मान्सूनचे आगमन वेळेपेक्षा किमान पाच दिवस लांबणार असल्याची वार्ता नुकतीच येऊन गेली. तशातच आता मेच्या उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. जसजसा पावसाळा जवळ येऊ लागेल तसतसा हा तडाखा आणखीनच वाढत जाईल. अशा या उकाडय़ात आपण एसी-कूलर लावून थंड राहू शकतो, पण आपल्या लाडक्या कारचे काय.. तिला कसे थंड ठेवायचे? त्यासाठीच या टिप्स..

अगदी अर्धा तास उन्हात गाडी पार्क केली तरी ती इतकी तापते की बसल्यानंतर घामाच्या धारा सुरू होतात. गाडीतला एसी सुरू केला तरी किती तरी वेळाने गाडी थंड होऊ लागते. त्यामुळे अनेकदा उन्हातान्हाचा प्रवासच नको, असा सूर उमटतो. मात्र, तसे कधी होत नाही ही बाब अलाहिदा. मग कशी थंड ठेवायची गाडी?

उन्हात गाडी पार्क केली असेल तर एक जरूर करा, ते म्हणजे गाडीच्या काचा किंचित उघडय़ा राहतील असे बघा. म्हणजे काय होईल, की गाडीत हवा जरा खेळती राहील आणि आतली गरम हवा बाहेर शोषली जाईल. काचा अगदीच खाली करून नका ठेवू, नाही तर गाडीची सुरक्षा धोक्यात येईल. शिवाय अनोळखी ठिकाणी गाडी पार्क करताना जरा जास्तच काळजी घ्या.

सौरऊर्जेवर चालणार फॅन मिळतो का ते पाहा. कारण हा फॅन गाडीत लावला तर उन्हात गाडी जेवढी फिरवाल तेवढा वेळ हा फॅन चालू राहून गाडीत हवा खेळती राहील. शिवाय चालकालाही ऊन जाणवणार नाही. हा फॅन गाडीतील, विशेषत:, चालकाच्या केबिनमधील उष्ण हवा शोषून घेत असतो. इंटरनेटच्या महाजालात सोलार ऑटो कूल फॅन इंडिया असा सर्च मारलात तर तुम्हाला सहज सापडेल. साधारण हजार रुपयांपर्यंत येतो हा फॅन.

तुम्ही दरवेळी गाडी सावलीतच पार्क कराल असे नाही. त्यामुळे कडक उन्हात गाडी पार्क केल्याने काचांना धोका पोहोचण्याचा संभव असतो. अशा वेळी गाडीच्या मागील बाजूच्या खिडक्या सनशेडने झाकायला विसरू नका.

गाडीतील आसन लेदरचे असतात. उन्हामुळे ते भयंकर तापलेले असतात. त्यामुळे बसल्यानंतर चटका लागतो. अशा वेळी ही आसने कापडाने झाकून ठेवल्यास उत्तम. त्यामुळे उष्णता हे कापड शोषून घेईल व चटकाही बसणार नाही.

तुमच्या गाडीच्या एअर कंडिशनरची सíव्हसिंग करून घ्या. कारण अनेकदा काय होते, की एसीतील फिल्टरवर जळमटे आलेली असतात किंवा मग रेफ्रिजरेट गॅसची पातळी कमी झालेली असते. त्यामुळे एसीवर ताण येत असतो. आणि त्यामुळे गाडीतील कूिलग सिस्टीम बिघडते. हे सर्व टाळण्यासाठी वेळोवेळी किंवा विशेषत: उन्हाळ्यात एसीची सíव्हसिंग करून घेणे जरुरीचे ठरते. हॅचबॅक किंवा छोटय़ा सेडानसाठी एसी सíव्हसिंगसाठी अडीच हजार रुपये खर्च येतो.

गाडीचे स्टीअरिंग हातरुमालाने झाकून ठेवा. कारण तुम्ही गाडी पाìकगमध्ये असताना खिडक्या थोडय़ाशा उघडय़ा ठेवल्यात तरी आत हवा खेळती राहते; परंतु स्टीअरिंग व्हील गरमच राहते, एवढे की त्याला हात लावला असता चटका बसतो. त्यामुळे स्टीअरिंग व्हील हातरुमालाने किंवा टॉवेलने गुंडाळून ठेवल्यास बरे.

या सर्व टिप्समुळे तुमची कार थोडीबहुत तरी थंड राहण्यास मदत होईल. किमान तुमच्या खर्चात तरी किमान पातळीवरची कपात होईल. उन्हात गाडी पार्क केल्यामुळे गाडीतील इतर गॅजेट्सवर त्याचा परिणाम होण्याचा धोका असतो. जसे की, एमपीथ्री प्लेअर, सीडी किंवा तुमचा फोन वगरे. तुम्हाला या वस्तू गाडीतच ठेवायच्या असतील तर त्या किमान ग्लोव्ह बॉक्समध्ये तरी ठेवाव्यात जेणेकरून त्या उन्हामुळे तापून खराब होणार नाहीत.

Story img Loader