होंडाने आपल्या सिटी, सिव्हीक व अॅकॉर्ड या सेदान मोटारींनंतर भारतात त्यापेक्षा लहान आकाराची व कमी रुंदीची ‘अमेझ’ ही सेदान मोटार बाजारपेठेत सादर केली आहे. काहीशी होंडा सिटीप्रमाणेच वाटणारी ही अमेझ लांबी व रुंदीने सिटीपेक्षा लहान आहे. अमेझचा वेग, आतील आरामदायी आसनव्यवस्था, सुलभ ट्रान्समिशन आणि मायलेज या समाधानकारक बाबी होंडा अमेझमध्ये देण्यात आल्या आहेत. मोकळ्या महामार्गावर जितक्या सहजपणे नियंत्रणामध्ये मोटार चालविता येते तितकीच सुलभता वाहतूक कोंडीमध्येही जाणवू शकते. अमेझची डिझेल आवृत्ती नेरुळ ते लोणावळा या दरम्यान जुन्या रस्त्यावरून चालविली. होंडा सिटीसारखी आरामदायी असणारी ही छोटेखानी सेदान म्हणावी लागते. मात्र त्यामुळे किंमतही तशी कमी असल्याने होंडाने सेदान प्रकारात एक चांगली मोटार भारतीय बाजारपेठेत सादर केली आहे.
अंतर्गत रचनेत प्रशस्तपणा वाटतो. मागील रांगेत बसलेल्या व्यक्तीला आरामशीरपणे बसता येते. सर्व आसनांची रचना व त्यांना मिळालेला मऊशारपणा बसणाऱ्याला नक्कीच आरामदायी वाटणारा प्रवास देतो. बाह्य़ रचनेमध्ये चांगले हेडलॅम्प, छोटय़ा जागेतही वळण्यासाठी झटापट करावी लागत नाही, अशा प्रकारचा टर्निग रॅडिअस, मोठी बूट स्पेस यामुळे अमेझ अमेझिंग झाली आहे.
खड्डय़ांच्या रस्त्यात मात्र सेदान असल्याने फार जपून जावे लागते. ग्राऊंड क्लीअरन्स फार अधिक नसला तरी मोठय़ा स्पीडब्रेकरवरून जाताना अमेझचा तळ खालून घासला जात नाही, खड्डय़ांमध्येही ती आपटण्याची शक्यता कमी होते. सस्पेंशन सॉफ्ट असून त्यामुळे प्रवास त्रासदायक कमी होतो.
टबरे चार्जिग असल्याने दुसऱ्या गीअरमध्ये एक्सलरेटर तुम्ही जास्त देताच मोटार झपकन वेग घेते, पण ब्रेक मारल्यानंतर वेग कमी करून लगेच ब्रेक सोडला तर एक्सलरेशन कायम पहिल्याइतके असल्याने वेग वाढल्यासारखा वाटतो. या प्रकारातील ही तांत्रिक रचना काहीशी नव्या पद्धतीमधील असल्याने तितके सावधपणे वाहतूक कोंडीमध्ये वाहनचालन करावे लागते.
शहर व शहराबाहेरही छानपैकी नियंत्रित करता येईल असे वाहनचालन करता येते. बाह्य़ आरेखनाद्वारे केवळ सौंदर्यच नव्हे तर वाहन चालविताना सुविधाजनक दृष्टिक्षेप टाकता येतो. किंबहुना यामुळेच अमेझ चालविताना शहरात व शहराबाहेर त्रास जाणवत नाही. वाहतूक कोंडीत सहजपणे अमेझ चालविता येते. रुंदी लहान असल्याने हॅचबॅक चालविणाऱ्यालाही अमेझ चालविण्याचा अंदाज झटकन येऊ शकतो. होंडाची सुविधा, आरामदायी प्रवासासाठी असलेली रचना, चांगले मायलेज हेच अमेझचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.
तांत्रिक वैशिष्टय़े
डिझेल व पेट्रोल या दोन्ही प्रकारच्या इंधनावर अमेझची स्वतंत्र वर्गवारी असून मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या श्रेणीमध्ये अमेझ उपलब्ध आहे.
लांबी/रुंदी/उंची/व्हील बेस/ग्राऊंड क्लीअरन्स (सर्व एमएममध्ये) – ३९९०/१६८०/१५०५/२४०५/१६५
इंजिन – डिझेल – ४ सिलेंडर डीओएचसी- आय-डीटेक, १६ व्हॉल्व्ह. १४९८ सीसी/ पेट्रोल – ४ सिलेंडर एसओएचसी- आय-व्हीटेक, १६ व्हॉल्व्ह. ११९८ सीसी
कमाल ताकद – डिझेल -१०० पीएस ३६०० आरपीएम / पेट्रोल -८८ पीएस ६००० आरपीएम
टॉर्क -डिझेल – २०० एनएम १७५० आरपीएम / पेट्रोल – १०९ एनएम ४५०० आरपीएम
ट्रान्समिशन – पाच पुढील गीअर्स व एक रिव्हर्स. व ऑटोमॅटिक उपलब्ध
टर्निग रेडिअस- ४.५ मीटर
इंधन टाकी क्षमता – ३५ लीटर
स्टिअरिंग – कोलॅप्सेबल इलेक्ट्रिकपॉवर स्टिअरिंग
आसन क्षमता – चालकासह ५ जण.
टायर – १७५/६५ आर १४
सस्पेंशन – फ्रंट – मॅकफर्सन स्टर्ट, रेअर- टोरिसन बीम
ब्रेक – फ्रंट- डिस्क, रेअर – ड्रम
रंगसंगती – मॅजेस्टिक ब्ल्यू मेटॅलिक, अर्बन टिटॅनियम मेटॅलिक, कार्नेलियन रेड पर्ल.
मूल्य- एक्सशोरूम मुंबई- पेट्रोल व डिझेलमधील मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध अमेझ विविध श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत.
अमेझ (पेट्रोल) ५ लाख ३५ हजार ६७ रुपयांपासून ८ लाख ८ हजार ५८१ रुपये या किमतींमध्ये.
अमेझ (डिझेल ) ६ लाख ५२ हजार १९६ रुपयांपासून ८ लाख ८ हजार २९३ रुपये या किमतींमध्ये
अमेझची अन्य वैशिष्टय़े
* पेट्रोलवरील अमेझ प्रति लिटर १८ किलोमीटर मायलेज
* डिझेलवरील अमेझ प्रति लिटर २५.८ किलोमीटर मायलेज
* डिझेलवरील अमेझ आयडीटेक इंजिनमुळे वेगही झटकन पकडते.
* टबरेचार्जरमुळे हवा अतिरिक्त प्रमाणात मिळून गतीही वाढते.
* किफायतशीरपणे इंधन वापरता यावे यासाठी इको असा लाइट मार्गदर्शक ठरतो.
* टिल्ट स्टिअरिंग
* म्युझिक सिस्टीम
* स्टिअरिंगवर म्युझिक सिस्टीमचे नियंत्रण
* फोनचा वापर करण्यासाठी ऑक्झिलरी इन व यूएसबीची सुविधा
* आसन व्यवस्थेत उच्च फॅब्रिकचा वापर व मऊशार आसने
* सुरक्षिततेसाठी पुढील आसनांकरिता एअरबॅग्ज
अमेझिंग
होंडाने आपल्या सिटी, सिव्हीक व अॅकॉर्ड या सेदान मोटारींनंतर भारतात त्यापेक्षा लहान आकाराची व कमी रुंदीची ‘अमेझ’ ही सेदान मोटार बाजारपेठेत सादर केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-07-2013 at 10:58 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazing