पेंग्विन हा जगातला असा जीव आहे, जो पक्षी असूनही उडू शकत नाही. अंटार्क्टिकामध्ये राहणारे हे समुद्री पक्षी बर्फाळ प्रदेशात आपापसात एक समूह बनवून राहणारे असतात. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, पेंग्विन्स हे बर्फ असणाऱ्या थंड जागेत वास्तव्य करतात. मात्र, काही पेंग्विन्सच्या प्रजाती अशाही आहेत, ज्या चक्क उबदार हवामानात आढळू शकतात. पेंग्विन्सच्या शरीराची ठेवण आणि तेलकट अशा पंखांची रचना त्यांना बर्फाळ प्रदेशात राहण्यासाठी अतिशय योग्य आहे.
लहान-मोठे असे भिन्न भिन्न आकार असणाऱ्या पेंग्विन्सच्या तब्ब्ल १८ प्रजाती असल्याचे नॅशनल जिओग्राफिक एका लेखावरून समजते. मात्र, सर्व पेंग्विन्सचे शरीर हे काळ्या रंगाचे आणि पोट पांढऱ्या रंगाचे असते. निसर्गाने या पक्षांना, पाण्यात पोहताना त्याचे इतर धोकादायक प्राण्यांपासून संरक्षण व्हावे यासाठी असा रंग दिला आहे.
पक्षी असूनही पेंग्विन्सना उडता येत नसले तरीही त्यांच्या कडक पंखामुळे आणि पाय व शरीराच्या विशिष्ट रचनेमुळे त्यांना अत्यंत उत्तम पोहता येते. इतकेच नाही तर हे पक्षी त्यांचा सर्वाधिक काळ हा समुद्रात पोहण्यात आणि खेकडे, स्क्विड, मासे यांची शिकार करण्यात घालवतात. हे समुद्री पक्षी साधारण ताशी १५ मैल पोहू शकतात. मात्र, त्यांना यापेक्षाही अधिक गतीने पोहायचे असल्यास ते पाण्यातून वर येऊन, म्हणजेच थोडक्यात पाण्यात उड्या मारत जातात.
पेंग्विनचे जमिनीवरील जीवन [Life on land]
जेव्हा पेंग्विन्स जमिनीवर येतात, तेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ते त्यांच्या छोट्या-छोट्या पायांवर आपल्या संपूर्ण शरीराचा भार उचलून, अतिशय मजेशीर पद्धतीने उड्या मारत अथवा इतर प्राण्यांपेक्षा विचित्र पद्धतीने चालत पुढे जातात. तर वेगाने पुढे जाण्यासाठी, ध्रुवीय पेंग्विन “टोबोगॅनिंग” म्हणजेच पोटावर झोपून बर्फावर घसरत प्रवास करतात. अतिशय कडाक्याची थंडी पडल्यास स्वतःचे त्या वातावरणापासून, तसेच इतर प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी हे पेन्ग्विस मोठ्या समूहांमध्ये एकत्रितपणे राहतात. या पक्षांच्या वस्तींमध्ये साधारण हजारो ते लाखो पेंग्विन्स असू शकतात.
पेंग्विन्स आणि त्यांचे प्रजनन [Breeding]
पेंग्विन्स हे समुद्री पक्षी असल्याने ते किनाऱ्यावर येऊन आपली अंडी घालतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पेंग्विन हे पक्षी अनेक वर्ष एकाच जोडीदाराबरोबर राहतात आणि एकावेळी केवळ एक किंवा दोनच अंडी घालतात. पेंग्विन्सची जोडी आळीपाळीने अंड्याची काळजी घेते. पिल्लू अंड्यातून बाहेर आल्यावर जोडीने ते त्याला खायला घालतात आणि त्याचे रक्षण करतात. दरवर्षी काही आठवडे, हजारो असे लहान पेंग्विन्स त्यांचे पालक अन्नाच्या शोधात गेले असताना किनाऱ्यावर एकत्र थांबतात. जेव्हा त्यांचे आई आणि वडील परततात, तेव्हा पिल्ले त्यांच्या पालकांच्या विशिष्ट आवाजाची वाट पाहतात. त्यांच्या पालकांनी दिलेला तो विशिष्ट आवाज ऐकून ती पिल्लं एवढ्या गोंधळातही आपल्या योग्य पालकांपर्यंत पोहोचतात.
इतर पक्षांचे पंख हे हळूहळू झडू लागतात. मात्र, पेंग्विन पक्षाचे तसे नसते. त्यांची सगळी पिसं ही एकाचवेळी गळून पडण्यास सुरुवात होते. त्यांची ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मात्र पेंग्विन्सना पाण्यात पोहता येत नसल्याने, परिणामी खाद्य शोधण्यासाठी समुद्रात न गेल्याने या पक्षांना आठवडाभर ‘उपवास’ करावा लागतो.
पेंग्विन्सचे संवर्धन आणि धोके [Conservation and threats]
पेंग्विनच्या प्रजातींपैकी सुमारे दोन तृतीयांश प्रजाती या धोक्यात असणाऱ्या प्रजातींपैकी एक असून त्यांची नोंद IUCN रेड लिस्टमध्ये करण्यात आली आहे. परिणामी, अस्तित्व धोक्यात असणाऱ्या पक्षांमध्ये समुद्री पक्षांची गणती केली जाते. याचे कारण म्हणजे विविध रोग, संसर्गजन्य आजार आणि पर्यटकांकडून पसरवला जाणारा कचरा. इतकेच नाही, तर दक्षिण महासागरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर केली जाणारी मासेमारीदेखील त्याला कारण आहे. कारण या मासेमारीमुळे अंटार्क्टिक द्वीपकल्पातील माश्यांची संख्या ही अर्ध्याहून अधिक कमी झालेली आहे.त्यामुळे पेंग्विन्सना अन्न मिळवण्यासाठी आपसात स्पर्धा करावी लागते. मात्र, असे करताना ते मनुष्याद्वारे फेकल्या गेलेल्या मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकण्याचा धोका निर्माण होतो.
अर्थातच, पेंग्विन्सच्या अशा अवस्थेसाठी वाढते तापमान, वातावरणातील बदल हे देखील तितकेच महत्त्वाचे कारण आहे. पेंग्विन अन्न शोधण्यासाठी आणि घरटी बांधण्यासाठी ज्यावर अवलंबून असतात, त्या ध्रुवीय प्रदेशात तापमानवाढीमुळे समुद्राचा बर्फ वितळत चालला आहे. असेच होत राहिले तर अंटार्क्टिका पुढच्या काही वर्षांमध्ये हवामान बदलांमुळे अनेक पेंग्विन गमावू शकते. तसेच आपल्या या समुद्री पक्षांना, जगण्यासाठी त्यांना नवीन अधिवासात स्थलांतर करावे लागेल.