅलर्जी आहे. मला असं वाटते केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी समजून घ्यावे की, काँग्रेस गवतापासून कशी अॅलर्जी होते?” यावेळी भूपेंद्र यादव विदेशी वनस्पतींच्या प्रजाती काढून टाकण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला राज्यसभेत उत्तर देत होते. पण तुम्हाला माहिती आहे का काँग्रेस गवत म्हणजे नेमकं काय? या गवताला काँग्रेस हे नाव कसे पडले? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.
काँग्रेस गवत म्हणजे नेमके काय?
काँग्रेस गवत हा गवताचाच एक प्रकार आहे. पार्थेनियम हिस्टेरोफोरस हे याचे खरे नाव आहे. ही गवताची प्रजाती अमेरिकेच्या उष्ण कटिबंधीय क्षेत्रात उगवली जाते. त्याला अनेक ठिकाणी ‘चटक चांदणी’ किंवा ‘गाजर गवत’सुद्धा संबोधले जाते. खूप वेगाने वाढणारे हे गवत प्रामुख्याने शेतामध्ये आणि शेताच्या बांधावर उगवते. शेतकरी या गवतामुळे अनेकदा वैतागतात. कारण- या गवताच्या संपर्कात आल्यावर काही लोकांना अॅलर्जीही होऊ शकते, असे म्हणतात.
हेही वाचा : Dunki Meaning : शाहरुखचा बहुचर्चित चित्रपट ‘डंकी’चा अर्थ काय? तुम्हाला माहितीये का?
हे गवत भारतात कसे आले?
१९५५ च्या सुमारास हे गवत चुकून भारतात आले. १९५० च्या दशकात भारतात दुष्काळ पडला होता. तेव्हा देशात धान्याचा तुटवडा होता. तेव्हा सरकारने अमेरिकेकडून गहू आयात करण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात गहू आयात करण्यात आला. या गव्हामधूनच पार्थेनियम हिस्टेरोफोरस म्हणजेच अमेरिकेतील गवताचे बी भारतात आले. सरकारी योजनेचा भाग म्हणून या गव्हाचे वाटप भारतात सगळीकडे करण्यात आले. अनेक लोकांनी हा गहू शेतात पेरला आणि येथूनच हे गवत भारतात पसरले.
या गवताला काँग्रेस का म्हणतात?
जेव्हा अमेरिकेकडून गहू आयात करण्यात आला तेव्हा काँग्रेसचे सरकार होते आणि गव्हाची आयात करणे हा सरकारी योजनेचाच एक भाग होता. हे गवत काँग्रेस सत्तेत असताना आल्याने किंवा काँग्रेसमुळे आल्याने त्याला ‘काँग्रेस गवत’, असे नाव पडले.