गाडी घेण्याचा विचार दोन वर्षांपासून सुरू केला होता; पण म्हणतात ना, माणसाच्या आयुष्यात घर, गाडी या गोष्टी नशिबात असेल तेव्हाच मिळतात. जुनी गाडी की नवी गाडी घ्यावी याबाबत सारखे मन साशंक होते, कारण प्रत्येकाचे त्याबाबतचे मत हे भिन्न असते.
सतत दोन वर्षांपर्यंत जुनी गाडी बघितल्यावर किंवा नवीन गाडी घेताना ती सीएनजी घ्यावी की पेट्रोलवर चालणारी, रंग कोणता निवडावा याबाबत आमचे पारिवारिक तसेच जिवलग मित्र रवीकुमार शिंदे व शीतल शिंदे यांचे खूप मोलाचे मार्गदर्शन झाले. शेवटी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर २०१४ मध्ये मी माझी नवीन अल्टो ८०० घरी आणली. एम.ए.ची पदवी घेतानाही जितका आनंद झाला नसेल एवढा आनंद मला माझ्या अल्टोची चावी घेताना झाला होता.
गाडी घेतल्यावर पहिल्याच दिवशी माझा गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे गाडी समोरच्या व्यक्तीवर जाणार तेवढय़ात आमच्या मित्राने लगेचच हॅण्डब्रेक लावल्यामुळे गाडी नियंत्रणात आली; पण तो प्रसंग माझ्या आयुष्यातील एक गंभीर अनुभव म्हणावा लागेल, कारण त्याच कालावधीत आमच्या वसाहतीत एका महिलेने तिच्या गाडीद्वारे एका माणसाला उडविले होते व त्यात त्याला आपल्या प्राणास मुकावे लागले होते. परमेश्वर कृपेने तसा कोणताच प्रसंग माझ्यावर आला नाही.
गाडी घेण्यापूर्वी दोन वर्षेअगोदर गाडी शिकायला व वाहन परवान्यासाठी मी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाणे सुरू केले होते; पण त्याचा मला केवळ परवाना मिळण्यापलीकडे विशेष काहीही उपयोग झाला नाही. शिकाऊ परवाना काढण्यासाठी आरटीओमध्ये जाताना एका वयस्क महिलेने मला प्रश्न विचारला, घरी गाडी आहे का? पती ड्राइव्ह करतात का? यावर माझे नाही हे उत्तर ऐकल्यावर तिने माझे मनापासून कौतुक केले जे मला गाडी शिकण्यासाठी प्रेरणादायी ठरले.
नवीन गाडी घरी आणल्यावर परत मी १० पीरियडसाठी ड्रायव्हिंग स्कूल लावून घेतले. त्यानंतर आमच्या ऑफिसचे एक सहकारी खोत यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी व माझे पती दोघेही वाहन चालविण्यात पारंगत झालो आहोत. आमच्या मुलीला शिकवणीला सोडणे असो, किराणा आणणे असो वा अन्य काम, मी आता अल्टोनेच जाते. त्यामुळे माझा गाडी चालविण्याचा आत्मविश्वासही वाढला.
माझी पाच वर्षांची मुलगी मैथिली ही मला गाडी शिकण्यासाठी प्रेरणादायी ठरली, असे म्हणायला हरकत नाही. ती मध्येच ‘मम्मी, तुला रिव्हर्स गीअर जमत नाही,’ असेही सांगते. त्यामुळे तिचे ते वाक्य ऐकल्यावर वाटायचे की, ज्या गोष्टी ही पाच वर्षांचे मूल आत्मसात करू शकते ते आपण का नाही करू शकणार? १० वर्षांपूर्वी मला नोकरी नसतानाही मी गाडी घेण्याचे स्वप्न आपल्या मित्रपरिवारात बोलून दाखविले होते. त्या वेळेस मला वाटलेही नाही की, १० वर्षांनंतर माझी स्वत:ची गाडी असेल म्हणून. ते स्वप्न वयाच्या ३८ व्या वर्षी साकार झाले तेव्हा मला खरेच या गोष्टीचा अभिमान वाटतो व वाटते की, अशक्य असे या जगात काहीच नसते व तुमचे विचारच तुम्हाला घडवीत असतात. आज सहपरिवार लाँग ड्राइव्हला जाणे असो वा ऑफिसला, आपल्या स्वत:च्या गाडीने फिरण्यात जो आनंद आहे तो शब्दापलीकडला आहे; अनमोल, अवर्णनीय आहे.
ज्योती भनारकर, अणुशक्तीनगर, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा