ICC Women’s T20 World Cup 2024: महिलांचा टी-20 विश्वचषक २०२४ येत्या ३ ऑक्टोबरपासून दुबईमध्ये खेळवला जाणार आहे. टी-२० विश्वचषकासाठी भारत दोन सराव सामने खेळणार आहे. यासाठी भारतीय संघ दुबईत पोहोचला असून तिथे सराव करत आहे. भारतीय संघ गट टप्प्यात चार सामने खेळणार आहे. पण तत्त्पूर्वी महिलांच्या टी-२० विश्वचषकात भारताकडून आतापर्यंत फक्त एकाच खेळाडूने शतक झळकावले आहे, कोण आहे ही भारताची विस्फोटक फलंदाज जाणून घ्या.

२०१८ मध्ये महिलांच्या टी-२० विश्वचषकात भारतीय महिला खेळाडूने हा पराक्रम केला होता. ही भारतीय फलंदाज इतर कोणी नसून भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आहे. हरमनप्रीतने २०१८ च्या वर्ल्डकपमध्ये हा विक्रम केला होता, जो सहा वर्षांनंतरही कायम आहे. आताची भारतीय कर्णधार या स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारी भारतातील पहिली महिला खेळाडू आहे. खरं तर, हरमनप्रीत ही टी-२० फॉरमॅटमध्ये शतक करणारी एकमेव भारतीय महिला आहे.

हेही वाचा – Musheer Khan Health Update: मुशीर खानचा अपघातही ऋषभ पंतप्रमाणेच, अधिकृत माहिती आली समोर, मानेला फ्रॅक्चर असून मुंबईत होणार पुढील उपचार

गयानातील प्रोव्हिडन्स क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात हरमनप्रीत कौरने ही कामगिरी केली होती. उजव्या हाताची फलंदाज हरमनप्रीतने ५१ चेंडूत सात चौकार आणि ८ षटकारांसह १०३ धावा केल्या होत्या. हरमनप्रीतने ४९ चेंडूत हे दणदणीत शतक झळकावले होते.

न्यूझीलंडची सध्याची कर्णधार सोफी डिव्हाईनने हरमनप्रीतला बाद करत संघाला बहुमोल विकेट मिळवून दिली होती, पण तोपर्यंत हरमनप्रीतने धावांचा पाऊस पाडला होता. हरमनच्या शतकी कामगिरीच्या जोरावर भारताने हा सामना ३४ धावांनी जिंकला तर हरमनप्रीतने सामनावीराचा पुरस्कार पटकावला.

हेही वाचा – इराणी कप हे नाव स्पर्धेला कसं मिळालं? जाणून घ्या भारतीय क्रिकेटच्या प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धेचा संपूर्ण इतिहास

भारताची सलामीवीर स्मृती मानधना हिने २०२३ वर्ल्डकप मध्ये आयर्लंड विरुद्ध ८७ आणि २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ८३ धावांची मोठी खेळी खेळली होती, ज्यामुळे ती महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय फलंदाजांनी केलेल्या सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येच्या यादीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे.

३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२४ साठी हरमनप्रीत भारतीय संघाची कर्णधार आहे. ३५ वर्षीय हरमनप्रीत महिला टी-२० प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. १४१ सामन्यांत २८.०८ च्या सरासरीने ३४२६ धावा आणि १०७.३२ च्या स्ट्राइक रेटने १०१२ अर्धशतक तिच्या नावे आहेत.