टाटा मोटर्सने अलीकडेच त्यांच्या प्रवासी मोटारी बांगलादेशच्या बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली आहे. सेडान इंडिगो, एसीएस व इंडिगो मांझा तसेच इंडिका व्हिस्टा अशी अनेक मॉडेल्स आता बांगलादेशात सादर केली जात आहेत. तूर्त टाटा मोटर्सने दोन सेडान मॉडेल्स तेथे सादर करण्याचे ठरवले आहे. ढाका येथे एका शोरूममध्ये सध्या या मोटारी विक्रीस ठेवल्या जाणार आहेत नंतर २०१३ पर्यंत आणखी तीन शहरात विक्री केंद्रे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांनी सांगितले की, बांगलादेशातील बाजारपेठेत प्रवेश करताना आम्हाला विशेष आनंद वाटतो. आमचे गेली चाळीस वर्षे या देशाशी ऋणानुबंध आहेत त्यामुळे तेथील लोकांच्या आवडीनिवडी आम्हाला माहीत आहेत. टाटा मोटर्सची व्यावसायिक वाहने १९७२ पासून बांगलादेशात आहेत. टाटा मोटर्सने बांगलादेशात निटॉल मोटर्सला वितरक म्हणून मान्यता दिली आहे. या कंपनीचे अध्यक्ष अब्दुल मतलब अहमद यांनी सांगितले की, टाटा मोटर्सशी दोन दशकांपासून आमचे संबंध आहेत आता व्यावसायिक वाहनांच्या जोडीला प्रवासी मोटारी उपलब्ध करून दिल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. बांगलादेशात टाटा कंपनीची एकूण ५३ हजार व्यावसायिक वाहने आहेत. तेथील सत्तर टक्के  बाजारपेठ टाटा कंपनीच्या ताब्यात आहे.
ऑडी गाडीची जुळणी भारतात
जर्मनीच्या ऑडी या कंपनीच्या एसयूव्ही वाहनांची जुळणी यापुढे औरंगाबादच्या प्रकल्पात केली जाणार आहे. सध्या सेडान ए ४, ए ६ व एसयूव्ही क्यू ५ व क्यू ७ यांची जुळणी भारतात होते यापुढे क्यू ३ प्रकारच्या वाहनांची जुळणीही भारतात होणार आहे. येत्या १८-२४ महिन्यांत दरवर्षी १२००० मोटारी भारतात तयार होणार आहेत. ऑडीचे भारतातील प्रमुख मायकेल पेरश्के यांनी सांगितले की, क्यू ३ प्रकारच्या मोटारींची जुळणी यापुढे भारतात होईल. औरंगाबाद येथे सध्या ७५०० ते ९००० वाहनांची जुळणी होते. २००७ पासून कंपनीने भारतात ३ कोटी युरोची गुंतवणूक केली आहे. आता सध्या एकाच शिफ्टमध्ये काम चालू आहे ते वाढवल्यास १२ हजार वाहनांची जुळणी होऊ शकते. गेल्या वर्षी कंपनीने क्यू ५ एसयूव्ही वाहनांची जुळणी सुरू केली तर यावर्षी क्यू ७ वाहनांची जुळणी सुरू केली आहे. गेल्या वर्षी भारतात ५५११ एसयूव्ही मोटारी विकल्या गेल्या तर यावर्षी ८ हजार मोटारी विकण्याचे उद्दिष्ट आहे.
जनरल मोटर्स कंपनी आता शेवरोलेट स्पार्क ही इलेक्ट्रिकवर चालणारी मोटार सादर करीत आहे. लॉसएंजल्स येथील वाहन मेळ्यात ती सादर केली जाणार आहे. कॅलिफोर्निया, ओरेगॉन, कॅनडा, दक्षिण कोरिया व इतर ठिकाणी तिची विक्री सुरू होणार आहे. शेवरोलेट व्होल्ट सेडानपेक्षा ती वेगळी आहे. स्पार्क हे मॉडेल केवळ इलेक्ट्रिकवर चालणारे आहे. एकदा चार्जिग केल्यानंतर फोर्डची फोकस सेडान ७६ मैल धावते आता जनरल मोटर्सची शेवरोलेट स्पार्क त्या तुलनेत कशी कामगिरी करते याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या गाडीचे वैशिष्टय़ म्हणजे ती इतर इलेक्ट्रिक मोटारींपेक्षा स्वस्त आहे. अमेरिकेत तिची किंमत २५ हजार डॉलर असणार आहे. निसान लीफची किंमत ही २७,७०० डॉलर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा