१९९० साली मला नोकरीत बढती मिळाली आणि बदलीही झाली. मनासारखी बढती आणि बदली मिळाल्याने खुशीत होतो. आता चारचाकी घ्यायला काही हरकत नाही, असा विचार आला. त्याच वेळी माझे स्नेही बाजीराव देशमुख यांना त्यांची फियाट विकायची होती. समसमायोग जुळून आला. त्यांनी त्यांची फियाट मला दिली. तिचा नंबरही व्हीआयपी होता. आता लायसन्सचा प्रश्न निर्माण झाला. माझ्याकडे तर फक्त टू व्हीलरचेच लायसन्स होते. शिवाय मला कुठे चालवता येत होती चारचाकी. नशिबाने दुचाकीच्या लायसन्सवर मला लगेचच चारचाकीचे लायसन्स मिळाले. मग सुरू झाले प्रशिक्षण. त्या वेळी काही आजच्यासारखे ड्रायिव्हग स्कूल नव्हते. कधी स्नेहींनी शिकवली, कधी मी स्वत:च शिकलो, असे करीत करीत शिकलो एकदाची गाडी. मग सुरू झाली भटकंती. तब्बल बारा र्वष दामटवली मी ही फियाट. एकदा तर गंमतच झाली. कोपरगावहून श्रीरामपूरला जात असताना रस्त्यावर गाडीसमोर अचानक एक अजगर आला. तो भलामोठा अजगर पाहून भंबेरीच उडाली माझी. हा प्राणी आपल्या गाडीखाली येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळे गाडी भलतीकडेच वळून बाजूच्याच शेतात घुसली. अजगर मात्र आपल्याच धुंदीत रस्ता पार करून गेला. अखेरीस शेतात अडकलेली गाडी कशीबशी बाहेर काढली, आणि मार्गस्थ झालो. असंच एकदा संगमनेरनजीक कळस गावाजवळ आलो असता नदी ओलांडायची होती. पावसाचे दिवस असल्याने पूर आला होता. पुढे जायची हिंमत होईना. मात्र, मागून एका जीपवाल्याने िहमत केली. मग मीपण त्याच्यामागोमाग गाडी काढली. दहा मिनिटे लागली नदी ओलांडायला. मात्र, ती दहा मिनिटे आजही अंगावर काटा आणतात. नंतर फियाट आऊटडेटेड झाल्याने ती विकून टाकली. आता वयाच्या सत्तराव्या वर्षी मी मारुती अल्टो चालवतोय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा