दुचाकीचे वेड महाविद्यालयात शिकत असताना तरुणाईला सर्वसाधारणपणे असतेच. बाइक चालविण्याची हौस दांडगी असते पण अकरावी-बारावीत शिकत असताना कदाचित बाइक वापरता नाही आली तरी ती हौस सायकलिंग करण्यातून पूर्ण करण्याचा छंद जडतोच.
सुप्रसिद्ध अभिनेता कुशल बद्रिके यालाही कॉलेजमध्ये शिकत असताना दुचाकी चालविण्याची हौस होती. पण बाइक त्याच्याकडे तसेच त्याच्या मित्रांच्या समूहातील कुणाकडेही नव्हती. त्यामुळे तेव्हा सायकलवरून मनमुराद हिंडण्याची हौस कुशल आणि त्याच्या सवंगडय़ांनी पुरेपूर भागवून घेतली. सर्वच मित्रांची आर्थिक परिस्थिती सुधारत गेली आणि कुशल बद्रिके व त्याच्या सर्वच जिवलग मित्रांकडे बाइक्स आल्या. त्यामुळे सायकलवर केलेल्या सहलींची मजा आता बाइक्सवरून लुटायची असे त्यांनी ठरविले.
व्ॉगन आर ही कारही माझ्याकडे असली तरी एकटय़ाने जायचे असेल तर अखंड महाराष्ट्रात कुठेही मी बाइकवरून जातो किंवा कोकणपट्टय़ात बहुतांश भटकंती मी बाइकवरूनच केली आहे. कुशल म्हणाला की, आमचा बारा जणांचा एक ग्रुप कॉलेजपासूनच तयार झाला. कॉलेज संपल्यानंतर अगदी आजघडीलाही आम्ही बारा मित्र नियमितपणे एकमेकांना भेटतो, बाइक्सवरून सहलीला जातो त्याचप्रमाणे एकमेकांच्या अडीनडीला एकमेकांना मदतही करतो. बाइकिंगसाठी सुरुवातीच्या काळात एकत्र आलो असलो तरी त्यातून मैत्री घट्ट होत गेली ती कायमची, असेही कुशल बद्रिकेने आवर्जून नमूद केले.
माझ्याकडे आता बजाज अव्हेंजर ही बाइक आहे. अखंड महाराष्ट्रात कुठेही मी बाइकवरून जातो किंवा कोकणपट्टय़ात बहुतांश भटकंती मी बाइकवरूनच केली आहे.
नेहमी बाइकिंगला जाण्यातून हळूहळू एक ग्रुप तयार झाला. त्याला आम्ही नाव दिले ‘एलटीडीएफ’ म्हणजे ‘लर्निग टीचिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड फन.’ या मार्फत आम्ही नुसतेच बाइकिंग केले नाही. मुरबाड, कर्जत, शहापूर, बदलापूर या परिसरातील पिकनिक स्पॉट पाहायचे, ते करता करता मुरबाड, नेरळ परिसरातील आदिवासी मुला-मुलींच्या शाळांना आम्ही भेटी दिल्या. तेव्हा आमच्या लक्षात आले की फक्त शैक्षणिक साहित्यच नाही असे नव्हे तर त्याचबरोबर बऱ्याच मुलांच्या पायात चपलाही नसतात. दरवर्षी १५ ऑगस्टला आम्हा १२ बाइकर्सची रॅली निघते. आम्ही आमच्या आमच्यातच निधी संकलन करून आतापर्यंत दोन शाळांमधील मुलामुलींना आवश्यक त्या वस्तू नेऊन दिल्या. जे शक्य असेल ते आम्ही त्यांना स्वत: नेऊन देतो. बाइकिंगची हौस पूर्ण करतानाच आम्हाला दिसले ते न्यून आम्ही पूर्ण करण्याचा आमच्या परीने खारीचा वाटा उचलतो, असेही कुशल बद्रिकेने आवर्जून सांगितले.
शब्दांकन – सुनील नांदगावकर

Story img Loader