मोटारीच्या सौंदर्यामध्ये आकर्षणामध्ये मोटारीचा पुढचा भाग म्हणजे मोटारीचा मुखवटा हा एक महत्त्वाचा भाग आहे. मोटारीच्या मुखावरून तिचा एकंदर लूक कसा असेल याची कल्पना येते. ग्राहकांसाठी, विशेष करून तरुणांसाठी मोटारीचा मुखवटा कसा आकर्षक असेल, त्या त्या काळाचा ट्रेंड काय असेल हे लक्षात घेऊन त्या मोटारीचे आरेखन करताना मोटार उत्पादक कंपन्या मोटारीचा मुखवटा अधिकाधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतात. त्याबाबत तसा प्रचारही जाहिरातींमधून साधला जातो. नेमके हे मुखवटय़ाचे तंत्र किती प्रभावी ठरते ते पाहण्यासारखी बाब आहे.
मोटारीचा मुखवटा- फेसलिफ्ट कसा आहे, त्यावर कटाक्षाने विचार केला जातो. मोटारीचा वेग, तिचे रांगडेपण, तिचा दिसण्यातील नाजूकपणा, लावण्यावतीसारखे भासणे किंवा गतीशी तुलना करणारे त्या मोटारीचे स्वरूप, आरामदायी रूप, राजेशाही दिसणे वा कंपनीच्या एकंदर धोरणानुसार असणारा मोटारीचा लूक अशा अनेक बाबी मोटारीच्या मुखदर्शनातून स्पष्ट होत असतात. काही आरेखनांतून तर फॅण्टम (वेताळ) भासावा असा मोटारीचा मुखवटाही पूर्वी तयार करण्यात आल्याचे दिसते.  मोटारीच्या पुढील बाजूस असणारे ग्रिल, कंपनीचा लोगो, चकचकीतपणा, हेडलॅम्पची ठेवण, बॉनेटचा आकार या साऱ्या बाबी मुखदर्शनातील महत्त्वाच्या ठरत असतात.  ही सारी रूपे साकारताना मोटारीच्या दिसण्यामध्ये कलात्मकता देण्याचा आरेखनकारांचा प्रयत्न असतो. सध्याच्या युगात दणकटपणापेक्षा सुरक्षितता व कलात्मकता या गोष्टींना अधिक प्राधान्य दिले जाते. यामध्ये साधे उदाहरण म्हणजे एकेकाळी पुढील बाजूला असणाऱ्या बंपरसाठी- लोखंडी गार्ड वजनदार व भरीव असत. आज त्यापेक्षा त्या बंपरचा लवचीकपणा हा सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे फायबर व प्लास्टिकचा वापर यामध्ये होतो. त्या प्रकारच्या बंपरला असणारे पाहिजे ते रंगरूप देताना मूल्यही कमी लागते. हे सारे गुण आज या सौंदर्याविष्कारातीलच घटक बनले आहेत.
मोटारीच्या मुखाचे हे वेगवेगळे रूप इंटरनेटवरील साइट्सवर, ब्लॉगवर पाहावयास मिळते. मोटारींबाबत परदेशात असलेली आत्मीयता, प्रेम वा आकर्षण ज्या पद्धतीने व्यक्त केले जाते तेही पाहण्यासारखे आहे; किंबहुना मोटारीच्या मुखदर्शनाबाबतचे आकर्षण म्हणजे काय तेच यावरून लक्षात येण्यासारखे आहे. फेसलिफ्टमध्ये मोटारीच्या पुढील भागात असणाऱ्या ग्रिलमध्ये पूर्वीपासून सौंदर्यदृष्टी राखून मोटारीचे रूपडे खुलवायचा प्रयत्न केला गेला. आता मोटार कोणत्या कंपनीने तयार केली आहे ते ओळखण्यासाठी लोगोच नव्हे तर त्या कंपनीच्या विविध मोटारींचे मुखवटे सारखेच असल्याचेही दिसून येते; किंबहुना ती त्या कंपनीची खासियत ठरलेली आहे. काही असले तरी मोटारीच्या या दर्शनी भागाने ग्राहकांवर पूर्वीपासून चांगलीच छाप पाडलेली आहे.
बॉनेटच्या पत्र्याला दिलेली विशिष्ट वळणे, फोल्ड आणि त्याचे आकार यातून मोटारीच्या दर्शनी भागाचे सौंदर्य खुलविले जाते. मोटारीच्या बॉनेटवर झेंडा लावणे, एखाद्या झेप घेणाऱ्या वाघाची छोटी प्रतिमा लावणे वा गरुडासारख्या पक्ष्याच्या प्रतिमेलाही बॉनेटवर स्थान देणे हे ग्राहकांना आकर्षित करणारे प्रकार. कंपन्यांच्या लोगोंप्रमाणेच या बाबीही मोटारीच्या मुखवटय़ाला आकर्षित करीत असतात. कलात्मकतेने या घटकांचा वापर केला जातो.
मोटारीच्या पुढील बाजूस रेडिएटरच्या पुढे असलेले ग्रिल हेदेखील मोटारीला आकर्षक करण्यासाटी मोठय़ा कलात्मकतेने वापरले जाते. स्टील, लोखंड, प्लॅस्टिक यांचा वापर केला जातो. स्टीलचा चकचकीतपणा आणण्यासाठी त्यावर लोखंडी ग्रिलवर मुलामा चढविला जातो व त्यावर एखाद्या सोन्यासारख्या धातूचाही आभास निर्माण करण्यासाठी रंगप्रक्रिया केली जाते. हे ग्रिल कधी छोटेसे करून लहान मुखाच्या व्यक्तिमत्त्वाची तुलना जशी होते तशीच ग्रिलचा वापर हा मोठय़ा मुखाच्या व्यक्तिमत्त्वाशी करण्यासाठी ते ग्रिल काहीसे ताणलेले असते. गरुडासारखा पक्षी हा गतिमानतेचे प्रतीक असल्याने त्याच्या तोंडावळ्याशी मिळणारी रचनाही करण्याचा प्रयत्न होत असतो, तर वाघासारखी चपळ वाटणारी मुखवृत्तीही मोटारीच्या यापुढील भागाच्या आरेखनात आणण्याचा प्रयत्न झालेला दिसतो.
मोटार प्रशस्त वाटावी किंवा ती कमनीय वाटावी यासाठी मोटारीच्या या मुखदर्शनातच आरेखनाचे नावीन्य वापरले गेले. हे सर्व करताना आरेखन हा भाग मोटारीच्या उत्पादनातील महत्त्वाचा भाग ठरला आहे. त्यातूनच मोटारीच्या मुखवटय़ाच्या या आगळ्या दुनियेने ग्राहकांना भुरळ पाडली आहे. सोबतचे हे विविध मोटारींचे आगळेवेगळे वा चित्रविचित्र मुखवटे या अनुभवाचा प्रत्यय देणारे ठरावेत. भारतात तरी त्या मानाने अजून मोटारींमधील वैविध्य आले नसले तरी युरोपात या बाबींनी आपली मर्यादा केव्हाच पार केली आहे. त्यांना आता जेट युगाचे अप्रूप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा