दोन मोटारी एकमेकांशी बोलू लागल्या तर.. हा काही निबंधाचा विषय नाही ही हकीगत आहे. अमेरिकेत वाय-फाय तंत्रज्ञानाच्या मदतीने एकमेकांशी बोलणाऱ्या (अर्थाच सांकेतिक भाषेत संवाद साधणाऱ्या) मोटारी प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. या मोटारींचा उपयोग म्हणजे त्या सतत एकमेकांशी संपर्कात असल्याने एकमेकांवर आदळणार नाहीत. वाहतूक कोंडी होणार नाही कारण त्या आपसमजुतीने वेगाचे नियोजन करतील.
वाय-फाय तंत्रज्ञानावर आधारित ही यंत्रणा मोटारींना एकमेकांशी संपर्क ठेवण्यात मदत करणार आहे. मिशीगन येथील अ‍ॅन अरबारच्या रस्त्यांवर हा प्रयोग करून दाखवण्यात येत आहे. यात मोटारी एकमेकांशी संपर्कात राहतील तसेच त्यांचा संपर्क हा वाहतूक नियंत्रण केंद्राशीही राहील.
बिनतारी यंत्रणेच्या मदतीने ही वाहने एकमेकांना संदेश पाठवतील व त्यांच्या चालकांना थांबलेली वाहतूक, तांबडा दिवा लावून जाणाऱ्या गाडय़ा यांची पूर्वसूचना देतील. जर रस्त्यात दुसऱ्या मोटारीच नसतील तर वाहतूक सिग्नल बदलून तो हिरवा करून घेतील.
अमेरिकेतील वाहतूक खाते व मिशीगन विद्यापीठ यांनी २५ दशलक्ष अमेरिकी डॉलरचा हा प्रकल्प आखला असून त्यातून मिळणाऱ्या माहितीने अपघात व वाहतूक कोंडी कमी होईल. अशी मोटारींना बोलते करणारी यंत्रे कालांतराने सर्वच मोटारींना बसवली जातील. सध्या ही यंत्रे लावलेली पाचशे वाहने रस्त्यावर धावत आहेत. सहा आठवडय़ात ही संख्या २८०० केली जाईल. वाहतूक सुरक्षेसाठी हा अतिशय महत्त्वाचा प्रयोग आहे असे वाहतूक मंत्री रे लाहूड यांनी सांगितले आहे. हे क्रांतिकारी तंत्रज्ञान सुरक्षेबरोबर रस्त्यांची कार्यक्षमताही वाढवणार आहे. वाहनांचे अपघात ही अमेरिकेत एक मोठी समस्या आहे. एअर बॅग्ज, अँटीलॉक ब्रेक्स, स्टॅबिलिटी कंट्रोल ही साधने वापरून अपघातांचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. जर मोटारी एकमेकांशी बोलू लागल्या संपर्कात राहिल्या तर दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांमुळे होणारे अपघात कमी करता येतील. मोटारी व ट्रकमध्ये हे उपकरण बसवण्यात येईल तेव्हा त्याचे आणखी चांगले परिणाम दिसून येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा