आजकाल प्रत्येक घरामध्ये पाणी साठवण्यासाठी छतावर मोठ्या टाक्या बसवल्या जातात. सिमेंटच्या टाक्या बसवण्यापेक्षा लोक घराच्या छतावर पीव्हीसी किंवा प्लास्टिकच्या टाक्या बसवण्याला प्राधान्य देतात. या टाक्यांमध्ये काही गोष्टी सामान्य असतात; त्या म्हणजे घरावर बसवण्यात येणार्या बहुतांश टाक्यांचा रंग हा काळा असतो आणि त्यांचा आकार गोल असतो. घराघरांना पाणीपुरवठा केल्या जाणार्या सरकारी पाण्याच्या टाक्या असो वा घरगुती पाण्याच्या टाक्या, त्यांचा आकार हा गोलच असतो. त्याशिवाय प्रत्येक टाकीवर रेषाही असतात. परंतु, या प्रत्येक गोष्टीमागे काही न काही कारणे आहेत. पाण्याच्या टाकीचा आकार, रंग आणि रचना यामागील कारण समजून घेऊ या.
पाण्याच्या टाक्या गोलाकार का असतात?
- टाक्या गोलाकार असण्याचे प्राथमिक कारण म्हणजे पाण्याचा दाब.
- गोलाकार किंवा दंडगोलाकार टाकीमध्ये पाण्याचा दाब समान रीतीने वितरित होतो.
- गोलाकार पाण्याची टाकी स्वच्छ करणेदेखील सोपे आहे.
- ते कमी खर्चिकदेखील आहेत.
- टाक्या तयार करताना पीव्हीसीला गोलाकार आकार दिल्यामुळे ते तुटत नाहीत, परंतु, त्याला जर चौरस आकार दिला, तर तडे जाण्याची शक्यता असते.
पाण्याच्या टाक्या काळ्या रंगाच्या का असतात?
- टाकीचे इतर रंगदेखील आहेत, परंतु काळ्या रंगाच्या टाक्या सर्वाधिक पाहायला मिळतात.
- काळा रंग सूर्याची किरणे शोषून घेतो; ज्यामुळे पाण्याच्या आत शेवाळ तयार होत नाही. सूर्यप्रकाशामुळे शेवाळ तयार होण्याचा वेग मंदावतो.
- परंतु, याचा एक दुष्परिणामदेखील आहे. उन्हाळ्यामध्ये या टाक्या जास्त गरम होऊ शकतात आणि अतिउष्णतेमुळे टाकी फुटण्याची शक्यता वाढते.
हेही वाचा : पेरूचं अस्वल झालं ब्रिटिश नागरिक; अनोख्या पाहुण्याला का दिला पासपोर्ट?
पाण्याच्या टाक्यांवर रेषा का असतात?
- टाकीवर असणार्या रेषा या डिझाईनचा भाग नाहीत. टाकीला भक्कम करण्यात जसा त्याचा आकाराचा वाटा आहे, तितकाच रेषांचादेखील आहे. टाकींवर असणार्या रेषा अतिउष्णता किंवा पाण्याच्या दाबामुळे टाकीचा स्फोट होण्यापासून रोखतात.
- टाकीवर असणार्या या रेषा पाण्याचा दाबदेखील नियंत्रित ठेवतात.