केंद्र सरकारनं ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली ‘प्रधानमंत्री वय वंदन योजना’ (पीएमव्हीव्हीवाय) निश्चितच एक आकर्षक गुंतवणूक पर्याय आहे. विशेषत: बँकांच्या ठेवींवरील व्याजदर घसरत असताना, नियमित व निश्चित स्वरूपाचे उत्पन्न देणारा हा पर्याय ज्येष्ठांना खूपच उपयुक्त ठरेल. ‘प्रधानमंत्री वय वंदन योजने’त सरकारने नुकतेच बदल केले आहेत. या योजनेतील गुंतवणुकीच्या रकमेची मर्यादा सरकारने दुप्पट केली आहे. त्याचबरोबर याचा कालावधीही वाढवला आहे. म्हणजेच आता या योजने अंतर्गत तुम्हाला दर महिना दहा हजार रुपये पेन्शन मिळू शकते.
या योजनेवर एक दृष्टिक्षेप..
– ही पेन्शन पॉलिसी एलआयसी एजंटामार्फत अथवा ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा घेता येते. ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी http://www.licindia.in/ या साईटवर लॉग इन होऊन घेता येते.
– शुक्रवार, २१ जुलै २०१७ रोजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘प्रधान मंत्री वय वंदना योजने’ची औपचारिक लोकार्पण केले. प्रत्यक्षात तिची विक्री ४ मे २०१७ पासून ‘एलआयसी’कडून सुरू झाली आहे.
– या योजनेत गुंतवणूक करण्याची अखेरची तारीख ही ३१ मार्च २०२० आहे. या योजनेत एकरकमी पैसे भरुन गुंतवणूक केली जाऊ शकते.
– वयाची ६० वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते.
– सरकारची ही योजना एलआयसी मार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेला वस्तू व सेवा करातून वगळण्यात आले आहे (हा कर एरव्ही विमा अथवा पेन्शन योजनेच्या हप्त्यांवर लागू आहे.) योजनेत हमी दिलेला व्याजदर आणि एलआयसीला प्रत्यक्षात लाभ आणि प्रशासन खर्च यात तफावत राहत असल्यास त्याची सरकारकडून भरपाई केली जाईल. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली गेली आहे.
– या योजनेंतर्गत लाभार्थ्यांस गुंतवणुकीवर वार्षिक ८ टक्के दराने १० वर्षे पेन्शनची हमी देण्यात आली आहे. मासिक, त्रमासिक, अर्ध वार्षिक आणि वार्षिक पेन्शन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
– या योजनेत गुंतवणुकीची कमाल आणि किमान मर्यादा ठरविण्यात आली आहे. ही किमान/कमाल मर्यादेची रक्कम लाभार्थ्यांकडून पेन्शनप्राप्तीसाठी निवडण्यात आलेल्या कालावधीनुरूप वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. जर वार्षिक पेन्शन घ्यायची असल्यास किमान रु. १,४४,५७८ तर कमाल रु. ७,२२,८९२ योजनेत गुंतविले जाऊ शकतील. त्या उलट मासिक पेन्शन हवी असणाऱ्यांना किमान रु. १,५०,००० आणि कमाल रु. ७,५०,००० गुंतविणे आवश्यक ठरेल.
– पेन्शनची रक्कम किमान १,००० रुपये प्रति महिना असा योजनेचा प्रयत्न आहे, त्यासाठी दीड लाख रुपये एकरकमी गुंतवावे लागतील. तर योजनेत प्रति महिना पेन्शनची कमाल रक्कम ही ५,००० रुपये निर्धारीत करण्यात आली आहे.
– योजनेचा १० वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, पेन्शनधारक हयात असल्यास योजनेची मूळ खरेदी रक्कम (मुद्दल) त्याला अंतिम पेन्शन हप्त्यासह परत केली जाईल.
– या योजनेत गुंतविलेली रक्कम १० वर्षेपूर्ण होण्याआधी केवळ स्वत:च्या व पती किंवा पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी काढता येईल. वैद्यकीय कारणांसाठी रक्कम काढावयाची असल्यास गुंतविलेल्या रक्कमेच्या ९८ टक्क्य़ांपर्यंत रक्कम काढता येईल.
– योजनेच्या कालावधीत आणीबाणीच्या परिस्थितीत पैशाची गरज भासल्यास गुंतवणूकदारास रोकड सुलभता तीन वर्षांनंतर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर खरेदी रकमेच्या (मुद्दल) ७५ टक्क्य़ांइतकी रक्कम त्याला कर्ज म्हणून मिळविता येईल. या कर्जावरील व्याज देय पेन्शनमधून कापण्यात येईल.
– १० वर्षे कालावधीत पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास, पूर्ण खरेदी रक्कम नामनिर्देशित व्यक्तीस देण्यात येईल.