World Hearing Day 2023: आवाज, भाषा यांमुळे मानव इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो. संवाद साधण्यासाठी तोंड आणि कान या दोन अवयवांची मदत होते. लहान मुल त्यांच्या आसपासच्या आवाजाचा अंदाज घेत बोलायला शिकते. बोलता येण्यासाठी ऐकू येणे आवश्यक असते. ज्यांना लहानपणापासून ऐकण्यात समस्या असतात, अशांना बोलतानाही त्रास होतो. माणूस ऐकून बोलायला शिकतो. म्हणून आपल्याकडे श्रवणाला फार महत्त्व आहे. दरवर्षी जगभरामध्ये ३ मार्च रोजी ‘जागतिक श्रवण दिवस’ साजरा केला जातो. या निमित्ताने ऐकण्याच्या समस्यांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो.
२००६ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेतर्फे World Hearing Day साजरा करण्याची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये या दिवसाचा उल्लेख International Ear Care Day असा केला जात असे. पुढे २०१६ मध्ये त्याच्या नावामध्ये बदल करण्यात आला. WHO च्या अंधत्व आणि बहिरेपणा प्रतिबंधक कार्यालयाद्वारे या खास दिवशी अनेक देशांमध्ये मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमांद्वारे लोकांना कानांची निगा का आणि कशी राखावी यांची माहिती दिली जाते. श्रवण दिनाची २०२३ ची थीम ‘Ear and hearing care for all! Let’s make it a reality’ अशी आहे.
कानांची काळजी घेणे हे जागतिक श्रवण दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालामध्ये ‘२०५० पर्यंत सुमारे २.५ अब्ज लोकांची श्रवणशक्ती कमकुवत होणार असल्याचा अंदाज आहे. तसेच ७०० दशलक्ष लोकांना श्रवण पुनर्वसन करवून घेण्याची गरज भासणार आहे’, असे म्हटले आहे. यावर मात करण्यासाठी कानांची निगा राखणे, कानांशी निगडीत समस्यांची माहिती लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. भविष्यात श्रवण शक्तीमध्ये बिगाड होऊ नये यासाठी आजच उपाय करणे गरजेचे आहे.