भारतात व्हेस्पाच्या स्कूटर्स म्हणजे एकेकाळी शान होती. बजाज स्कूटर्सच्या बरोबरीने व्हेस्पाचा बाजारात असलेला एक दबदबा वेगळाच होता. तो जमाना होता, गीयर असणाऱ्या स्कूटर्सचा. टू स्ट्रोक प्रकारातील या स्कूटर्स आता कालानुरूप लुप्त झाल्या. देखण्या, हलक्या व चालवायला सोप्या अशा प्रकारच्या स्कूटर्स म्हणजे गीयरविना चालविता येणाऱ्या ऑटोगीयर असणाऱ्या. आज स्त्री-पुरुष अशा दोघांनाही वापरता येतील, अशा गीयरविरहित स्कूटर्स भारतीय व जागतिक बाजारपेठेत आज प्रभावीपणे लोकप्रियता मिळवून आहेत. व्हेस्पाची नव्याने आलेली गीयरविरहित स्कूटर सध्या भारतीय बाजारपेठेत आकर्षण बनली आहे. दिसायला देखणी आणि तंत्रज्ञानाच्या आधुनिकीकरणाबरोबरच अन्य कंपन्यांपेक्षा काही वेगळे देण्याच्या दृष्टीने तयार केलेली व्हेस्पा, अन्य कंपन्यांच्या स्कूटर्सच्या तुलनेत बऱ्यापैकी महाग आहे. तिचे आकर्षक रूप हेच काहीसे बलस्थान बनले आहे. काही वर्षांपूर्वी गीयरच्या स्कूटर बनविणारी व्हेस्पा भारतातून लुप्त झाली आणि आता पुन्हा नव्याने या गीयररहित स्कूटरच्या निर्मितीद्वारे भारतीय बाजारपेठेत उतरली आहे.
व्हेस्पा ही मूळची इटालीमधील कंपनी. कोरादिनो-डी-एस्केनिओ हा इटलीतील अतिशय प्रसिद्ध असा वैमानिक अभियंता होता. त्याने निर्मिलेले हेलिकॉप्टर डिझाइन्स हे युद्ध काळात फार गाजले होते. याच अभियंत्याने व्हेस्पा कंपनीच्या पहिल्या स्कूटरचे डिझाइन बनविले. वापरण्यास अतिशय सोपी, सुटसुटीत आणि देखभालीत अतिशय स्वस्त म्हणून ही स्कूटर त्या काळी फार लोकप्रिय झाली होती. व्हेस्पा कंपनीने आतापर्यंत १५० हून अधिक प्रकारच्या स्कूटर्स बाजारात आणल्या. काही प्रकारच्या स्कूटर्स या युद्धात वापरण्यात आल्या होत्या. लोकप्रियता हा तिचा गुण तिच्या देखणेपणामुळेही आला. यामुळेच जवळपास १५० चित्रपटांमध्ये नायक अथवा नायिकेची स्कूटर म्हणून व्हेस्पा कंपनीची गाडी वापरण्यात आली.
  भारतीय बाजारपेठेत काही महिन्यांपूर्वीच खऱ्या अर्थाने व्हेस्पाने पुन्हा प्रवेश केला आहे. आकर्षक असे रूप, आधुनिक तंत्रज्ञान, वितरकांचे वाढते जाळे, इतर सर्व दुचाकींपेक्षा असणारे रूपातील वेगळेपण, रंगसंगती यामुळे व्हेस्पाचे रूप लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर या स्कूटरची लांबी जरी कमी असली तरी तिचा १२९० मिमी इतका व्हील बेस असल्यामुळे गाडी खराब रस्त्यांवरूनही अधिक सुरक्षितपणे जाऊ शकते. व्हेस्पामध्ये वापरलेले तंत्रज्ञान हे कित्येक अंगांनी इतर दुचाकींपेक्षा वेगळे आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, व्हेस्पाचे पुढील सस्पेन्शन हे विमानासाठी ज्या प्रकारचे सस्पेन्शनचे तंत्र वापरले जाते, त्या तंत्रावर आधारित आहे. पुढे कॉइल स्प्रिंगसह आर्म व डय़ुएल इफेक्ट शॉकअॅब्सॉर्बर्स असून मागील चाकासाठी डय़ुएल इफेक्ट शॉकअॅब्सॉर्बर्स आहेत. स्कूटरची शरीरबांधणी ही मोनोकॉक प्रकारची असून ती एकसंध अशा पोलादी पत्र्यामध्ये तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे जोड, रिवेट, वेिल्डग इत्यादी बाबींचा वापर टाळल्याने टिकाऊपणा येऊ शकतो.
 इंजिन हे ४ स्ट्रोक असून अधिक मायलेज मिळावे या पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. इंजिनची क्षमता १२५ सीसी आहे. कमाल ताकद १०.६ पीएस व ७५०० आरपीएम असून कमाल टॉर्क १०.६ एनएम व ६००० आरपीएम इतके आहे. गाडीचे मायलेज हे तिचा कॉम्प्रेशनचे प्रमाण वाढविल्यास वाढत जाते आणि कमी इंधनात गाडी अधिक अंतर कापू शकते.
या गाडीच्या पुढील चाकांचे ब्रेक्स हे १५० मिमी, तर मागचे ब्रेक्स हे १४० मिमी व्यासाचे असून अधिक वेगातदेखील गाडी सुरक्षितपणे थांबवता येऊ शकते. गाडीची इंधन क्षमता आठ लिटर पेट्रोलची असून प्रति लिटर पेट्रोलला ६० किलोमीटर इतके मायलेज मिळेल असे कंपनीचे म्हणणे आहे.
 व्हेस्पाची दुचाकी ही अत्यंत आकर्षक रंगांत उपलब्ध आहे. त्याचबरोबर, क्रोम प्लेटिंगचा केलेला योग्य वापर या गाडीच्या देखणेपणात भर घालतो. गाडीचे आरसे, मेन स्टॅण्ड, समान ठेवायचे छोटे कप्पे या छोटय़ा बाबींवरदेखील भरपूर लक्ष देण्यात आले असून, त्या वापरायला अधिकाधिक सोप्या होतील असा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
गेल्या वर्षभराच्या काळात जरी व्हेस्पा भारतात विस्तारित होत असली तरीदेखील तिची झालेली विक्री ही अपेक्षेपेक्षा कमी आहे. कदाचित या गाडीची अवाजवी वाटावी इतकी किंमत यास जबाबदार असू शकेल. डिस्क ब्रेक्स ही हल्लीच्या ग्राहकाची गरज आहे. भविष्यात डिस्क ब्रेक्स असणारी व्हेस्पा बाजारात येण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा