Saree : साडी हा स्त्रियांचा आवडता पेहराव मानला जातो. शतकानुशतके भारतीय महिला साडी परिधान करीत आहे. साडी ही एक लांब कापड अंगाभोवती विशिष्ट पद्धतीने गुंडाळून नेसली जाते. भारतात तर साड्यांचे वेगवेगळे प्रकार असून, नेसण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. देशातील प्रत्येक राज्यात नेसली जाणारी साडी ही त्या राज्याची संस्कृती, परंपरा आणि वारसा दर्शवते; पण तुम्हाला या साड्यांचा इतिहास माहीत आहे का? साड्यांची उत्पत्ती कशी झाली? आज आपण त्याविषयीच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
साड्यांचा इतिहास
साड्यांचा इतिहास खूप जुना आहे. साड्यांचा उल्लेख सुरुवातीला वेदांमध्ये करण्यात आलेला आहे. यज्ञ किंवा हवन असेल, तर त्यावेळी स्त्रियांनी साडी परिधान केली, असा उल्लेख करण्यात आलेला आहे. महाभारतातसुद्धा साड्यांचा उल्लेख आढळून येतो. महाभारतात जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण केले होते तेव्हा कृष्णाने साडीची लांबी वाढवून द्रौपदीची रक्षा केली होती.
मुघलांच्या काळातही एम्ब्रॉयडरी, सीक्विन, बनारसी, चिकनकारी साड्या प्रसिद्ध होत्या. आजही या साड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
हेही वाचा : Pune : कोण होते दगडूशेठ हलवाई अन् कशी झाली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना?
साड्यांचे बदलते स्वरूप
साड्यांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. साड्यांमध्ये अनेक नवनवीन प्रकार दिसून येत आहेत. भारतात उत्तर प्रदेशची बनारसी, महाराष्ट्राची पैठणी अन् नऊवारी, तामिळनाडूची कांजीवरम, मध्य प्रदेशची चंदेरी, राजस्थानची लहरीया इत्यादी साड्यांचे प्रकार त्या त्या राज्यांच्या संस्कृतीची ओळख सांगतात.