ऑफ रोड वाहनचालनाचा अनुभव वेगळाच असतो, थरारक असतो, उत्साही असतो, तरुणाईला आव्हानात्मक असतो.  मर्सिडिझच्या जीएल व एमएल क्लास या प्रवर्गातील एसयूव्ही प्रकारच्या मोटारी ऑफ रोड वातावरणात कशा सुरक्षित व पुढे सरकू शकतात, स्थिरही कशा राहू शकतात, त्यासाठी सेन्सरचे तंत्रज्ञान किंवा ब्रेक्स नियंत्रण करण्याचे वा एक्सलरेशन नियंत्रितपणे वापरण्याचे कसब कसे पणाला लागते हे  व्यावसायिक शर्यतीमधील सुमारे १२ ते १५ वर्षे अनुभवी असणाऱ्या खास प्रशिक्षित चालकांनी मोटारीत बसलेल्या प्रवाशांना कुशलतेने प्रत्ययास आणून दिले. सुमारे ४५ ते ६० अंशांच्या चढ व उतारात थरारक पण तितकाच सुरक्षित अनुभव येतो. फोर व्हील ड्राईव्ह या प्रकारच्या या एसयूव्ही आहेत. (फोरव्हील ड्राइव्ह- वाहनाची मागील व पुढील चारही चाके गतिदायी असतात) त्यामुळे मोटारीला मिळणारी गती, ताकद ही या तीव्र चढाच्या मार्गावर सावधपणे व कणखरपणे पुढे सरकते व त्यानंतर असलेला तितक्याच अंश कोनातील उतारही सुरक्षितपणे उतरते. तेव्हा हायसे वाटते. श्वास रोखणारा हा रस्ता येथे लोखंडी बीम, पत्रे यांच्या साहाय्याने उभारण्यात आला होता. चालकाने वेग न घेता सावधपणे मोटार चढावावर सरकविली व चढामध्ये ब्रेक लावून उभी केली. मधील रांगेतील आसनावरून चालकासमोरील काचेतून फक्त निळेशार आभाळ दिसत होते. त्यानंतर ब्रेक प्रभावी कसे आहेत, ते सांगून अवघ्या ३-४ सेकंदांत ब्रेक सोडत पुन्हा चढावाचा माथा गाठला व उतारावर मोटार आणली व पुन्हा चालकाने ब्रेक्सची, चाकांची, ग्राऊंड क्लीअरन्सची परिपूर्णता सांगण्यासाठी साधारण अर्धा मिनिट मोटार उतारावर उभी केली. त्यानंतर पुन्हा हळूवारपणे ब्रेक सोडत सपाट रस्त्याकडे एसयूव्ही आणली..
डोंगराळ भागामध्ये अशा प्रकारचे रस्ते नसलेले भागही असतात, पण तेथून वाहन चालविण्याची काहींची गरज असते, काहींची अतिउत्साही मानसिकता असते. कधी रस्ताच नसल्याने तीव्र उतारावर मोटारीच्या एका बाजूची दोन चाकेच न्यावी लागतात, सुमारे ३० अंश कोनाच्या या उतारावर उताराकडील बाजूला वाहन एका बाजूने कललेले असते पण मर्सिडिझच्या या एसयूव्हीमध्ये आतील प्रवाशाचे कलणे व हलणे मात्र खूप कमी असते. लोखंडी आधारांवर जमिनीऐवजी लाकडी फलाट सुमारे ३० अंशांच्या कोनात तयार करून केलेल्या या रस्ता नसतो अशा स्थितीत थररारकतेबरोबर समतोल राखण्याची मोटारीची क्षमता सिद्ध करण्याचे काम या ड्राइव्हमध्ये होते.
 एका वेळी मोटारीची फक्त दोन चाके जमिनीवर टेकली जातील. त्या वेळी एक मागील डावे चाक हवेत असेल तर उजव्या बाजूचे पुढील एक चाक टेकलेले असेल किंवा एकच चाक हवेत असेल व अन्य तीन चाके असमांतर अशा उंचीमध्ये असतील तर काय होईल.. त्या मोटारीचा समतोल साधण्याचे व त्या स्थितीत मोटार पुढे सरकविण्याचे कसब मर्सिडिझच्या या एसयूव्हीनी करून दाखविले. सेन्सर पद्धतीमध्ये ज्या वेळी एक चाक जमिनीला टेकलेले नसेल तेव्हा त्याची गती थांबून त्याची ताकद अन्य चाकांकडे वळविली जाते व त्याच वेळी पुढील चाकांनाही ताकदीने गती मिळते आणि काहीशा अधांतरी स्थितीतही मोटार सुलभपणे पुढे सरकते. प्रवाशांना सुरक्षितपणे, अधिक त्रास न होता प्रवास होऊ शकतो ही सारी अनुभूती मर्सिडिझ बेन्झच्या या स्टार ड्राइव्ह उपक्रमात देण्यात आली.
विद्यमान ग्राहकांनाही अशा प्रकारच्या वाहनाची उपयुक्तता कळावी आणि वाहनचालनात त्यांनी कोणती दक्षता घ्यावी त्याचेही मार्गदर्शन या मोटारीच्या खास प्रशिक्षित अशा चालकांनी दिले.    
खडतर मार्गावर किंवा जेथे रस्ताच नसतो, अशा ठिकाणी ऑफ रोड व्हेइकल्स नसले तरी एसयूव्ही जोमदार असेल तर मार्ग सुकर कसा होतो? याची अनुभूती मर्सिडिझ बेन्झच्या एसयूव्हीद्वारे अलीकडेच निमंत्रितांसाठी एका उपक्रमाद्वारे देण्यात आली. मुंबईत जुहू विमानतळाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मर्सिडिझ बेन्झच्या स्टार ड्राइव्ह या उपक्रमात मुंबईतील विद्यमान ग्राहक व संभाव्य ग्राहक यांना या एसयूव्हीच्या ताकदीचा अंदाज देण्यात आला. तसेच सेदान मोटारींच्या सुरक्षित प्रवासाचीही जाण या उपक्रमातील ड्राइव्हने दिली. मुंबईतील या उपक्रमाच्या वेळी चित्रपट अभिनेते फरहान अख्तर हेही उपस्थित होते. ते भारतातील एम. क्लास या मर्सिडिझ बेन्झ मोटारीचे पहिले ग्राहक आहेत. या वेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक देवाशीष मित्रा व स्टार ड्राइव्ह उपक्रमातील सहयोगी कंपनी मोबील १ चे पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader