जुनं ते सोनं अशी आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे. जुन्या वस्तूंचा संग्रह करून त्याची नव्यांशी तुलना करून असं म्हणता येतं. मात्र, काळानुरूप सारं काही बदलत असतंच. बजाजच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल. एकूणच तरुणाईचा कल कुठल्या बाजूने आहे, याचा कानोसा घेत त्यांनी सध्या दुचाकी बाजारात आणण्याचा धडाका लावला आहे. पल्सरच्या बाबतीत तसेच म्हणावे लागेल. पल्सर मालिकेच्या यशानंतर आता बजाजाने अ‍ॅव्हेंजरची ब्रँड न्यू सीरिज बाइकप्रेमींसाठी पेश केली आहे. अर्थात जुन्या अ‍ॅव्हेंजरमध्ये फेरफार करूनच नव्या १५० स्ट्रीट, २२० स्ट्रीट आणि २२० क्रूझ या तीन नव्या गाडय़ा बजाजने आणल्या आहेत. यातील २२० क्रूझ ही तर भन्नाटच आहे. ती नक्कीच तरुणाईला आकर्षति करणारी आहे, यात शंका नाही. १५० आणि २२० स्ट्रीट यांची ऐटही आहेच, त्यामुळे नवं ते सोनं म्हणायला हरकत नाही..
अ‍ॅव्हेंजर मालिकेतील १५० आणि २२० स्ट्रीट आणि २२० क्रूझ या तीनही गाडय़ा सलग तीन दिवस चालवायला मिळणे आणि तेही हायवेला, ही कोणत्याही बाइकप्रेमीसाठी पर्वणीच.. तशी ती आम्हाला मिळाली. या तीनही गाडय़ांची खासियत काय, त्या हायवेला पळतात कशा, शहरात त्या कशा धावतात, मायलेज किती देतात, सस्पेन्शन कसे आहे, जुन्या आणि नव्या अ‍ॅव्हेंजरमध्ये फरक काय आहे, वगरेचा अनुभव घेता आला.

अ‍ॅव्हेंजर १५० आणि २२० स्ट्रीट
जुन्याची विश्वासार्हता टिकवून नव्याचा स्वीकार ग्राहकांकडून अगदी सहजतेने व्हावा यासाठी बजाजने?व्हेंजरच्या मूळ रूपात बदल करण्याचे धाडस केले नाही. यातील १५० व २२० या स्ट्रीट बाइक्स या जुन्या अ‍ॅव्हेंजरसारख्याच आहेत. १५०ला ग्लॉसी डार्क ब्लू आणि २२०ला मॅट ब्लॅक फिनिश देण्यात आला आहे. त्यामुळे त्या अधिक आकर्षक दिसतात. या बाइक्सची उंचीही १२ मिलिमीटरने वाढवण्यात आल्याने त्या अजून लक्ष वेधतात. या व्यतिरिक्त विशेष हेड लॅम्प, एलईडी, स्पीडोमीटर व फ्लेक्झिबल इंडिकेटर्स ही स्ट्रीट श्रेणीची वैशिष्टय़े. १५० आणि २२० सीसी बाइक्सच्या स्पध्रेचा विचार करून बजाजने या स्ट्रीट श्रेणीच्या बाइक्स बाजारात उतरवल्या; परंतु इथे हे प्रकर्षांने जाणवते की, या दोन्ही बाइक्स हिरो, होंडा किंवा यामाहाच्या १५० व २०० सीसी श्रेणीच्या बाइक्सना आव्हान निर्माण करू शकत नाहीत. याबाबतीतल बजाजनी सेफ गेम खेळलाय असे म्हणायला वाव आहे. म्हणजे पल्सरसाठी शोरूममध्ये येणारा बाइकप्रेमी हटकून अ‍ॅव्हेंजरपाशी घुटमळणार आणि त्याच्या मनात द्विधा निर्माण होणार. पल्सर किंवा अ‍ॅव्हेंजर यांच्यात तो चॉइस करू शकेल. अर्थात अ‍ॅव्हेंजरच्या तीनही गाडय़ांना पल्सरचेच डीटीएस-आय इंजिन बजाजने बसवले आहे. त्यामुळे अ‍ॅव्हेंजरच्या नव्या श्रेणीतील गाडय़ांचा मायलेज वाढला आहे. १५० आणि २२० स्ट्रीट बाइक्स साधारणत: अनुक्रमे ४५-५० व ३५-४०चा अ‍ॅव्हरेज देतात. पण आज ६०-७५ चा अ‍ॅव्हरेज देणाऱ्या बाइक्स बाजारात असल्यामुळे अ‍ॅव्हेंजरचा सौदा महागातला ठरू शकतो, अशी उगाचच भीती वाटते. कारण अखेरीस बाइक घेण्यामागची गणिते व्यक्तिगणिक बदलत असतात. या दोन्ही बाइक्सची किंमत अनुक्रमे ७५ आणि ८५ हजार रुपये आहे. या दोन्ही गाडय़ा हायवे आणि शहरात दोन्ही ठिकाणी चालवायला उत्तम आहेत. सस्पेन्शनही चांगले आहे. शिवाय फ्रण्ट डिस्क ब्रेक या दोन्ही गाडय़ांना उपलब्ध आहे. जुन्या अ‍ॅव्हेंजर्सच्या तुलनेत स्ट्रीट मालिकेतील या दोन्ही गाडय़ा उजव्या आहेत.

२२० क्रूझ
हर्ली डेव्हिडसनचे आकर्षण कुणाला नसते. प्रत्येक बाइकप्रेमीचे स्वप्न असते ही बाइक. मात्र, खिशाला परवडेलच असे नाही. त्यामुळेच हल्ली भारतीय दुचाकी बाजारात हर्ली डेव्हिडसनसारखा लुक असणाऱ्या बाइक्स आणण्याचा अट्टहास सुरू आहे. रॉयल एन्फिल्ड, यामाहा वगरेंसारख्या कंपन्यांनी तसा प्रयत्न केला आहे. त्यात आता बजाजच्या २२० क्रूझची भर पडली आहे. वस्तुत: २२० स्ट्रीट आणि २२० क्रूझ यांच्यात एकाच प्रकारचे इंजिन वापरण्यात आले आहे. मात्र, क्रूझचा लुक शब्दातीत आहे. आरामदायी सीट्स, हँडलबार तर थेट हर्ली डेव्हिडसनचा फील देणारे, बाइकस्वाराच्या मागे बसणाऱ्याला (पिलियन रायडर) मागे रेलून बसता येईल अशा पद्धतीने दिलेले बॅक रेस्ट आणि भन्नाट वेग.. अगदी हर्ली डेव्हिडसनची प्रतिकृतीच शोभावी अशी क्रूझ आहे. तुम्ही अक्षरश: क्रूझच करता रस्त्यावरून ही बाइक चालवताना. लाँग ड्राइव्हसाठी आदर्श अशी ही बाइक आहे. शून्य ते ६० सेकंदांत ताशी १०० चा स्पीड पकडू शकणारी क्रूझ रस्त्यावरून जाताना दुसऱ्यांना हटकून माना वळवून बघायला लावते. स्ट्रीट २२० च्याच किमतीत क्रूझ मिळते. मात्र, तुम्हाला तिच्याइतकाच अ‍ॅव्हरेज नाही मिळणार. वेगाची आवड असणाऱ्यांसाठी क्रूझ सर्वोत्तम आहे.

१५० स्ट्रीट
४ किंमत – ७५ हजार, ४ इंधनटाकी क्षमता – १४ लिटर, ४ इंजिन – सिंगल सििलडर, एअर कूल्ड, ४ गीअर – पाच (एक खाली, चार वर), ४ गाडीचे वजन – १४८ किलोग्रॅम
२२० स्ट्रीट
४ किंमत – ८५ हजार, ४ इंधनटाकी क्षमता – १४ लिटर, ४ इंजिन – सिंगल सििलडर, ऑइल आणि एअर कूल्ड, ४ गीअर – पाच (एक खाली, चार वर), ४ गाडीचे वजन – १५० किलोग्रॅम

(सर्व गाडय़ांची किंमत एक्स-शोरूम आहे..)
एकूणच बजाजच्या नव्या अ‍ॅव्हेंजर सीरिजचा बाज वेगळाच आहे. जुन्यापेक्षा या हटके आहेत, हे नक्की. बाइकप्रेमींसाठी एक नवा पर्याय बजाजने खुला केला आहे, हेच तात्पर्य..

२२० क्रूझ
४ किंमत – ८५ हजार, ४ इंधनटाकी क्षमता – १४ लिटर, ४ इंजिन – सिंगल सििलडर, ऑइल आणि एअर कूल्ड, ४ गीअर – पाच (एक खाली, चार वर), ४ टायर – मोठय़ा आकाराचे, ४गाडीचे वजन – १५५ किलोग्रॅम
विनय उपासनी / स्वदेश घाणेकर
ls.driveit@gmail.com

Story img Loader