महागाई कितीही वाढली, इंधनाचे दर कमी-जास्त होत राहिले, वाहननिर्मिती क्षेत्राने वाढत्या करांविरोधात कितीही गळा काढला, वाहनखरेदीच्या टक्केवारीने कितीही नीचांक गाठला तरीही एक गोष्ट मात्र सातत्याने सुरूच राहील आणि ती म्हणजे कारखरेदी! दाराशी कार असणे हे समस्त भारतीयांसाठी स्टेटस सिम्बॉल आहे आणि हा पांढरा हत्ती नाही म्हटलं तरी आपल्या दारात असायलाच हवा हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असते. तमाम भारतीयांच्या या स्वप्नावर विश्वास ठेवूनच तर कारनिर्मितीसाठी किंवा विक्रीसाठी अनेकानेक कंपन्या दिवसागणिक भारतीय रस्त्यांवर उतरत असतात. चीननंतर एवढी मोठी बाजारपेठ जगात फक्त इथेच आहे, याची त्यांना पक्की खात्री आहे. त्यामुळेच फियाटनेही आता कोणाचाही हात न धरता थेट स्वतच भारतीय बाजारपेठेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
लिनिया आणि पुंटो या गाड्यांच्या भारतातील उत्पादन आणि विक्रीसाठी फियाटने टाटांशी करारमदार केला होता. मात्र, आता टाटांपासून विलग होत फियाटने स्वतच या क्षेत्रात उडी घेतली आहे. त्याची अधिकृत घोषणा नुकतीच मुंबईत झाली. त्यासाठी फियाट ग्रुप ऑटोमोबाइल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची (एफजीएआयपीएल) स्थापना करण्यात आली आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये फियाटच्या कारची डीलरशिप, त्यांची देखभाल, कस्टमर केअर आदी सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नॅशनल सेल्स कंपनीचीही स्थापना करण्यात आली आहे. सातत्याने वाढत असलेल्या स्पध्रेत टिकून राहण्यासाठी तसेच फियाटचा भारतातील कारविक्रीतील टक्का वाढावा यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. ँ३३स्र्://६६६.ऋ्रं३-्रल्ल्िरं.ूे/ ही वेबसाइटही फियाटने सुरू केली असून ती थेट डीलर्सशी जोडलेली असेल. या वेबसाइटच्या माध्यमातून ग्राहकांना थेट डीलर्सशी संपर्क साधता येणार असून त्यांच्या छोट्या-छोट्या अडचणींचे निराकरणही त्यायोगे केले जाणार आहे.
वॉरंटी पॉलिसी
या सेवांबरोबरच फियाटने आता नवीन वॉरंटी पॉलिसीही आणली आहे. त्या माध्यमातून उत्पादकांकडून ग्राहकांना तीन वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. तसेच ही पॉलिसी पाच वर्षांपर्यंत वाढवण्याचा पर्यायही ग्राहकांना खुला असेल. अतिरिक्त दोन वर्षांच्या वॉरंटी पॉलिसीअंतर्गत ग्राहकांना डीलर्सच्या माध्यमातून युरोप असिस्टन्सची सेवा उपलब्ध होणार आहे. फियाटवर असलेला ग्राहकांचा विश्वास अधिकाधिक वृिद्धगत व्हावा यासाठीच ही योजना आखण्यात आली आहे. तसेच ऑन रोड काही अडचणी उद्भवल्यास २४ तास अविरत सेवा पुरवणारी मोबाइल व्हॅनही ग्राहकांच्या दिमतीला उतरणार आहे.
कॉल सेंटर
ग्राहकांच्या तक्रारी, अडचणींचे तातडीने निराकरण व्हावे या उद्देशाने फियाटतर्फे आता २४ तास चालणारे कॉल सेंटरही उभारण्यात येणार आहे. ३० जणांचे पथक या सेंटरमध्ये कार्यरत असेल व भारतातील सर्व प्रमुख भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध असेल.  वर्षअखेपर्यंत १०० कर्मचारी व ११२ डीलर्स नियुक्त करण्याचा फियाटचा निर्धार असून त्यांच्या माध्यमातून कंपनीचा आलेख उंचवायचा आहे.                                – प्रतिनिधी
आतापर्यंत टाटांच्या मदतीने भारतात कारनिर्मिती व विक्री करणाऱ्या फियाटने आता स्वतच सर्वशक्तीनिशी भारतीय बाजारपेठेत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यासाठी जय्यत तयारी केली असून फियाट ग्रुप ऑटोमोबाइल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची (एफजीएआयपीएल) ही कंपनी स्थापित केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा