एखाद्या वस्तूत सौंदर्य पाहण्याचा वा ती अधिक सौंदर्यशाली कशी बनेल त्यासाठी कारागिरी करण्याचा शौक त्या वस्तुच्या उपयुक्ततावादाच्या पहिल्या पायरीनंतर सुरू होतो. एखादी वस्तू तयार केली की मग ती उपयुक्ततेबरोबरच सुंदर कशी दिसेल, आकर्षक कशी बनविता येईल ते पाहण्याचा नैसर्गिक मानवी दृष्टिकोन असतोच. यामुळेच मोटारींच्या इतिहासाकडे जरी नजर टाकली तरी त्या मोटारींमध्ये सौंदर्यशालीनता किती तरी वेगवेगळ्या अंगांनी पाहिली गेली, घडविली गेली. यामुळेच आधुनिक युगातही अद्ययावतपणा राखताना मोटारीच्या सौंदर्यशालीनतेलाही महत्त्व आले आहे.
वाहन चारचाकी असो की दुचाकी, अगदी ट्रॅक्टरसाठीही तो चांगला कसा दिसेल यासाठी अनेक शौकीन प्रयत्नशील असतात. मोटारीच्या बाबतीत तिचे बॉनेट, तिचे हेडलॅम्प, टेललॅम्प, आरसे, बम्पर, रंग, तिच्या पत्र्याला दिलेला विशिष्ट आकार व एकंदर मोटारीला दिलेला आकार हा आरेखनशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. किंबहुना या रंगरूपावरच ग्राहक भाळतो ना, त्यामुळे मोटारीचे बाह्य़स्वरूप व अंतरंग आकर्षक, सौंदर्यपूर्ण, कधी शक्तिशालीपणाचा प्रत्यय देणारे बनविण्यात येतात.
सध्याच्या आधुनिक काळातही नवनवीन मॉडेल्सची रचना करताना माणसाच्या मनातील सौंदर्याच्या आदिम कल्पनेचाही विचार केला गेला आहे. किंबहुना त्यामुळेच तर मोटारीचे महत्त्वही अधिक खुलून दिसते. मोटार कोणती वापरतो हा प्रेस्टिजचा भाग बनू शकतो, त्याविषयी अभिमान बाळगता येतो. एसयूव्ही, एमयूव्ही, सेदान, हॅचबॅक, स्टेशनव्ॉगन, व्हॅन अशा विविध प्रकारांतील आकारांच्या व उपयोगातील मोटारींचा असलेला हा सौंदर्याचा आविष्कार नेमका कुठे व कोणत्या कोणत्या भागांमध्ये दिला जातो ते पाहण्यासारखे आहे. केवळ मोटारींचे उत्पादकच नव्हेत तर मोटारीची खरेदी केल्यानंतरही त्यामध्ये सुधारणा करणारे अनेक जण असतात.
बम्परमधील आविष्कार
बम्पर हा मोटारीच्या पुढील व मागील भागात बसविण्यात येणारा एक भाग. मोटारीला एखादी वस्तू, दुसरी मोटार व अन्य काही धडकल्यास त्यापासून मोटारीचे संरक्षण करण्यासाठी बम्परचा वापर मोटारीमध्ये केला जातो. पातळ अशा धातूच्या पट्टीपासून ते अलीकडच्या काळातील प्लॅस्टिक वा फायबरपासून बनविलेले बम्पर उपलब्ध आहेत. या बम्परच्या आकारात वैविध्यपूर्णता आणण्याचे प्रयत्न सातत्याने केले गेले आहेत. तो दणकट नसला तरी तसा तो आहे, असे भासले जाणारे बम्परही काही मोटारींना बसविले जातात. इतकेच नव्हे तर कमी नटबोल्टच्या आधारेही वेल्डिंगचा वापर न करता वा प्लॅस्टिकच्या बम्परला त्या विशिष्ट खाचांमध्ये बम्पर बसविण्याची तरतूद केली गेली आहे. त्या बम्परला मोटारीला कसे बसविले गेले आहे किंवा लावले गेले आहे हे दिसू नये याचे प्रयत्न आधुनिक काळातील सध्याच्या मोटारींमध्ये येतात.
प्लॅस्टिकचे तयार केलेले हे बम्पर लवचिकपणाबरोबरच चिवट व बळकटही असतात. मात्र ते धातूसारखे कडक वा कठीण नसतात. त्यामुळे मोटारीला धडक बसल्यास त्या बम्परवर त्या धडकेचा आघात होताच तो बम्पर आपल्या गुणांमुळे धक्क्य़ाला शोषून घेतो, त्यामुळे त्या आघाताचा जोर कमी होतो. प्लॅस्टिकचे हे बम्पर विविध प्रकारच्या मोटारींना साजेसे व मोटारींचे सौंदर्यही वाढविणारे असतात. या बम्परचा पृष्ठभाग गुळगुळीत व त्या रंगानुसार चकाकी देणाराही करता येतो. त्याच्या आकारामुळे मोटारीला वजन वाटत नाही. पूर्वी मोटारीला धातूचे, लोखंडाचे व त्यावर स्टील कोटिंग केलेले किंवा नंतर पावडर कोटिंग केलेले बम्पर दिले जात. त्यामुळे मोटारीचे वजनही वाढत असे. ते कडक असल्याने ते त्यावर आघात झाल्यास काही प्रमाणात ते आघात सहन करीत अन्यथा जोरदार आघात झाल्यास ते तुटत वा वाकत. यामुळे तो बम्पर पुन्हा नीट करणे वा फेकून देणे हे काम तसे खर्चीक होते. बम्परच्या निर्मितीमध्ये प्लॅस्टिकचा वापर होऊ लागल्याने मोटारीच्या वजनातही हलकेपणा आला. त्याचप्रमाणे सुबकता, सौंदर्य व लवचिक-चिवटपणा मिळाल्याने अपघातामध्ये आघात शोषून घेण्याचेही काम सुकर झाले. बम्परची निर्मितीही तशी स्वस्त असल्याने ते अपघातामध्ये खराब झाल्यास ते फेकून देणे व नंतर त्याच प्रकारातील दुसरे बम्पर विकत घेणे शक्य असल्याने त्या त्या मोटारीच्या मॉडेलसाठी हे प्लॅस्टिकचे बम्पर तसे मोटार उत्पादकांना व ग्राहकालाही स्वस्त वाटू लागले. त्यांचे कमी वजन, त्यांचा विशिष्ट आकार जो वाऱ्याला कापत जाऊ शकतो, अवरोध करीत नाही, यामुळेही मोटारीच्या मायलेजवर चांगला परिणाम झाला. मागील बम्पर हाही एक महत्त्वाचा भाग असून त्याची रचनाही पुढील बम्परप्रमाणे असते. काही मोटारींच्या या मागील बम्परमधूनच मफलरचे धूर ओकणारे नळकांडे बाहेर काढलेले असते. त्यावर फॉग लाइटही लावण्यात आलेले असतात. इतकेच नव्हे तर स्टेपनीच्या टायरचे वजन सहन करण्याचीही ताकद या बम्परमध्ये असते. लोखंडी व पावडर कोटिंगचे बम्परही खास आकार देऊन लावले जातात. अर्थात बम्परमुळे मोटारीचे एक सौंदर्य वाढावे, मोटारीचा लूक पिळदार शरीरयष्टीच्या पहिलवानासारखा वाटावा, अशीही काहींची इच्छा असते. त्यामुळे वेगळे बम्पर लावण्याची विशेष काळजी काही हौशी घेताना दिसतात.
बम्परमध्येच फॉग लाइटची सोय, विशिष्ट प्रकारच्या आरेखनामुळे इंजिन, रेडिएटर यांच्यापर्यंत होणारे हवेचे चलनवलन अशा अनेक गोष्टींबरोबरच मोटारीच्या रंगाप्रमाणेच बम्परला दिला गेलेला रंग व तितकाच रेखीवपणा या बाबी सध्या बम्परचे सौंदर्य, सौष्ठव आणि उपयुक्तता वाढविण्यासही साहाय्यकारक ठरल्या आहेत.
बम्परचा आविष्कार
एखाद्या वस्तूत सौंदर्य पाहण्याचा वा ती अधिक सौंदर्यशाली कशी बनेल त्यासाठी कारागिरी करण्याचा शौक त्या वस्तुच्या उपयुक्ततावादाच्या पहिल्या पायरीनंतर सुरू होतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-08-2012 at 11:27 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Car drive drive it four wheeler