Why we fly kites on makar sankranti : मकर संक्रांती हा सण सूर्य देवाला समर्पित असतो. या सणाला खगोलशास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडं सरकतो. मकर संक्रांतीपासूनच ऋतू बदलण्यास सुरुवात होते.
देशभरात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवानिमित्त लोक पतंग उडवतात, तिळगूळाचे लाडू तयार करतात, नद्यांमध्ये स्नान करतात. अनेक ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याच्या स्पर्धासुद्धा आयोजित केल्या जातात.
आकाशात रंगीबेरंगी पतंगी दिसून येतात, पण तुम्हाला माहितीये का, मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग का उडवतात? आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Why we fly kites on makar sankranti Really flying kites are related to makar Sankranti read reason)
मकर संक्रांतीला पतंग का उडवतात?
हिवाळा हा असा ऋतू आहे, ज्या ऋतूमध्ये अनेकांना सर्दी-खोकलासारख्या आजाराचा धोका जास्त असतो. या ऋतूमध्ये अनेक जण कमकुवत रोगप्रतिकार शक्तीमुळे आजारी पडतात, त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी नव्या ऋतूच्या आगमनाच्या वेळी जंतू आणि जीवाणू नष्ट करण्यासाठी अनेक जण सूर्यप्रकाश घेतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यप्रकाश घेणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. ही सूर्यकिरणे विविध आजारांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर असतात. हा उपक्रम अधिक उत्साही बनवण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी हळूहळू सूर्यप्रकाश घेताना पतंग उडवणे ही परंपरा अस्तित्वात आली.
धार्मिक मान्यता
काहींच्या मते मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उडवण्यामागे वेगळे कारण असू शकते. एक अशी मान्यता आहे की, आकाशात पतंग उडवणे हिवाळाभर विश्रांती घेत असलेल्या देवतांना जागे करण्याचा अलार्म म्हणून काम करते. या संबंधित आणखी एक असा समज आहे की, पतंग स्वर्गात प्रवेश करत देवतांचे आभार मानते.
आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव
पतंग उडवण्याची ही जुनी परंपरा अतिशय उत्साहाने साजरी केली जाते. गुजरातसारख्या ठिकाणी पतंग उडवण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. गुजरातमध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवामध्ये सहभाग घेण्यासाठी केवळ देशभरातूनच नव्हे तर जगभरातून असंख्य लोक येतात; या महोत्सवाची तयारी काही महिन्यापूर्वीच सुरू होते.