सामानसुमान वाहून नेण्यासाठी आणि प्रवासाच्या सुविधेसाठी स्टेशनवॉगन नावाचा प्रकार अस्तित्त्वात आला आणि तेथेच मोटारीची उपयुक्तता अधिक वाढीला लागली असे म्हणता येईल. मोटारीच्या आरेखनामध्ये मोटारीच्या सौंदर्याबाबत तिच्या उपयुक्ततेबाबत व आकाराबाबत विचार करताना त्या मोटारीला विशिष्ट आकार प्रदान केला जातो. त्यानुसार त्या मोटारीला दिलेल्या आकारानुसार ती मोटार सेदान आहे, हॅचबॅक आहे की स्टेशनवॉगन आहे ते स्पष्ट होते. मोटार सेदान असो की हॅचबॅक तिचे हे विशिष्ट रूप तिच्या मागील भागावरून निश्चित केले जाते. त्या मागील भागाला असलेला आकार त्या मोटारीला सेदानचे वा हॅचबॅकचे रूप आहे की नाही ते ठरविते. प्रवासी मोटार आपण पाहू म्हणजे ती मोटार नेमकी किती भागात विभागली गेलेली आहे ते लक्षात येईल. मोटारीचे एकंदर तीन भाग पाडले गेले असून त्यात अ, ब, क, व ड असे चार स्तंभ (पिलर) त्या मोटारीला पाडले गेले आहेत. त्यामध्ये पहिल्या प्रकारात दिसणारी पूर्ण मोटार ही सेदान मोटार आहे. त्या मोटारीच्या मागील बाजूला बाहेर आलेला भाग म्हणजे डिक्कीचा तो तिसरा कप्पा, ड भागात येतो. तो कप्पा वरील भाजूने वाढविला की तयार होणारा भाग हा स्टेशवॉगनमध्ये मोटारीला रूपांतरीत करतो. स्टेशनवॉगन हे सध्याच्या प्रचलित अशा एसयूव्हीचे मूळ रूप आहे. भारतामध्ये विविविध कंपन्यांच्या एसयूव्ही वा एमयूव्ही या प्रकारात मोडणाऱ्या मोटारी दिसून येतात. मुळात युटीलिटी व्हेईकल म्हणजे बहुउपयुक्ततेचे वा बहुउपयोगी वाहन असेच या एसयूव्ही वा एमयूव्ही बद्दल म्हणता येईल. सर्वसाधारणपणे या दोन्ही प्रकारच्या वाहनांबद्दल नेमकेपण काय आहे हे जाणून घेण्यासारखे आहे. वास्तविक भारतात अशा प्रकारच्या वाहनाला सर्वसाधारणपणे व सरसकटपणे एसयूव्ही म्हणूनच ओळखले जाते.
अमेरिकेतील एका शब्दकोशानुसार स्टेशन वॉगन किंवा इस्टेट कार म्हणजे एक अशी गाडी कीर ज्यात एक वा त्यापेक्षा अधिक आसनाच्या रांगा असतात व त्या मोटारीतील चालकामागील आसनाची रांग वा त्यातील आसनव्यवस्था मुडपून (फोल्ड करून) तेथे तयार होणाऱ्या जागेचा वापर सामान वाहून नेण्यासाठीही केला जातो. डिक्कीसारखे स्वतंत्र सामान ठेवण्यासारखे कक्ष तेथे नसतो. चालकामागील आसनरांगेच्यामागे सुटकेस ठेवता येईल अशी जागा असते. तेथे मागील दरवाजा उघडून तेथे सामान सहजपणे ठेवता येण्यातीही व्यवस्था असते. स्टेशन वॉगन ही माणसे व सामान वाहून नेण्यासाठी असणारी मोटार होती. विशेष करून त्या काळात रेल्वे स्थानकाहून प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी ने-आण करण्यासाठी ही मोटार वापरली जाई. त्यामुळेच स्टेशन हा शब्द त्या स्टेशनवॉगनशी निगडीत आहे. अशा या स्टेशन वॉगनच्या बहुपयोगी आकार व व्यवस्थेमुळे ही लोकप्रियही झाली. शहराबरोबरच ग्रामीण व निमशहरी भागातही उपयोगात आणली जाऊ लागली.
साधारण त्यावेळी म्हणजे १९६९ मध्ये या स्टेशनवॉगनचा आकार पुढील बाजूला सेदान प्रकारातील मोटारीसारखा होता. म्हणजे वर उल्लेखलेल्या पिलर्सच्या भाषेत सांगायचे तर अ या पिलरपुढे असणारा भाग ज्याला साधारण बॉनेट म्हणून म्हणतो ती रचना त्यावेळी या मोटारींची साधारण सारखीच होती. सध्याचा एसयूव्ही हा प्रकार साधारण स्टेशन वॉगन सारखाच आहे. वास्तविक फोरव्हील ड्राईव्ह म्हणजे ज्या वाहनांची मागील व पुढील चारही चाके ही वाहनाला गती प्राप्त करून देतात असे हे स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल अर्थात एसयूव्ही म्हणून ओळखले जाते. चांगल्या वा खडकाळ रस्त्यांवर किंवा जेथे अगदी रस्ता म्हणण्यासारखी स्थिती नाही, अशा जमिनीवरही जाणारी ही मोटार शक्तीशाली असते. हलक्या पिकअप ट्रकचीच तुलना याच्याशी केली जाते. उत्तर अमेरिकेत एसयूव्ही ही हलके ट्रक म्हणून मानले जातात.
सध्या भारतात या प्रकारात आपल्याला एसयूव्ही, एमयुव्ही असे दोन प्रकार साधारण विभागलेले दिसतात. बदलते कायदे, उपयुक्तता, लोकप्रियता या अनुषंगाने आज दिसणाऱ्या सर्वच एसयूव्ही या काही फोर व्हील ड्राइव्ह पद्धतीमधील नाहीत. त्याचप्रमाणे सर्वच फोर व्हील ड्राइव्ह मोटारी या काही एसयूव्ही म्हणता येत नाहीत. काही एसयुव्ही या फोर व्हील व टु व्हील ड्राईव्ह या दोन्ही पद्धतीने चालविता येऊ शकतात. आवश्यक तेव्हा त्या मोटारी फोर व्हील ड्राईव्ह म्हणून कळ दाबून वापरता येतात. ज्यामुळे त्यांना जास्त ताकद मिळते व काम झाल्यानंतर त्या टु व्हील ड्रइव्ह पद्धतीने इंधन वाचविण्यासाठी उपयुक्त गती व ताकदीनुसार चालविता येतात. काळानुसार, वापरानुसार आकारानुसार, देशमानानुसार या एसयूव्ही आपले रंग बदलत असतात असेच म्हणावे लागेल. अगदी वॉगन आरसारखी हॅचबॅक मोटारही एमयूव्ही प्रकारात मोडता येईल. वाहन उत्पादक हे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सहजपणे एसयूव्ही या विशेषाचा वापर आपल्या मोटारींसाठी करीत असतात.
स्पोर्टी लूक अशी एक संज्ञा सध्या रूढ झाली आहे. स्पोर्टी लूक असणारी स्टेशनवॉगन सारखी दिसणारी मोटारी एसयूव्ही म्हणायची का असाही प्रश्न त्यामुळे पडतो. मुळात भारतीय वातावरणात एसयूव्ही व एमयूव्ही असे विभाजन केल्यास साधारण नेमका काय फरक येथे आहे ते पाहाण्यासारखे आहे.
शहरी भागातील रस्त्यांवर सहजपणे वावरता येण्यासारखा आकार, ताकद व स्टिअरिंग नियंत्रण असणारी, सामानालाही alt जागा असणारी सेदानच्या आसपास लूक असणारी व तितकीच प्रवाशांना काहीशी आरामदायी अशी ही मोटार एमयूव्ही म्हणून काहीजण मानतात. तर स्पोर्टी लूक असणारी, वाहन चालविताना जीपगाडीसारखी काहीशी उंच वाटणारी, जास्त ताकदीची, हार्ड सस्पेंशन असणारी, खडबडीत रस्त्यांप्रमाणेच अगदी वाळवंटी, चिखलयुक्त व डोंगराळ भागातही चालविण्यास सुकर वाटणारी ती एसयूव्ही असा फरक करता येतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपात वापरल्या जाणाऱ्या जीपसारख्या लष्करी मोटारी वा तत्कालिन व्यावसायिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या मोटारींपेक्शा मात्र या काहीशा वेगळ्या मानाव्या लागतात. तेथील ग्रामीण भागात त्या लोकप्रिय झाल्या त्या तेथील खराब रस्त्यांवर सहजपणे वारू शकत होत्या. तेथील रस्ते म्हणता येणार नाहीत, अशा जमिनीवरही उपयुक्त ठरत होत्या, त्यांची तशी क्षमता होती. यासाठीच त्या ग्रामीण भागात लोकप्रियही झाल्या. मोठा व्हीलबेस, फोर व्हील ड्राईव्ह, अधिक ताकदीचे इंजिन, सामान व प्रवासी दोघांनाही उपयुक्त अशा या मोटारी यामुळेच लोकप्रिय ठरल्या तर नवल नाही.
मात्र, शहरी जीवनात सेदान प्रकारातील मोटारी किमान भारतात तरी अधिक जवळच्या झाल्या आहेत. विशिष्ट जीवनशैलीने शहरी जीवन जगले जाते, त्या ठिकाणी अशा प्रकारच्या एसयूव्ही मोटारी सरसकट वापरल्या जात नाहीत. त्या कौटुंबिक सहलीसाठी, विकेण्डला शहराबाहेर जाण्यासाठी वा अधिक लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त मानल्या जातात. योग्य मानल्या जातात. वास्तविक शहरी जीवनात दैनंदिन वापरासाठी त्या योगद्य नाहीत असे मानत्र नाही. विशिष्ट मानसिकतेमुळे तसा वापर होत आहे. अर्थात ती मानसिकताही आता मागे पडत आहे, असे दिसते. त्याला पेट्रोल व डिझेल या इंधनाच्या किंमती कारण असल्याचेही काही काळ दिसून आले.
अमेरिकेत पर्यावरणदृष्टय़ा या एसयूव्हींना रोखले गेले होते. संलग्न निकषांमुळे झालेल्या त्या धोरणांमुळे या प्रकारच्या वाहनांना काही काळ त्रास झाला. मात्र मोटार उत्पादकांनी आरामदायी सेदान मोटारींची वैशिष्टय़े या एसयूव्हीना लागू केली. साहजिकच त्यांचा ग्राहकांवरील प्रभाव कमी झाला नाही, उलट वाढला असेच दिसून आले. एकंदरीत भारतातही आता या एसयूव्हींची असणारी रेलचेल कमी नाही. प्रत्येक कंपनीकडून असणाऱ्या एसयूव्ही वा एमयूव्ही यांच्या वैविध्यतेमुळे व स्पर्धात्मक किंमतीमुळे पेट्रोलपेक्षा डिझेलचे कमी असणारे दर भारतात एसयूव्ही-एमयूव्ही यांना चांगले दिवस दाखविणारे ठरले आहेत. एकंदरीत भारतात आता या बहुपयोगी वाहनांना असलेली मागणी जोर धरू लागली आहे. लोकांना आवश्यक असणारा वेग, ताकद देणारे आणि प्रवास व सामानासाठीही चांगली जागा देऊ करणारे हे वाहन प्रवासासाठी सुविधा व आराम देणारी असल्याने सेदान मोटारींच्या संख्येच्या तोडीला ही वाहने आता दिसू लागली आहेत.
स्टेशनवॉगनचा वारसा सांगणारी एसयूव्ही-एमयूव्ही
मोटारीच्या आरेखनामध्ये मोटारीच्या सौंदर्याबाबत तिच्या उपयुक्ततेबाबत व आकाराबाबत विचार करताना त्या मोटारीला विशिष्ट आकार प्रदान केला जातो. त्यानुसार त्या मोटारीला दिलेल्या आकारानुसार ती मोटार सेदान आहे, हॅचबॅक आहे की स्टेशनवॉगन आहे ते स्पष्ट होते.
First published on: 15-10-2012 at 02:54 IST
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drive it suv cars sedan cars hatchback cars in india station wagon motor car