आज आहे ७ जुलै म्हणजेच वर्ल्ड चॉकलेट डे. तसं चॉकलेट हे कोणत्याही दिवशी आणि कधीही खाऊ शकतो असे अनेकजण आपल्याला सापडतील. मात्र आजचा दिवस थोडा खास आहे. याच चॉकलेट डे निमित्त आज आपण जाणून घेणार आहोत या प्रिय पदार्थाचा ४००० वर्षांचा इतिहास. मनीष खन्ना यांच्या या खास लेखामधून…
‘कोई भी शुभ काम करनेसे पहले मिठा खाना चाहिए, काम अच्छा होता है..’, असं म्हणत चॉकलेट सर्वाच्या गळ्यातील ताईत झाले. प्रत्येक आनंदाच्या क्षणी, वाढदिवसाला गिफ्ट म्हणून, नात्यातल्या खास क्षणी, चॉकलेट डेला चॉकलेट आदानप्रदान करण्याचा व खाण्याचा ट्रेण्ड दिवसेंदिवस वाढतोय. याला कारण म्हणजे चांगल्या दर्जाचे चॉकलेट्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. सध्या बाजारात मिळणारे चॉकलेट बार, चॉकलेटपासून बनवलेली मिठाई, चॉकलेट कॅण्डी,चॉकलेटपासून बनवलेले विविध डेझर्ट, चॉकलेट केक हे खरोखरच मूड चेंजर आहेत.
चॉकलेटला ४००० वर्षांचा इतिहास आहे. खोटं वाटेल पण पहिल्यांदा चॉकलेट गोड चवीऐवजी कडू पेय म्हणून वापरण्यात आले. चॉकलेट त्याच्या जन्मस्थळाहून म्हणजेच स्पेननंतर फ्रान्स आणि हळूहळू संपूर्ण युरोपमध्ये पसरत गेले. १८२८ मध्ये सर्वात पहिली चॉकलेट प्रेसची निर्मिती झाली. या चॉकलेट प्रेसने चॉकलेट निर्मिती करण्यासाठी क्रांतिकारी योगदान दिले. व्हेन हौटेन यांनी चॉकलेट मध्ये क्रांती घडवून आणली. त्यांनी चॉकलेटमध्ये कन्फेक्शनरी घटक वापरून उत्पादन खर्चही कमी केला. परिणामी चॉकलेट सामान्य लोकांना अधिक परवडण्यायोग्य बनले.
मध्य अमेरिका, वेस्ट इंडिज आणि दूर पूर्वेच्या उष्ण कटिबंधीय भागात आफ्रिकेमध्ये कोको झाडांची लागवड होते. चॉकलेटची चव विकसित करण्यासाठी कापणी केलेले कोको बीन्स सूर्यप्रकाशात ठेवले जातात. नंतर कोको बीन्सचे कवच काढून उर्वरित कोको बीन्सवर प्रकिया करून कोको सॉलिड्स बनवले जातात. चॉकलेटचा पेस्ट्री, केक, मिठाई, आइसक्रीम आणि बिस्किट्ससारखे विविध प्रकार बनविण्याच्या प्रकियेत वापर केला जाऊ शकतो. चॉकलेटचे सामान्यपणे डार्क, मिल्क, व्हाइट आणि कोको पावडर हे प्रकार आहेत.
सध्या जगभर व्हॅलेन्टाइनचे वारे वाहत आहेत. व्हॅलेन्टाइन वीकमध्ये चॉकलेट डे असतो या दिवशी जास्तीत जास्त चॉकलेटचा वापर केला जातो, यात काही आश्चर्य नाही. कारण चॉकलेट हे मधुर आणि रोमँटिक आहे. खरं तर प्रेयसीसाठी किंवा प्रियकरासाठी चॉकलेटशिवाय दुसरी चांगली भेटवस्तू होऊच शकत नाही. व्हॅलेन्टाइनच्या निमित्ताने हॅण्डमेड प्रालाइन्स, हृदयाच्या आकाराचे कप केक, केक्स, चॉकलेटपासून बनवलेले बुके आणि हार्ट स्प्रिंकल्स असलेले लोकप्रिय टी केक मोठय़ा प्रमाणात खरेदी केले जातात.
चॉकलेटचे दर वर्षी नवनवीन प्रकार बाजारात मिळत आहेत. चॉकलेट आता हॅण्डमेड चॉकलेट बारपासून वैयक्तिक मोनोग्राम बार किंवा बॉम्बोन्सवर, चॉकोलेट बकेट केक, केक गार्निशिंग करण्यासाठीचे चॉकलेट शेल्स, शार्ड यामध्ये रूपांतर झाले आहे. व्हेजिटेबल्सच्या कॉम्बिनेशनबरोबर चॉकलेट आता चॉकलेट पॉप कॉर्न किंवा चॉकलेट चिप्ससारखे दिसू शकते. जेव्हा गरम चॉकलेट ब्राऊनी किंवा आइसक्रीम बरोबर सव्र्ह केले जाते तेव्हा ते जिभेसोबतच मनालादेखील तृप्ती देणारे ठरते. मुलांना त्यांच्या टिफिनमध्ये चॉकलेट ब्राऊनी, चॉकलेट पोपसिकल्स, टी केक्स, कप केक्स आणि मफीन्स घेण्यास आवडते. चॉकलेट असे मिष्टान्न आहे ज्याला विरोध करणे खूप कठीण आहे.