IND vs AUS Snickometer Yashasvi Jaiswal Controversial Wicket: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटीच्या शेवटच्या दिवसाचा खेळ अटीतटीचा झाला. आधी विजयासाठी आणि नंतर कसोटी अनिर्णित राखण्यासाठी खेळणाऱ्या भारतीय संघाच्या सर्व आशा धुळीला मिळवत ऑस्ट्रेलियानं शानदार विजय साजरा केला. पण या सर्व घडामोडींमध्ये या दौऱ्यादरम्यान वापरण्यात आलेलं Snickometer तंत्रज्ञान भलतंच चर्चेत आलं. याला कारण ठरली भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याची विकेट! ज्या पद्धतीने यशस्वी जयस्वाल बाद झाला, त्यातून Snickometer च्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे.
“Snickometer ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज!”
या Snickometer चाच वापर करून यशस्वी जयस्वालपाठोपाठ आकाशदीपलाही तिसऱ्या पंचांनी बाद ठरवलं. त्यामुळे कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेल्या रवी शास्त्रींनी “या सामन्यात Snickometer ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज आहे”, अशी मिश्किल टिप्पणीही केली. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातून चर्चेत आलेला हा स्निकोमीटर प्रकार आहे तरी काय? याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांमध्ये निर्माण झाली.
तर Snicko किंवा Snickometer तंत्रज्ञान हे क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज बाद आहे की नाही, हे ठरवण्यासाठीच्या इतर साधनांप्रमाणेच एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. एखाद्या फलंदाजाचा झेल यष्टिरक्षकानं किंवा क्षेत्ररक्षकानं पकडला असता किंवा फलंदाज पायचीत (एलबीडब्ल्यू) बाद झाल्यावर चेंडू थेट पॅडवर आदळला की बॅटला लागून गेला, हे तपासताना बॅटला चेंडूचा स्पर्श झाला होता की नाही? हे पाहाण्यासाठी स्निकोमीटर तंत्रज्ञान तिसऱ्या पंचांकडून वापरलं जातं. यासाठी ऑडिओ आणि व्हिडीओ अशा दोन्ही प्रकारच्या माहितीची सांगड घातली जाते.
कसं काम करतं Snickometer ?
स्निकोमीटर तंत्रज्ञानामध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडीओ आणि ऑडिओ यांची सांगड घालून त्याद्वारे निर्णय दिला जातो. यष्ट्यांजवळ किंवा खेळपट्टीवर अत्यंत सूक्ष्म ध्वनीलहरीही टिपणारे मायक्रोफोन बसवण्यात आलेले असतात. त्याद्वारे अगदी हलकासा आवाजदेखील रेकॉर्ड होतो. जेव्हा चेंडू बॅटजवळून किंवा ग्लोव्ह्जजवळून जातो, तेव्हा तिथे निर्माण होणारा सर्व आवाज या मायक्रोफोनमध्ये रेकॉर्ड होतो. या ऑडिओ सिग्नलचं रूपांतर मग ध्वनीलहरींच्या स्वरूपात एका आलेखात केलं जातं. एकसमान जाणाऱ्या ध्वनीलहरींमध्ये अचानक नेमक्या वेळी बदल झालेला दिसल्यास, तिथे बॅटला चेंडूचा स्पर्श झाल्याचं मानण्यात येतं.
पण ही प्रक्रिया एवढ्यावर संपत नाही. या ध्वनीलहरींचा आलेख त्याच वेळी रेकॉर्ड झालेल्या दृश्याशी जुळवला जातो. मग ज्यावेळी बॅटजवळून किंवा ग्लोव्ह्जजवळून चेंडू जात असतो, नेमका तेव्हाच ध्वनीलहरींच्या आलेखात बदल झालाय का, हे तपासलं जातं. जर बदल झाला असेल, तर चेंडू बॅटला किंवा ग्लोव्ह्जला स्पर्शून गेल्याचं मानलं जातं आणि संबंधित फलंदाजाला बाद दिलं जातं.
स्निकोमीटरचे फायदे-तोटे…
दरम्यान, स्निकोमीटरचे काही फायदे तर काही तोटेदेखील सांगितले जातात. स्निकोमीटरमुळे पंचांना फलंदाज बाद आहे की नाही? हे ठरवण्यासाठी स्पष्ट असा तंत्रज्ञानाधारित पुरावा मिळतो. त्यामुळे निर्णयांवरून वाद होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात येते. पण त्याचवेळी खेळपट्टीवर किंवा यष्ट्यांमध्ये लावलेले मायक्रोफोन अतीसूक्ष्म ध्वनीलहरीही टिपत असल्यामुळे नेमक्या वेळी तिथे नेमका कोणता आवाज टिपला गेला? याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. तसेच, व्हिडीओ आणि ऑडिओ यांची योग्य प्रकारे घातलेली सांगड योग्य निर्णयासाठी आवश्यक ठरते.
सामान्यपणे स्निकोमीटरप्रमाणेच हॉक-आय किंवा अल्ट्राएज या प्रणालींचादेखील हे निर्णय घेण्यासाठी वापर केला जातो. या प्रणालीदेखील सामान्यपणे स्निकोमीटरच्याच पद्धतीनुसार काम करतात.