दुभंग, सतरंगी, झपाटलेला या चित्रपटांतून नावारुपाला आलेल्या आदिनाथ कोठारेचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘हॅलो, नंदन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो आहे. त्यामुळे आदिनाथची गाडी सध्या खूश आहे. अभिनयाबरोबरच आदिचे दुसरे पॅशन आहे, ते म्हणजे ड्रायव्हिंग.. त्याच्या या पॅशनबरोबरच ड्रीम कारबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा
लहानपणापासून बायकिंग आणि सायकलिंगची खूप आवड होतीच. स्पोर्ट्स बाइक चालवायचीही हौस होती. पण कालांतराने मी कार ड्रायव्हिंग माझे ‘पॅशन’ बनले. अभिनयाचे ‘पॅशन’ आणि कारचे ‘पॅशन’ दोन्ही मला खूप आहे. अभिनयाची आवड बाबांनी माझा छकुला या चित्रपटात काम दिले तेव्हापासूनच निर्माण झाली. त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या त्यांच्या आवडीच्या कार्स मी खूप चालविल्या. पण माझ्या पैशाने २००९ साली मी मारुती सुझुकीची ‘ए स्टार’ ही गाडी खरेदी केली. स्वत:च्या पैशाने त्यावेळी परवडणारी आणि आवडणारी गाडी घेणे यातला आनंद सुखावणारा होता. त्यानंतर अॅक्सेंट, व्हेर्ना या गाडय़ाही चालविल्या. मला एसयूव्ही घ्यायची इच्छा खूप होती आणि विशेष म्हणजे अगदी आताच मी निस्सान कंपनीची टेरानो ही एसयूव्ही घेतली. संपूर्ण पांढऱ्या रंगाची टेरानो घेऊन मित्रांसोबत कोकणात लाँग ड्राइव्हला जाण्याचा आनंद काही औरच असतो. ड्रायव्हिंग करण्याचा आनंद टेरानोमुळे द्विगुणित झाला असे म्हणता येईल. एसयूव्ही कारचे ड्रायव्हिंग आणि अन्य साध्या गाडय़ांचे ड्रायव्हिंग यात खूप फरक आहे. टेरानोचे ‘लूक्स’ मला खूप आवडले म्हणूनच मी ही कार घेतली. या कारचा महत्त्वाचा फायदा म्हणजे गाडीत मुबलक जागा आहे. माझ्याकडे माऊण्टन बाइक आहे. ती या टेरानो या गाडीत सहज मावते. ती घेऊन कोकणात किंवा डोंगरदऱ्यांच्या ठिकाणी शूटिंगला किंवा फिरायला गेलो की मी तिकडे जाऊन डोंगरदऱ्यांतून भरपूर सायकलिंग करतो. गाडीची आवड असली तरी तेवढीच मला सायकलिंगचीही खूप हौस मी अशी भागवून घेतो. एसयूव्ही कार सध्या वापरतोय. पण ड्रीम कार कुठली असे विचारशील तर ‘जॅग्वार’ हेच उत्तर द्यावे लागेल. जॅग्वार गाडी कधीतरी मी नक्की घेईन.
शब्दांकन : सुनील नांदगावकर
ड्रीम कार.. : जॅग्वार
दुभंग, सतरंगी, झपाटलेला या चित्रपटांतून नावारुपाला आलेल्या आदिनाथ कोठारेचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘हॅलो, नंदन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतो आहे.
First published on: 21-03-2014 at 01:59 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dream car jaguar