महिंद्राची आटोपशीर ‘व्हेरिटो व्हिबे’
महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने व्हेरिटो व्हिबे ही आटोपशीर मोटार चंडिगड येथे सादर केली. पंजाबमधील ग्राहकांना त्यात डोळ्यासमोर ठेवले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शाह यांनी सांगितले की, या मोटारीला रेनॉल्टचे दीड लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन असून ती लिटरला २०.८ कि.मी. अंतर जाते. टिकायलाही ही मोटार चांगली आहे. यात अत्याधुनिक अशी चालक माहिती यंत्रणा आहे, ज्यामुळे मायलेज, तापमान, कापलेले अंतर या सगळ्या बाबी कळतात. फॅमिली मोटार म्हणून ती बाजारात आणली आहे. स्टाइल, जागा, सुरक्षा व इंजिनाची क्षमता यात ही गाडी उच्च मानक पूर्ण करणारी आहे. तिची किंमत डी २ मॉडेलसाठी ५.७२ लाख, तर डी ६ मॉडेलसाठी ६.५८ लाख इतकी आहे. भारतीय रस्त्यांवर ती बिनदिक्कतपणे धावू शकते. अ‍ॅक्वा रश या नवीन रंगासह एकूण सात रंगांत ती उपलब्ध आहे.

गाडय़ांची विक्री घटली
भारतात मोटारींच्या देशांतर्गत विक्रीत १२.२६ टक्के घट झाली असून मे महिन्यात मोटारींचा खप १,४३,२१६ इतका होता. गेल्या वर्षी मे महिन्यात हाच आकडा १,६३,२२२ मोटारी इतका होता. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात मोटर सायकलींचा खप ०.७२ टक्क्य़ांनी कमी झाला. गेल्या वर्षी मे महिन्यात ८,८७,६४६ मोटर सायकली विकल्या गेल्या, यंदा हे प्रमाण याच महिन्यात ८,८१,२८८ इतके होते. मे २०१३ मध्ये स्वयंचलित दुचाकी वाहनांचा खप १.१३ टक्क्य़ांनी वाढला असून तो १२,०६,१७३ झाला. गेल्या वर्षी तो मे महिन्यात ११,९२,७०० इतका होता. व्यावसायिक वाहनांची विक्री १०.६ टक्क्य़ांनी कमी झाली. गेल्यावर्षी हा खप ६२,०३२ होता, तो या मे महिन्यात ५५,४५८ इतका झाला. सर्व प्रवर्गातील वाहनांचा विचार करता खप ०.९३ टक्क्य़ांनी कमी झाला. मे २०१३ मध्ये हा खप १४,९८,९०९ होता, तो गेल्या मे महिन्यांत १५,१२,९८६ इतका होता.

हार्ले डेव्हिडसनचा रुबाब!
हार्ले डेव्हिडसन बाईक आता दिल्लीतही दिसू लागली आहे. सध्या हरयाणातील बवाल येथे तिची बांधणी केली जाते. हार्ले डेव्हिडसन बाईक अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी २० वर्षांपूर्वी टर्मिनेटर २ मध्ये जी महाकाय बाइक जंप केली होती त्यामुळे चर्चेत आली. तेव्हापासून ही बाईक हे अनेकांचे स्वप्न होते. पण ते अनेकांसाठी स्वप्नच होते कारण तिची किंमत २० लाख रूपये होती. त्यामुळे तिला ‘फॅट बॉय’ असे गमतीने म्हटले जाते. अतिशय मजबूत अशी ही मोटरसायकल आहे. मोठय़ा चाकांवर बसवलेली फ्रेम हे तिचे खास वैशिष्टय. कॅम १६९० सीसी इंजिन त्यात वापरले आहे. त्यामुळे तिच्या शक्तीविषयी बोलायलाच नको. फूटबोर्ड, क्रोम कोटेड एअर बॉक्सेस, सुखकारक आसन ही तिची इतर वैशिष्टय़े आहेत. हरयाणातील बवाल येथे हार्ले-डेव्हिडसनचा कारखाना आहे. आता या गाडीची किंमत आता दिल्लीत १४.९ लाख रूपये आहे तर पूर्वी ती २० लाखाला होती. महामार्ग प्रवास व इंटर सिटी प्रवासासाठी ती दणकट व हवीहवीशी वाटणारी मोटरसायकल आहे.

‘ए-क्लास’ची मागणी वाढली
मर्सिडीझ कंपनीची ए-क्लास मोटार बाजारात येऊन पंधरा दिवसही झाले नाहीत तर त्या गाडीला ४०० बुकिंग मिळाले आहे. भारतीय मोटार ग्राहकही चोखंदळ बनत असल्याचे हे निदर्शक आहे. सुरूवातीला ही गाडी लक्झरी म्हणून फार कुणी घेत नसे, पण आता तशी परिस्थिती नाही. सेदान व इतर आधुनिक एसयूव्हीशी तिची तुलना केली जाते. तरूणांमध्ये ही गाडी खरेदी करण्याची आर्थिक ताकद आलेली आहे. ए-क्लास सीडीआय गाडीची किंमत मुंबईत २१.९३ लाख रूपये आहे. रस्त्यांवर फार गर्दी होत असल्याने ग्राहक आटोपशीर व कमी जागा व्यापणाऱ्या गाडय़ा पसंत करीत आहेत. गाडी सहज पार्क करता आली पाहिजे हाही एक निकष आता महत्त्वाचा ठरतो आहे. मर्सिडीज बेंझचे व्यवस्थापकीय संचालक बेरहार्ड केर्न यांनी सांगितले की, तरूणांचा भारत आता वयात आला आहे. आज भारतीय लोक लाइफस्टाइल क्षेत्रात नेतृत्व करीत आहेत. भारतीय तरूणांना उत्तम डिझाइन, दर्जा यांची जाण आहे. या प्रतिसादाने आम्ही आता आणखी गाडय़ा बाजारात आणू. सध्या तरी मर्सिडीज बेंझ ए क्लास या गाडीला प्रतिस्पर्धी नाही. नाही म्हणायला व्होल्कसवॉगन बीटल व मिनी कूपर या गाडय़ांचा थोडा बोलबाला आहे. परंतु २०१३ मध्ये बीएमडब्ल्यूची ‘सेरीज वन’ गाडी बाजारात येणार असून ती मर्सिडीजला टक्कर देऊ शकेल.