दसरा आणि दिवाळीच्या मध्याला मुंबईत वाहन प्रदर्शन झालं. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या विस्तीर्ण मैदानावर सलग चार दिवस ते चाललं. नवी वाहनं तशी तिथं तुलनेने अशी नव्हतीच. मात्र या विषयासाठी बारमाही उत्सुक टिनेजरचा गलका यंदाही कायम होता. नेहमीच्या लेम्बोर्गिनी, लॅण्ड रोव्हर, बीएमडब्ल्यू, ऑडीबरोबर त्यांनी छबीही काढून घेतली. प्रवेशानंतर आगळेपण होतं ते गाडय़ांच्या सुरचना आणि म्युझिक सिस्टीममधील आघाडीच्या जेएलबी दालनाचं. या आद्याक्षराचे टी-शर्ट घातलेले तरुण गॉगल लावून डीजेच्या तालावर डान्स करीत होते. कर्णकर्कश संगीत होतंच. हा विषय इथंच संपला नव्हता. लाखमोलाच्या स्पीकरची चर्चा प्रत्यक्ष वाहन प्रदर्शनाला भेट देण्यापूर्वीच सुरू होती. चारचाकी, दुचाकी, टायरवाले, अ‍ॅसेसरीजवाले अशा डझनभर कंपन्यांच्या दालनांनंतर गॅझेट दालन सुरू झालं. त्याची रचनाही भिन्न होती. निळ्याशार कृत्रिम गुहेत काळी काळी विविध गॅझेट तिच्या फीचरसह ठेवण्यात आली होती. स्पीकर, मोबाइल, स्क्रीन, व्हिडीओ गेम आदी विद्युत उपकरणं, उत्पादनं इथं होती.
माणसाच्या उंचीचा भला मोठा सॅमसंगचा दूरचित्रवाणीही इथं होता. त्याची किंमत २६.५० लाख रुपये सांगण्यात आली. भारतातील सर्वात महागडा टीव्ही असल्याची जाहिरातही या वेळी केली गेली. त्याला जोड होती ती एक कोटी रुपये किमतीच्या स्पीकरची. तो पलीकडच्या ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये ठेवण्यात आला होता. गॅझेटचं अनोखं महत्त्व ही दोन उत्पादनं सांगत होती, ती केवळ किमतीबाबतच नव्हे तर तिच्या अनोखेपणाचंही.
एरवी आपल्या हातातलं गॅझेटचं विश्व निराळं आणि मुठीत सामावणारं असतं. मोबाइल ते म्युझिक सिस्टीम असं त्याचं सर्वसाधारण रूप. केवळ मनोरंजनच नव्हे तर ज्ञान-विज्ञानाचा आधार बनलेलं ऑटो गॅझेटचं जग तसं विस्तीर्ण. केवळ कार टेप आणि जोडीला मागे स्पीकर असं त्याचं स्वरूप राहिलेलं नाही. मॅप, सेन्सर तसेच अन्य बहुपयोगी अनेक उत्पादनं आता या शंृखलेत केव्हाच येऊन बसली आहेत.
अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाची कास आणि अधिकाधिक सोयी-सुविधांची जोड गॅझेटला देण्यासाठी उत्पादक कंपन्याही झटत आहेत. श्रोते-दर्शक वाहनचालकांची त्याबाबतची सजगताही दिवसेंदिवस वाढत आहे.
कॅसेटनंतर सीडी आणि आता पेन ड्राइव्हद्वारे संगीत ऐकण्याची सोय वाहनांमध्येही आली आहे. मोबाइल चार्ज करण्यासह, मॅप, रिव्हर्स-डोअर सेन्सर या सुविधाही वाहनांमध्ये उपलब्ध होत आहेत.
कारकॅम व्होएजर
कारकॅम व्होएजर हा व्हिडीओ कॅमेरा आठ तासांचं रेकॉर्डिग करू शकतो. ३एएए बॅटरीवर किंवा १२ व्होल्ट डीसी पॉवर कॉर्डवरील या उपकरणात २जीबी मेमरी कार्ड आहे. एखाद्या बिकट अपघातप्रसंगी सचित्र माहिती याद्वारे पोलीस अथवा विमा कंपन्यांना देता येते.
सुपरटूथ एचडी
रिएल्टीपॉड या इंग्रजी ब्लॉगने २०१३ मधील ऑटो क्षेत्रातील आघाडीची पाच गॅझेट निवडली आहेत. त्यातील पहिलं म्हणजे सुपरटूथ एचडी. ते हॅण्ड्सफ्री ब्ल्यूटूथ स्पीकर डिव्हाइस आहे. ते खास कारसाठीच तयार करण्यात आलं आहे. डी-एम्प स्पीकरसह ते आहे. त्यात डय़ुएल मायक्रोफोन, मॅग्नेटिक क्लिपही आहे. त्यामुळे गाडीमागील लाइटमधील बदलाचा चालकाला अंदाज येतो. गाडय़ांमध्ये फोनची उपलब्धतताही तशी नवी नाहीच. मात्र याद्वारे असलेल्या एका बटणाद्वारे आलेल्या फोनला उत्तरही देता येते आणि कॉलही करता येतो. इंग्रजीबरोबर फ्रेन्च भाषेत एसएमएस अथवा ईमेल पाठविण्याचीही सोय येथे आहे.
आयट्रेल
आयट्रेल मिनी डिव्हाइस जीपीएस ट्रॅकरचं काम करतो. वाहनाची स्थिती त्याचबरोबर वाहनाचा वेगही याद्वारे ज्ञात करून घेतला जातो. गुगल अर्थ आणि मॅपच्या आधारावर त्याची रचना आहे. मुलांवरील वाहन वापर र्निबधासाठीदेखील याचा उपयोग होतो.
कारएमडी
संगणकाच्या धर्तीवर काम करणारी ही पद्धती वाहन दुरुस्तीच्या कामी मदत करते. कोणत्या समस्येवर वाहनाचा नेमका कोणता भाग आणि त्यातून कशी सुटका करता येईल, याची माहिती याद्वारे मिळू शकते. संकेतस्थळाच्या आधारे संबंधित चुकीची दुरुस्ती करण्यासाठी उपयुक्त अशी अन्य संपर्क माहितीही मिळते. यामुळे येणाऱ्या खर्चाचा नेमका अंदाजही बांधला जातो. दुरुस्तीत काही त्रुटी राहिल्यास त्याची कल्पनाही दिली जाते, ज्यामुळे पुढील संकटाची जाणीव होते.
केन्ग्स्टिन प्रोझिमो
तुमचं वाहन प्रत्यक्षात कोणत्या स्थितीत कुठं आहे हे खऱ्या अर्थी शोधण्याचा हा पर्याय आहे. गर्दीतल्या पार्किंगमध्ये तर याचा शोध स्मार्टफोनवरही सापडतो. ब्ल्यूटूथ ४.० टीएजीएसदेखील तुम्हाला गाडीतील महत्त्वाच्या वस्तू संपर्कात ठेवण्यास मदत करतो. एका प्रोक्झिओ टॅगद्वारे किमान पाच वस्तू जोडता येऊ शकतात.

Story img Loader